Skip to main content
x

फडके, ललिता सुधीर

लिता सुधीर फडके, पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर यांचा जन्म मुंबईतील मध्यमवर्गीय सारस्वत कुटुंबात झाला. त्यांचे वडील कापडाचे व्यापारी होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचे शालेय शिक्षण जेमतेम पूर्ण झाले. सात भावंडे, आजी व दोन काका उत्तम गाणारे होते. त्यांच्या शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे अभिनेते, कवी हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी ललिताचा गोड आवाज ऐकून ‘तिला चित्रपटात  गायला-अभिनयाला पाठवा’, अशी शिफारस केली व वयाच्या नवव्या वर्षी ललिताला चित्रपटसृष्टीत बॉम्बे टॉकीजमध्ये प्रवेश मिळवून दिला. लहानपणी दोन वर्षे गायनाचे शिक्षण त्यांनी बाबूराव गोखले व किराणा घराण्याचे दत्तोबा तावडे आणि वालावलकर यांच्याकडे घेतले.

ललिता फडके यांनी सुरुवातीला हिंदी, इंग्रजी भाषा अवगत करून जाहिरातीसाठी आवाज दिला. त्यांना ‘दुर्गा’ या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. विभूती मित्रांच्या ‘अंगूठी’मध्ये त्यांना प्रथम पार्श्वगायनाची संधी मिळाली. १९४६ साली ‘रुक्मिणीस्वयंवर’साठी ललिताताईंनी बाबूजींकडे प्रथम पार्श्वगायन केले. त्यांनी बव्हंशी प्रथितयश संगीतकारांसाठी (उदाहरणार्थ, शंकरराव व्यास, सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, मास्टर गुलाम हैदर) पार्श्वगायन केले. गीतरामायणातील कौसल्येची सर्व गीते त्यांनी गायली आहेत.

मराठीत डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासह त्यांनी ‘वंशाचा दिवा’, तर ‘सुवासिनी’मध्ये पं. भीमसेन जोशी यांच्यासह त्यांनी एक चीज गायली आहे. हिंदीत मुहंमद रफी, चितळकर इ. गायकांसह त्यांनी पार्श्वगायन केले. ‘संत जनाबाई’, ‘माया बाजार’, ‘उमज पडेल तर’, ‘जशास तसे’ या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

श्रीधर पार्सेकरांच्या संगीत नाटकात त्यांनी १९४५ साली शांता आपटे, राम मराठे, दत्ता डावजेकर व सुधीर फडके यांसह गायन केले होते. सुधीर फडके आणि ललिता देऊळकर यांचा विवाह २९ मे १९४७ रोजी पुण्यात झाला.

‘रंगू बाजाराला जाते’, ‘पाव्हनं येवढं ऐका’ (वंशाचा दिवा), ‘नखानखांवर रंग भरा’ (माया बाजार), ‘मोठं मोठं डोळं तुझं’ (जशास तसे), ‘डोहात बुडाला श्याम’ (माझं घर, माझी माणसं), ‘मी तर प्रेमदिवाणी’ (सुवासिनी) ही त्यांची काही गाजलेली चित्रपटगीते आहेत. ‘संत जनाबाई’ या चित्रपटातील जवळजवळ सर्व गाणी त्यांनी गायली होती. त्याचप्रमाणे, ‘आठ दिन’, ‘विद्या’, ‘रामबान’, ‘बेदर्द’, ‘दौलत’, ‘शहीद’, ‘जलन’, ‘मेरा मुन्ना’ आदी हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी पार्श्वगायन केले.

दादरा-नगरहवेली ‘मुक्तिसंग्रमा’तही त्यांनी बाबूजींना साथ दिली. देश व सामाजिक बांधिलकीचे उभयतांचे उदाहरण म्हणजे अरुणाचल प्रदेशातील ‘लेकी फुन्चो’ ह्या मुलाला त्यांनी आपल्या घरी ठेवले. त्याचे ‘दीपक’ असे नामकरण करून त्यास श्रीधरप्रमाणेच संस्कार देऊन, चांगले शिक्षण दिले. तो आता उच्च पदावर कार्यरत आहे. बाबूजींचे गुरू कै. पाध्येबुवा यांच्या स्मरणार्थ त्यांनी ‘सुलश्री’ प्रतिष्ठानाची स्थापना केली. ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानातर्फे त्यांना मिळालेला ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा मानाचा तुरा ठरला.

         — रवींद्र आपटे

फडके, ललिता सुधीर