Skip to main content
x

राजहंस, नारायण श्रीपाद

बालगंधर्व

        संगीत रंगभूमीवर सतत ५० वर्षे नानाविध स्त्री- भूमिका करीत असताना आपल्या मधाळ गायकीने आणि स्त्री-सुलभ मोहक अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कलाकार म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व. सातारा जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातले नागठाणे हे राजहंस घराण्याचे मूळ गाव. राजहंसांचे मूळ आडनाव कुलकर्णी. नारायणाच्या जन्मापूर्वीच कुलकर्ण्यांचे ‘राजहंस’ झाले होते. श्रीपादराव आणि अन्नपूर्णाबाई या दाम्पत्याच्या पोटी, संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांनी नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील उत्तम सतारिये होते. सकाळच्या वेळी वडील, आई, तसेच हरिआत्या हे मंजूळ आवाजात भूपाळ्या गात असत. नारायणरावांवर गाण्याचे प्रथम संस्कार हे असे झाले. त्यांचे मामा वासुदेवराव पुणतांबेकर हे नाट्यकला प्रवर्तक मंडळीच्या संस्थापकांपैकी एक होते. अशा तर्‍हेने नाटकाचा वारसा त्यांना मातुलगृहाकडून मिळाला.

        वडिलांची नोकरी फिरतीची असल्याने छोट्या नारायणाला शिक्षणासाठी आत्येबहिणीचे यजमान  आबासाहेब म्हाळस यांच्याकडे जळगाव येथे ठेवण्यात आले. तिथे नारायणास संगीत नाटके पाहण्याची संधी मिळाली. शिक्षणापेक्षा त्याचा गायनाकडे जास्त ओढा आहे हे लक्षात येताच मेहबूब खाँ यांच्याकडे तालीम घेण्यास सुरुवात झाली. स्पष्ट शब्दोच्चार आणि सुरेल गायनाचे संस्कार तेथेच झाले. वयाच्या दहाव्या वर्षी चुलत चुलते यशवंतराव कुलकर्णी यांच्याकडे, पुण्यात आल्यानंतर लोकमान्य टिळक यांच्यासमोर त्यांना गायन सादर करण्याची संधी मिळाली. त्याच वेळी डिसेंबर १८९८ मध्ये नारायण राजहंसांना ‘बालगंधर्व’ ही पदवी टिळकांनी दिली. शाहू महाराजांच्या आशीर्वादाने १९०५ मध्ये त्यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश झाला.

        शारदा नाटकातल्या नटीच्या भूमिकेत त्यांची प्रथम रंगीत तालीम घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर किर्लोस्कर नाटक मंडळीत नारायणरावांची सर्व नायिकांच्या भूमिकांसाठी निवड झाली.

        अभिनयाच्या मार्गदर्शनासाठी गोविंद बल्लाळ देवल हे गुरू लाभल्याने स्त्री-भूमिकांसाठी आवश्यक असलेले सर्व बारकावे शिकायला मिळाले. पुढे काकासाहेब खाडिलकर, गणपतराव बोडस यांनीपण बालगंधर्वांना गद्याची तालीम दिली. स्त्री-भूमिका करताना सौंदर्याबरोबरच त्यांनी शालीनता, सोज्ज्वळता व घरंदाजपणा यांचे दर्शन घडवले. त्यांची कोणतीही स्त्री-भूमिका कधीही छचोर वाटली नाही. त्यांना ईश्वरदत्त गोड गळा लाभला होता. स्वराशी, लयीशी आत्मविश्वासाने चाललेला सहजसुंदर खेळ हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य होते. खास त्यांच्यासाठी काकासाहेब खाडिलकरांनी ‘मानापमान’ हे नाटक लिहिले. त्याची संगीतरचना गोविंदराव टेंबे यांनी केली. दादरा-ठुमरी हा बाज मराठी संगीत रंगभूमीवर आला आणि बालगंधर्वांनी तो त्याच नजाकतीने सादर केला.

        ‘स्वयंवर’ नाटकासाठी भास्करबुवा बखले यांनी रागदारी चिजांवर आधारित संगीतरचना केली. त्यांनी प्रत्येक मूळ चीज आधी बालगंधर्वांना शिकवली व नंतर त्यावर आधारित पद शिकवले. त्यामुळे कोणत्याही रागाचे मूर्तिमंत  स्वरूप अल्पावधीतच प्रकट करण्याचे कसब बालगंधर्वांना प्राप्त झाले. १९०५ ते १९२० हा बालगंधर्वांचा, संगीत रंगभूमीवरचा सुवर्णकाळ होता. सुभद्रा, शकुंतला, भामिनी, रुक्मिणी, देवयानी, द्रौपदी, सिंधू अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि वेगवेगळ्या संगीताने नटलेल्या नायिका सादर करताना बालगंधर्वांनी स्वर्गीय गायनाचा आणि मोहक अभिनयाचा आविष्कार घडवला. त्यांच्याइतक्या विविध स्त्री-भूमिका कोणत्याही पुरुष नटाने केलेल्या नाहीत.

        त्यांनी १९१३ मध्ये स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी स्थापन केली. सुरुवातीला भागीदारीत असलेल्या या कंपनीची पुढे त्यांच्या एकट्याकडेच मालकी राहिली. गंधर्व नाटक मंडळीचे मालक म्हणून त्यांनी नेहमी गुणी कलावंतांचा संग्रह केला. गायक, साथीदार, सहकलाकार, बॅकस्टेजचे कलाकार असे मिळून १०० जण कंपनीत असत. सगळ्यांची यथोचित बडदास्त ठेवलेली असे. सर्वांना राहण्यासाठी जागा, सुग्रास जेवण, प्रत्येकाला अगत्याची वागणूक या सगळ्यांमुळे नाट्यसंस्थेच्या इतिहासात असा मालक होणे नाही, असे म्हटले जात असे.

        नाटकाची निर्मिती करताना कथानकाला आवश्यक ती सर्व वेशभूषा, दागदागिने, पडदे, सेट तयार केले जात. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये असाच विचार असायचा. या गोष्टींमुळे कंपनीचा खर्च वाढून कर्ज झाले तरी प्रयोग त्याच दिमाखदार पद्धतीने सादर केले जायचे. आलेल्या रसिकांना नाटकाचा शंभर टक्के आनंद मिळाला पाहिजे हाच हेतू त्यामागे होता. त्यांच्या रसिकांमध्ये मराठी, गुजराती, पारशी अशा सर्वांचा समावेश होता.

        बालगंधर्व स्त्री-भूमिका करत असले तरी रंगमंचाखेरीज इतर वेळी त्यांनी कधीही स्त्रीचा पोशाख केला नाही. सत्चारित्र्याची त्यांची वागणूक पाहून एकूणच नटांविषयीची अनिष्ट भावना नाहीशी होऊ लागली. सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून त्यांनी कित्येक प्रयोग मदतीकरिता, विनामूल्य केले. केशवराव भोसले यांच्यासह केलेल्या ‘संयुक्त मानापमाना’च्या प्रयोगातून टिळक स्वराज्य फंडाला त्यांनी १६,५०० रुपये देणगीदाखल दिले.

        गंधर्व कंपनीला आर्थिक अडचणीतून मुक्त करण्यासाठी नाइलाजाने त्यांनी प्रभात कंपनीशी करार करून चित्रपटात जाण्याचा निर्णय घेतला.त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मात्मा’ हा चित्रपट १९३५ साली आला. पण चित्रपटाने त्यांना विशेष आनंद दिला नाही व पुन्हा ते रंगभूमीकडेच आले.

       ‘साध्वी मीराबाई’ हा त्यांचा दुसरा चित्रपट प्रदर्शित १९३७ साली झाला. वसंत शांताराम देसाई यांचे ‘अमृतसिद्धी’ हे नाटक बालगंधर्व करीत असत, त्यावरून केलेला हा नाट्य-चित्रपट (स्टेज टॉकी) होता. बालगंधर्वांचे स्त्री-वेशातील दर्शन यात घडते. ‘विठ्ठल रखुमाई’ हा त्यांचा तिसरा व अखेरचा चित्रपट. यातील संत तुकारामांच्या भूमिकेत त्यांनी गायलेल्या (संगीत : सुधीर फडके) पाच अभंगांची ध्वनिमुद्रिका निघाली होती.

       एकंदर १९०५ ते १९५५ या पन्नास वर्षांत त्यांनी साकारलेल्या नायिकांना रसिकांनी दिलेली उदंड दाद आणि रसिकांचे निरपेक्ष प्रेम हा त्यांच्या आयुष्यातला सर्वांत मोठा आनंद होता. वैयक्तिक दु:ख नेहमीच मागे सारून त्यांनी संगीत रंगभूमीची एकनिष्ठपणे सेवा केली. त्यांना १९४४ साली रंगभूमीच्या शतसांवत्सरिक महोत्सवाचे अध्यक्षपद मिळाले. त्यांना १९४५ साली कोल्हापूर नगरपालिकेने मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना १९५५ मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपतिपदक मिळाले, तर १९६४ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी देऊन बालगंधर्वांचा सन्मान केला.

       त्यांचा अमृतमहोत्सव ९ फेब्रुवारी १९६४ रोजी भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. स्त्री-भूमिका साकारताना फक्त स्त्री-सौंदर्याचेच नाही, तर स्त्रीच्या अंतरंगाचे दर्शन घडवणाऱ्या आणि रसिक प्रेक्षकांची ‘मायबाप’ म्हणून पूजा करणार्‍या ह्या कलावंताला पुणे येथे देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात पुणे, मिरज येथे बालगंधर्व रंगमंदिर बांधण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ज्येष्ठ कलावंताला दरवर्षी ‘बालगंधर्व’ पुरस्कार देऊन गौरव करीत आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे माधवराव शिंदे पुरस्कृत बालगंधर्व सुवर्णपदक, तर महाराष्ट्र सरकारतर्फे बालगंधर्व पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जात आहे.

       महाराष्ट्रभर १९९७-९८ मध्ये बालगंधर्व जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. यात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यसंगीत स्पर्धा, संगीत नाटक शिबिर असे वेगवेगळे उपक्रम विविध संस्थांनी आणि महाराष्ट्र सरकारने राबवले.

वर्षा जोगळेकर

राजहंस, नारायण श्रीपाद