Skip to main content
x

फिरके, प्रभाकर सुपडू

         प्रभाकर सुपडू फिरके यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील नाव्ही येथे मध्यमवर्गीय कुटुंबात  झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाव्ही या गावीच झाले. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा नाव्ही येथील भारत विद्यालयामधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी अकोला येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेेतला व १९७३ साली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी अभियांत्रिकी)  ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. नंतर त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. त्यांनी खरगपूर येथील भारतीय तांत्रिकी संस्था येथे प्रवेश घेतला व १९८२मध्ये एम. टेक. पदवी मिळविली. त्यांनी ही पदवी कापणीपश्‍चात अभियांत्रिकी या विषयात घेतली. त्यांनी १९९३मध्ये त्याच संस्थेमधून पीएच.डी. (अभियांत्रिकी) पदवी घेतली. त्यांनी ३६ शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत आणि १८ तांत्रिकी पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. त्यांनी १६ विद्यार्थ्यांना एम.टेक. पदवी घेेण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. भारतीय कृषी अभियांत्रिकी सोसायटी- नवी दिल्ली, अभियांत्रिकी संस्था- कलकत्ता आणि अन्नशास्त्रीय तंत्रसंस्था मैसूर या संस्थांचे ते आजीव सभासद आहेत. फिरके डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक पदावर (संशोधन अभियंता) काम करीत असताना त्यांनी राष्ट्रीय चर्चेमध्ये भाग घेऊन कापणीपश्‍चात तंत्र विज्ञान योजनेचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कडधान्यापासून डाळ तयार करण्यासाठी मिनी दालमिल या यंत्राचा शोध लावला आणि ते शेतकऱ्यांमध्ये प्रचलित केले. हे यंत्र दोन अश्‍वशक्तीच्या विद्युत मोटरवर चालते. या मिलची क्षमता दरदिवशी ८ ते १० क्विंटल डाळ तयार करण्याची असून ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. फिरके यांनी धान्य सफाई व प्रतवारी करण्यासाठीही एका नवीन यंत्राचा शोध लावला. त्याद्वारे काडी, कचरा व मातीचे खडे आणि चांगले धान्य वेगवेगळे होते. या यंत्राची क्षमता दोन ते अडीच क्विंटल धान्य सफाई करण्याची आहे. मिरचीपासून बी वेगळे करण्यासाठी फिरके यांनी अत्यंत उपयुक्त यंत्राचा शोध लावला. वास्तविक मिरचीपासून बी वेगळे करणे मोठे कष्टाचे आणि जिकिरीचे काम आहे. मजुराला खूप शिंका येतात व अंगाचा दाह होतो. हे यंत्र सर्व बाजूंनी बंद असल्यामुळे मजुराला कोणताही त्रास होत नाही. या यंत्रामुळे रोज पाच ते सहा पट जास्त बी मिरचीपासून वेगळे केले जाऊ शकते.

         डॉ.फिरके यांना या यंत्राचा संशोधन केल्याबद्दल कृषी अभियांत्रिकी समिती, नवी दिल्ली यांच्यातर्फे आर. के. जैनस्मृती पुरस्कार १९९०मध्ये देण्यात आला होता. पंजाबराव कृषी विद्यापीठाने त्यांना १९९०-१९९१मध्ये डॉ. के.जी. जोशी पुरस्कार दिला. जमिनीतून जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी वर ओढून घेण्यासाठी एका वॉल्व्हची आवश्यकता असते. हे यंत्र फार महाग आहे. म्हणून त्यांनी कमी किमतीचा रायझर वॉल्व्ह विकसित केला असून तो वापरण्यास अतिशय सोपा आहे. 

         फिरके यांनी डॉ.पं.कृ.वि.मार्फत ४०० मिनी दालमिल, धान्य स्वच्छता व प्रतवारी करणारी ९५ यंत्रे व ९ मिरची बीज निष्कासन यंत्रे आणि १६०० रायझर वॉल्व्ह प्रसारित केले आहेत. त्यांचे संशोधन शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहे. त्यांनी महाराष्ट्रात १५७५ प्रशिक्षण वर्ग घेेऊन उद्योजकांना मार्गदर्शन केलेले आहे. या यंत्रांबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी १६ देशांतून त्यांच्याशी संपर्क साधला गेला आहे. त्यांनी आकाशवाणी नागपूर आणि अकोलावर आपल्या यंत्रांबाबत जनतेला मार्गदर्शन केले आहे.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

फिरके, प्रभाकर सुपडू