फडके, श्रीधर सुधीर
श्रीधर सुधीर फडके यांचा जन्म विख्यात गायक व संगीत दिग्दर्शक सुधीर फडके आणि विख्यात पार्श्वगायिका ललिता फडके यांच्या पोटी मुंबई येथे झाला. त्यामुळे श्रीधर फडके यांना घरातून संगीताचा वारसा मिळाला आणि त्यांच्यावर बालपणापासून संगीताचे उत्तम संस्कार झाले.
मुंबईतील बालमोहन विद्यामंदिर, लोकमान्य विद्यामंदिरात त्यांचे शालेय शिक्षण झाले व रूपारेल महाविद्यालयातून एम.एस्सी. पदवी घेऊन पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ऑफ न्यूयॉर्क येथून त्यांनी एम.एस. कॉम्प्यूटर पूर्ण केले आणि त्यात चांगले करिअरसुद्धा केले.
शिकत असताना त्यांनी भावगीतांची ध्वनिफीत काढली होती. संगीत क्षेत्रातील श्रीधर फडके यांची पहिली लक्षणीय कामगिरी म्हणजे त्यांनी संत ज्ञानदेव विरचित हरिपाठातील ‘देवाचिये द्वारी’ या अभंगाला लावलेली सुमधुर चाल. या वेळी ते अमेरिकेत शिक्षण घेत होते.
‘लक्ष्मीची पावले’ हा श्रीधर फडके यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होय. यातील ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे गीत फारच गाजले. सुधीर फडके आणि आशा भोसले या दिग्गज कलाकारांनी हे गीत गायले होते. याला अमाप लोकप्रियता लाभल्यामुळे संगीत विश्वातील श्रीधर फडके यांचे स्थान भक्कम झाले.
‘ओंकार स्वरूपा’, ‘ऋतु हिरवा’ या ध्वनिफितींतील त्यांनी स्वरबद्ध केलेली गीते अत्यंत लोकप्रिय ठरली. ‘काही बोलायाचे आहे’ ही त्यांनी गायलेल्या गीतांची ध्वनिफीत, पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सहगायनातील ‘हे गगना’, आरती अंकलीकर व सुरेश वाडकर यांनी गायलेली ‘तेजोमय नादब्रह्म’ आणि ‘सुखवरदा रामा’, ‘संगीत मनमोही रे’, इ. ध्वनिचकत्यांतील गीते लोकप्रिय झालेली आहेत. लोकप्रियतेच्या मानांकनासाठी त्यांच्या चार ध्वनिचकत्यांना ‘प्लॅटिनम डिस्क’ बहाल झाली आहे.
एअर इंडियातील वरिष्ठ पदावरून ते निवृत्त झालेत. हा संगीताचा छंद, त्यांनी नोकरी सांभाळून जोपासला. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ संगीतकार व गायक म्हणून त्यांची वाटचाल चालू आहे.
महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट पार्श्वगायक’ पुरस्कार १९९७ (चित्रपट: विश्वविनायक) त्यांना प्राप्त झाला आहे. संगीत दिग्दर्शनासाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्कार, ‘वारसा लक्ष्मीचा’ (१९९५), ‘पुत्रवती’ (१९९७), ‘लेकरू’ (१९९९) या तीन चित्रपटांसाठी त्यांना मिळाला. दूरदर्शनचा ‘स्वरतीर्थ’ पुरस्कार, भारत गायन समाज, पुणे यांचा ‘वसुंधरा पंडित’ पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.२०१५ साली त्यांना पुण्यात ‘भूषण पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
— रवींद्र आपटे / आर्या जोशी