Skip to main content
x

राजुरकर, मालिनी वसंत

मालिनी वसंत राजुरकर (पूर्वाश्रमीच्या प्रभा वासुदेव वैद्य) यांचा जन्म अजमेर येथे झाला. त्यांचे वडील वासुदेव विश्वनाथ वैद्य व आई शारदाबाई हे अत्यंत शालीन, सरळमार्गी दांपत्य असल्याने घरात संस्कारपूर्ण वातावरण होते. वडील सैनिकी शाळेत शिक्षक होते, मात्र घरात सर्वांना संगीताची रुची होती ग्वाल्हेर घराण्याचे पं.राजाभैया पूछवाले यांचे शिष्य पं. गोविंदराव राजुरकर हे अजमेरच्या गायनशाळेत प्राचार्य होते, त्यांच्याकडे प्रभा वैद्य विद्यालयीन पद्धतीने सात वर्षे शिकल्या. त्यांना राजस्थान संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्तीही मिळाली. ग्वाल्हेरच्या शिक्षण विभागाच्या ‘संगीत रत्न’ (१९५९) व ‘संगीत निपुण’ (१९६०) या पदव्या त्यांनी मिळवल्या.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षणातही उत्तम चमकणार्‍या प्रभा वैद्यांना खरे तर गणित या विषयातच कारकीर्द करायची होती. त्यानुसार त्यांनी १९६० साली राजस्थान विद्यापीठातून गणित विषयात पदवी मिळवली. त्यांनी १९६० ते १९६२ अशी तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स महाविद्यालयात गणित, इंग्रजी व संगीत हे विषय शिकवले. त्यांचा ७ जुलै १९६४ रोजी विवाह ग्वाल्हेर येथील वसंत राजुरकर यांच्याशी झाला. विवाहानंतर पं.राजाभैयांचेच शिष्य असणार्‍या पती वसंतराव यांच्याकडे त्यांचे संगीत शिक्षण चालू राहिले. वसंतरावांनी आपल्या पत्नीतील कलागुण जाणून तिच्या संगीत व्यासंगाला पाठिंबा दिला.मालिनी राजुरकरांची १९६४ साली पहिली जाहीर मैफल अजमेरच्या महाराष्ट्र मंडळात झाली. पती वसंतराव यांना १९६५ साली  हैद्राबादच्या महाविद्यालयात संगीताचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाल्याने ते हैद्राबादेस स्थायिक झाले. येथून पुढे हैद्राबाद, धारवाड, हुबळी इ. ठिकाणी कार्यक्रम सुरू झाले.
मुंबईत १९६६ साली मालिनी राजुरकरांचा पहिला कार्यक्रम झाला व त्यास उपस्थित असणार्‍या विदुषी माणिक वर्मा व पं. जसराज यांनी त्यांचे कौतुक केले. याच वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्या गायल्या व त्यांचे नाव ठळकपणे रसिकांपुढे आले. या कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी व पं.वसंतराव देशपांडे यांनी त्यांचे खास कौतुक केले. यानंतर ग्वाल्हेरच्या तानसेन समारोहासह देशभरच्या सर्व मान्यवर रंगमंचांवरून त्यांनी कलाप्रस्तुती केली. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात पं. भीमसेन जोशी हे त्यांना दरवर्षी आग्रहाने पाचारण करीत, यावरून त्यांची एका दिग्गज कलाकाराने केलेली पारख व रसिकप्रियता या दोन्ही बाबी लक्षात येतात. त्यांनी अमेरिका, कॅनडा (१९८० व १९९५), ब्रिटन (१९८४), मस्कत, दुबई इ. आखाती देश (१९९० व १९९८), बांग्लादेश (१९९८) असे परदेश दौरेही केले. आकाशवाणीच्या त्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार असून १९६७ पासून त्या आकाशवाणी व दूरदर्शनवर नियमितपणे गात आहेत.
एच.एम.व्ही.ने १९७१ साली त्यांची पहिली इ.पी. ध्वनिमुद्रिका (‘नरवर कृष्णासमान’ व ‘पांडुनृपती जनक जया’ ही दोन नाट्यगीते) काढली, ती गाजल्यामुळे १९७९ साली रागगायनाची पहिली एल.पी. (भूपाल तोडी, कैशिकरंजनी, खमाज टप्पा) निघाली व तिलाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर एच.एम.व्ही., म्युझिक टुडे, व्हीनस, इंडिया टुडे, अलूरकर म्युझिक हाऊस, इ. कंपन्यांनी मालिनीताईंच्या अनेक ध्वनिमुद्रिका काढल्या व त्यांच्या सुमारे ४० रागांतील ख्याल, टप्पे, तराणे ध्वनिमुद्रणांद्वारे रसिकांना उपलब्ध आहेत. मूळ मराठी असून अजमेर येथे जन्म व बाल्यकाल गेलेल्या, नंतर हैद्राबादेत स्थित असलेल्या मालिनी राजुरकरांचा महाराष्ट्रात फार मोठा चहाता रसिकवर्ग आहे व त्यांनी मराठी रसिकांची संगीताभिरुची जोपासली आहे.
मुख्यत: ख्याल व टप्पा या गानप्रकारांसाठी प्रसिद्ध असणार्‍या मालिनी राजुरकरांच्या ख्यालगायकीबाबत असे म्हणता येते, की ‘विद्यालयीन सतशिक्षण पद्धतीतील मैफलीच्या दर्जास आलेल्या गायकीचे हे एक उत्तम व प्रातिनिधिक मानावे असे उदाहरण आहे.’ पारंपरिक रीतीचे तालमीचे गाणे मालिनीताईंच्या वाट्यास आले नसले तरीही आपल्या गायकीस बाळबोध न ठेवता, तालमीच्या गायकीतील अस्सलपणा, मूलतत्त्वे व सौंदर्यस्थळे त्यांनी अंगीकारली. सातत्याने रियाझ व चिंतनातून गायकीस बुलंद केले. के.जी. गिंडे, बाळासाहेब पूछवाले, प्रभाकर चिंचोरे, जितेंद्र अभिषेकी अशा अनेक बुजुर्गांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी गाणे समृद्ध केले.
एके काळी पं. कुमार गंधर्व, गंगूबाई हनगल, माणिक वर्मा यांचा विशेष प्रभाव त्यांच्या गायकीत जाणवत असे; यथावकाश या प्रभावांतून बाहेर येत त्यांनी स्वत:ची अशी खास धाटणी बनवली व ती रसिकप्रियही झाली. स्वच्छ, खुला आवाज, स्पष्ट गानोच्चार, रागशुद्धता, बंदिशींची नेटकी प्रस्तुती, सरगमचा लयकारीतील वापर, दाणेदार व आखीवरेखीव तान, एकंदर गायनातील जोमदारपणा, प्रसन्नता ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिक बंदिशींबरोबरच आधुनिक काळातील   श्री.ना. रातंजनकर, गोविंदराव नातू, दिनकर कायकिणी, सी.आर. व्यास, जितेंद्र अभिषेकी, रामाश्रय झा, बलवंतराय भट्ट, इ. वाग्गेयकारांच्या बंदिशी मैफलींतून सातत्याने मांडून त्या लोकप्रिय करण्याचे श्रेयही मालिनी राजुरकरांना जाते. ख्यालाबरोबरच तरुणपणी त्या ठुमरी फार नजाकतीने गात असत व त्यावर उ. बडे गुलाम अली यांची छाप दिसे.
गंधर्वगायकीतली नव्हे, तर अभिषेकी प्रणीत नाट्यपदे त्या मैफलीत क्वचित गात असत. ख्यालशैली अंतर्गत असणारे तराना, खयालनुमा तराना, त्रिवट, अष्टपदी, रागमाला, टपख्याल, बंधीठुमरी वा बोलबंदिशी इ. विविध प्रकार त्यांनी ताकदीने सादर केले. साधारणत: विद्यार्थिदशेतच गायले जाणारे सरगमगीत व लक्षणगीत हे प्रकारही त्यांनी मैफलींतून कल्पकतेने पेश केले आहेत. आमरागांसह चक्रधर, कैशिकरंजनी, ओडव बागेश्री, देवरंजनी, गुणरंजनी, चारुकेशी, बसंतमुखारी, विजयानगरी हे अधुनाप्रसिद्ध रागही त्यांनी वारंवार मैफलीत गायल्याने ते प्रचलित होण्यास चालना मिळाली.
बुद्धी व गळा या दोन्हींची तयारी, चपळाई व चमक आवश्यक असणारे टप्पागायन ही मालिनी राजुरकरांची खासियत आहे. त्या काळात काहीशी लुप्तप्राय झालेली, ग्वाल्हेर घराण्यातील पंजाबी ठेक्यातील चुस्त अशी ही टप्पागायकी त्यांनी मैफलींतून सातत्याने मांडली व तिला पुन्हा झळाळी दिली, त्यात प्रयोगशीलता आणली. साधारणत: पाच-दहा मिनिटेच गायल्या जाणार्‍या या प्रकारास त्यांनी वीसपंचवीस मिनिटांपर्यंत नेले. ही नुसती वेळेची वाढ नव्हती; त्यांनी टप्पागायकीतील सांगीतिक आशय, मांडणीतील तंत्र, घटकांचा वैविध्यपूर्ण वापर व नाविन्य यांबाबतही भर घातली व हा गानप्रकार एका उंचीस नेला. आजच्या पिढीस टप्पागायकीची आवड त्यांनीच लावली व त्यामुळे या दुर्लक्षित गानशैलीकडे अनेक तरुण कलाकार पुन्हा वळले, हे मालिनी राजुरकरांचेे मोठे योगदान आहे
केवळ पतीच्या आग्रहाखातर व्यावसायिक कलाकार म्हणून पुढे आलेल्या मालिनीताईंनी संसार व संगीत हे दोन्ही नेटाने सांभाळले. अनेक दशकांचा अ‍ॅलर्जिक ब्रॉन्कायल दमा, उत्तरायुष्यात गुडघ्यांच्या विकारावर मात करून त्या जिद्दीने गायल्या. ‘आधी चांगली व्यक्ती, नागरिक असावे, नंतर कलाकार’ ही त्यांची कायमच भूमिका राहिल्याने परिपक्व व समतोल विचारांच्या, निगर्वी व पारदर्शी स्वभावाच्या मालिनी राजुरकरांनी आपल्या माणुसकीच्या तत्त्वांस कधीही मुरड घातली नाही. त्यामुळेच संगत-कलाकार, संयोजक, रसिक या सर्वांशी त्यांचे सौहार्दाचे नाते राहिले.
‘फाय फाउण्डेशन’ पुरस्कार (१९९१, इचलकरंजी), जागतिक मराठी परिषदेतर्फे सत्कार (१९९९), षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त विदुषी गंगूबाई हनगळ व पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते सत्कार (२००१), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (२००१), ‘आंध्र अकादमी’ सन्मान (२००२), मध्यप्रदेश सरकारचा ‘तानसेन’ सन्मान (२००५), ‘उ. हाफिज अली खान’ पुरस्कार (२००५), मंगेशकर कुटुंबीयांतर्फे ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती’ पुरस्कार (२००८), पुणे भारत गायन समाजातर्फे ‘माणिक वर्मा’ पुरस्कार (२०१०) यांद्वारे मालिनी राजुरकरांचा गौरव करण्यात आला आहे. 

चैतन्य कुंटे

राजुरकर, मालिनी वसंत