Skip to main content
x

रानडे, प्रतिभा पंढरीनाथ

     प्रतिभा रानडे (पूर्वाश्रमीच्या प्रतिभा गणेश भिडे) यांचा जन्म पुण्याचा असून त्यांचे बालपण कोल्हापुरात गेले. १९५४ साली ‘महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल’मधून त्या शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९५८ साली राजाराम महाविद्यालयामधून त्या पदवीधर झाल्या व नंतर त्यांनी पत्रकारितेतही पदविका घेतली. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे त्यांनी काही काळ संशोधनकार्य केले. लेखिका म्हणून त्यांचे नाव विवाहानंतरच झाले. १९७४ साली ‘केसरी’तून पहिला लेख प्रसिद्ध झाला. अमृता प्रीतम या ज्ञानपीठ विजेत्या लेखिकेच्या ‘बंद दरवाजा’ या कादंबरीचे त्यांनी उत्कृष्ट भाषांतर केले आहे. १९७९मध्ये एकाच वर्षी त्यांनी ‘परकं रक्त’ हा कथासंग्रह आणि बहादूरशहा जफर या बादशहाच्या जीवनावरील ‘बदनसीब’ ही ऐतिहासिक कादंबरी वाचकांना दिली.

     शाम (पंढरीनाथ) म्हणजेच प्रसिद्ध वास्तुविशारद श्री.फिरोझ रानडे यांच्या प्रतिभा रानडे ह्या पत्नी होत. पतीच्या परदेशी असणार्‍या नोकरीमुळे इतर लेखिकांपेक्षा त्यांना वेगळा समाज, वेगळे जीवन यांचा जवळून परिचय झाला. त्यावर आधारित असे त्यांचे लेखन अनुभवाधिष्ठित, निरीक्षण आणि अभ्यासपूर्ण विवेचन असणारे आहे. त्यांनी त्यांच्या लेखनातून तेथील स्त्री-विश्वाचा विशेष वेध घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे स्वरूप केवळ प्रवासवर्णन असे न राहता ते सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय गाभ्यापर्यंत जाऊन परकीय भूमीवरील जीवनाचा वेध घेते. १९८२मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची ‘अफगाण डायरी’ केवळ नोंदस्वरूपातली नाही. १९८३मध्ये आलेल्या ‘काबूल कंदाहारकडील कथा’ याच वाटेवरून जाणार्‍या ठरल्या. ‘बुरख्याआडच्या स्त्रिया’ (१९८७), ‘ऐरणीवरचे प्रश्न: समान नागरी कायदा’ (२०००) ही त्यांची पुस्तके म्हणजे भारतीय स्त्री-मनाने मुस्लीम स्त्रियांच्या सामाजिक व धार्मिक प्रश्नांचा वस्तुनिष्ठ आलेख आहेत.

     प्रतिभा रानडे ह्यांनी ‘मानुषी’ (१९८४), ‘रेघोट्या’ (१९९९) या कादंबर्‍या लिहिल्या. ‘शुक्रवारची कहाणी’ (१९८७) नावाचा लेखसंग्रहही त्यांच्या नावावर आहे. सत्यान्वेषी आलेख मांडत त्या वैचारिक अंगानेच लेखनविश्वात रमतात.

    वैचारिक घडण अभ्यासण्यासाठी त्यांनी काही व्यक्तींवरही लेखन केले आहे. ‘यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी: एक आकलन’ (१९९६), ‘स्त्री-प्रश्नांची चर्चा: १९वे शतक’ (१९९१) आणि अतिशय गाजलेले असे पुस्तक म्हणजे ‘ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी’ (१९९८) या पुस्तकांतून प्रतिभाताईंची वैचारिक कुवत व्यक्त होते. म्हणूनच त्यांची ही पुस्तके आपल्याला अंतर्मुख करतात.

     त्यांना राज्य पुरस्कार लाभले आहेत. ‘मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलना’च्या (२००८) त्या अध्यक्षा होत्या. अफगाणिस्तानात वास्तव्य असताना खान अब्दुल गफारखान (सरहद्द गांधी) यांनी त्यांच्या घरी अचानक भेट दिली. हा त्यांना त्यांच्या जीवनातला सर्वांत मोलाचा आणि अविस्मरणीय प्रसंग वाटतो. इतर मराठी लेखिकांपेक्षा वेगळा संचार, वेगळी वृत्ती आणि वेगळी अभिव्यक्ती असलेली ही लेखिका अनुभवसमृद्ध ठरते.

- प्रा. सुहासिनी कीर्तिकर

रानडे, प्रतिभा पंढरीनाथ