Skip to main content
x

राजमाने, भीमाशंकर

      कुक्कुटपालन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या भीमाशंकर राजमाने यांनी उस्मानाबादमधील उमरगा येथे शालेय शिक्षण घेतले. त्यांनी १९७२मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच. ही पदवी प्राप्त केली. पुढे कुक्कुटपालनशास्त्र या विषयात त्यांनी एम.व्ही.एस्सी. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्या.

      डॉ.राजमाने यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून  नोकरीची सुरुवात केली.  पुढे कुक्कुटपालनशास्त्र विषयाचे प्राध्यापकपद विस्तार विषयासोबतच त्यांना प्राप्त झाले. सेवाकाळातील शेवटच्या पाच वर्षांच्या कालखंडात त्यांनी पशु-संवर्धन, दुग्ध व्यवसाय, विस्तार आणि कुक्कुटपालन या (एकत्रित) विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.

      राजमाने यांचे ४५ तांत्रिक लेख विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. वेगवेगळ्या चर्चासत्रांत आणि मेळाव्यांमध्ये त्यांनी ६५ लेख सादर केले. त्यांच्या ३८ विस्तारविषयक पुस्तिका व पत्रके प्रकाशित झाली. त्यांनी आकाशवाणीवरील अनेक भाषणांत व कार्यक्रमांत भाग घेतला. ग्रामीण आणि बेरोजगार युवकांसाठी विविध योजनांतर्गत त्यांनी कुक्कुट व तितरपालनविषयक शिबिरे आयोजित केली होती. अखिल भारतीय कुक्कुट (व्यावसायिक) संघटनेने कुक्कुटपालनशास्त्रातील संशोधनाबद्दल आणि विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघटनेमध्ये सन्माननीय पद देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना २००८मध्ये अखिल भारतीय कुक्कुटपालनशास्त्र संघटनेने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. ते जागतिक कुक्कुटपालनशास्त्र संघटनेचे उपाध्यक्ष आणि या संघटनेच्या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळाचे सदस्य होते. त्यांनी १९९८मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय कुक्कुटपालनशास्त्र संघटनेची १३वी वार्षिक सभा आणि राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले. नवी दिल्ली १९९६मध्ये येथे झालेल्या जागतिक कुक्कुट परिषदेच्या युवक कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते व्हॉलिबॉलचे राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर निष्णात खेळाडू म्हणून ओळखले जात. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी आंतरविद्यापीठ व्हॉलिबॉल स्पर्धा, तसेच जागतिक आंतरविद्यापीठ व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित केली होती. कॅनबरा येथे १९९४मध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या कनिष्ठ आशियाई चषक व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये तसेच १९८६मध्ये दक्षिण कोरियातील सेऊल येथे झालेल्या १०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ते स्पर्धेचे पंच होते.

- संपादित

राजमाने, भीमाशंकर