Skip to main content
x

रामाणी, शंकर पांडुरंग

     आधुनिक मराठी कवितेतील एक लक्षणीय नाव कवी शंकर रामाणी हे असून त्यांचा जन्म गोवा प्रदेशातील बारदेस भागातील वेरे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी व पुढचे शिक्षण वास्को येथील पोर्तुगीज शाळेत झाले. ते मॅट्रिकपर्यंत शिकले. निम्न मध्यमवर्गीय स्तरातील शंकर रामाणी यांची राहणी साधी होती.

     गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्यात त्यांनी नोकरी केली आणि वरिष्ठ कारकून ह्या पदावरून ते निवृत्त झाले व बेळगाव येथे स्थायिक झाले.

     रामाणींचा ओढा कवितालेखनाकडे होता. त्यांची पहिली कविता १९३७मध्ये ‘मनोहर’ मासिकात प्रसिद्ध झाली. रामाणींनी सातत्याने व निष्ठेने, अंतर्मुख वृत्तीने काव्यलेखनास जन्मभर वाहून घेतले. त्यांची कविता नेहमीच समकालीन प्रवृत्तींचा संस्कार व्यक्त करीत राहिली. ती आत्ममग्न राहून प्रीती, निसर्ग आणि जीवन ह्यांचा दुःखात्म प्रत्यय हळुवारपणे प्रकट करते. ‘दर्पणीचे दीप’ हा त्यांचा प्रसिद्ध कवितासंग्रह (१९९२). प्रसिद्ध समीक्षक आणि मौजेचे प्रकाशक श्री.पु.भागवत यांच्याबद्दल त्यांना विशेष ओढ होती. समकालीन पु.शि.रेगे, प्रल्हाद वडेर, इंदिरा संत ह्यांसारख्या स्नेहमंडळींशी त्यांचे सख्य होते. साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांशी त्यांचा पत्रव्यवहार असे. इंदिराबाईंच्या ‘गर्भरेशमी’ ह्या काव्यसंग्रहाचे शीर्षक रामाणींनी सुचविल्याचे नमूद आहे. अतिशय आत्ममग्न असा हा कवी, कवितेला साधना मानणारा होता. प्रामुख्याने छंदोबद्ध व गेय कविता लिहिण्याचा त्यांचा प्रघात होता. त्यांची कविता औदासीन्याने वेढलेली निराशेचे स्वर आपलेसे करणारी आणि दुःखात्म प्रत्यय प्रकट करणारी आहे, म्हणूनच की काय; ती कधी-कधी दुर्बोधतेकडे झुकते.

     रामाणींच्या कवितेचे स्वतःचे असे काहीसे गूढ, अज्ञेयाची वाट शोधणारे भावविश्व आहे. गोव्यात वास्तव्य असूनही निसर्गसौंदर्य टिपण्याची किंवा निसर्गप्रतिमांनी आशय व्यक्त करण्याची तिला ओढ नाही. पु.शि.रेगे यांच्या कवितेचे संस्कार रामाणी ह्यांच्या प्रारंभिक कवितेवर दिसतात. निसर्गाचे शोकमग्न रूप, जीवनाची गूढता हे त्यांच्या कवितांचे विषय होते. क्वचित त्यातून अध्यात्माची ओढ जाणवे.

     त्यांची लौकिक जीवनातील वृत्ती दुःख, नैराश्य वा अडचणी यांविषयी तकरार न करण्याची होती. तसेच अनाम दुःख सहन करून सारायचे, ही रीत होती.  विनापत्य असल्याचा सल त्यांना कधी-कधी जाणवत असे.

     कवी ग्रेस यांच्या कवितेचे विशिष्ट आकर्षण त्यांना वाटत असे. त्यांच्या स्वतःच्या कवितेत अनाम दुःखाचे प्रकटन करताना प्रतिमांचा गुंता झाल्याचे जाणवते. कवी द.भा.धामणस्कर यांची कविता आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

     कवितेत मग्न असणार्‍या या कवीचे ‘कातरवेळ’ (१९५९), ‘आभाळवाटा’ (१९६७), ‘पालाण’ (१९७९), ‘दर्पणीचे दीप’ (१९९२), ‘गर्भागार’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘सूर्यफुले’ हा बालगीतसंग्रह (१९४९) त्यांच्या नावावर आहे.

     ‘निळे निळे ब्रह्म’ या त्यांच्या कोकणी काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘आभाळवाटा’ आणि ‘दर्पणीचे दीप’ या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरविले.

     कवितेव्यतिरिक्त कोणताही साहित्यप्रकार त्यांनी हाताळलेला दिसत नाही. भावमग्न अशा त्यांच्या कवितेने ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले’ ही भावना उजागर केली आहे.

- प्रा. अनुराधा साळवेकर

रामाणी, शंकर पांडुरंग