Skip to main content
x

राव, बंडा वासुदेव

            बंडा वासुदेव राव यांचा जन्म हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पशु-वैद्यकीयशास्त्रातील पदविका प्राप्त केली. अनेक ठिकाणी नोकऱ्या करूनही त्यांना आनंद व समाधान मिळू शकले नाही. योगायोगाने १९६०च्या दशकातील प्रारंभीच्या काळात जागतिक अन्न व कृषी संघटनेच्या तांत्रिक सहकार्य मोहिमेंतर्गत भारतात प्रतिनियुक्तीवर आलेल्या अमेरिकेतील डॉ. अर्ल न. मूर या जागतिक ख्यातीच्या कुक्कुटशास्त्रज्ञांशी त्यांची भेट झाली. त्यांनी केलेल्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे डॉ. राव कुक्कुट व्यवसायाकडे आकृष्ट झाले. पुढील सुमारे साडेतीन दशकांत त्यांनी भारतातील कुक्कुट उद्योगाला नवी दिशा देण्याचे काम केले. अधिक अंडी देण्याची क्षमता असणाऱ्या कोंबड्यांच्या पिलांची कमतरता, समतोल खाद्याची गरज, रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी परिणामकारक लशींचे उत्पादन, तांत्रिक मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण, विक्रीसाठी योग्य दरनिश्‍चिती व पुरवठा व्यवस्था सुरळीत करणे इ. बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहेे हे डॉ. राव यांच्या लक्षात आले. परसदारापुरता मर्यादित असलेला कुक्कुटपालनाचा व्यवसाय आता अधिक लाभ देणारा अतिशय गतिमान उद्योग झाला आहे. या उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा व गती प्राप्त झाली. अनेक लघु व पूरक उद्योग सुरू झाले आणि राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात ४५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक भर घालणारा व लक्षावधी लोकांना चरितार्थाचे साधन पुरवणारा असा हा उद्योग झाला आहे. डॉ. राव यांनी दूरदृष्टीने योग्य वेळी घेतलेल्या अचूक व महत्त्वाच्या निर्णयांमुळे आणि धडाडीच्या कार्यामुळेच हे स्थित्यंतर घडले. यामुळेच ते ‘आधुनिक कुक्कुट उद्योगाचे जनक’ म्हणून ओळखले जातात.

          डॉ. राव यांनी १९७१मध्ये वेंकटेश्‍वरा हॅचरिज ग्रूप या संस्थेची स्थापना केली. शेतकऱ्यांना व कुक्कुटपालकांना न्यूनतम कालावधीमध्ये चांगल्या वंशावळीची एक दिवसाची पिले उपलब्ध व्हावीत, यासाठी त्यांनी संपूर्ण देशात ठिकठिकाणी खासगी केंद्रांना मार्गदर्शन, साहाय्य व करारबद्ध करून उबवणी केंद्राचे जाळे विकसित केले. या केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना पिलांसोबत तांत्रिक सल्लाही मिळू लागला. त्यामुळे  कुक्कुट क्षेत्रांची, कुक्कुटपालकांची आणि क्षेत्रांवरील पक्ष्यांची संख्या वाढू लागली. मांसल पक्ष्यांच्या जोपासनेच्या व्यवसायाबद्दल देशात फारशी माहिती नव्हती. अशा पक्ष्यांचे उत्पादन १९७०मध्ये सुमारे ४० लक्ष होते. डॉ. राव यांनी अमेरिकेतील कॉब कंपनीशी करार करून कॉब जातीचे पक्षी उपलब्ध केले. व्यवस्थापनात आवश्यक ते बदल करण्याबाबत प्रशिक्षण देऊन या व्यवसायाकडे अनेकांना आकर्षित केले. या मांसल पक्ष्यांच्या कार्यक्षमतेमुळे व चविष्ट मांसामुळे हा व्यवसाय किती तरी पटीने वाढला. आज सुमारे २०० कोटींपेक्षा जास्त पक्ष्यांचे उत्पादन घेतले जाते.

          भारतात १९७०व्या शतकाच्या अखेरपर्यंत कोंबड्यांसाठी रोगप्रतिबंधक लशी उपलब्ध नव्हत्या. काही लशी परदेशातून आयात कराव्या लागत. पुष्कळ वेळा लशी आयात केल्यावर त्या पक्ष्यांना टोचण्यासाठी वेळेवर प्रक्षेत्रापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. यातून मार्ग काढण्यासाठी १९७८मध्ये डॉ. राव यांनी पुण्याजवळ संस्थेचे लस उत्पादन केंद्र सुरू केले. प्रारंभी या केंद्रात फक्त ‘मरेक्स’ रोगप्रतिबंधक लस (जी पूर्वी आयात केली जात असे) केली जाऊ लागली, परंतु नंतरच्या काळात कोंबड्यांसाठी वापरावयाच्या सर्व लशींचे उत्पादन तेथे सुरू करण्यात आले. मृत पेशी (जिवाणू-विषाणू)पासून बनवलेल्या व एकत्रित केलेल्या (एका रोगापेक्षा अधिक रोगांच्या लशी) लशीचे भारतात या केंद्रामध्येच प्रथम उत्पादन सुरू झाले. सध्या येथील उत्पादित लसी केवळ भारतातच वापरल्या जातात असे नव्हे तर विविध देशांनादेखील पुरवल्या जातात.

          रोगांचे शक्य तेवढ्या कमी वेळात निदान व्हावे, सांसर्गिक रोगांचे संपूर्ण उच्चाटन व्हावे आणि यासंबंधी सतत संशोधन व्हावे यासाठी डॉ. राव यांनी पुण्याजवळ ‘कुक्कुट रोगनिदान व संशोधन केंद्र’ नावाने एक अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केली. या प्रयोगशाळेबरोबर देशातील १०० पैकी जास्त कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या साहाय्यक प्रयोगशाळा स्थापन केल्या. त्यामुळे मोफत रोगनिदान व्यवस्था व तांत्रिक मार्गदर्शन देण्याची अत्यंत कुशल सेवा उपलब्ध झाली. चांगली गुणवत्ता असलेल्या लसी निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने विहित केलेल्या कार्यप्रणालीमध्ये विशिष्ट जिवाणू-विषाणूमुक्त अंड्यांचा वापर अनिवार्य केला आहे. भारतात अशा अंड्यांचे उत्पादन होत नसल्याने त्याची आयात करावी लागत असे. डॉ. राव यांनी हा प्रश्‍न सोडवण्याचे ठरवले. त्यांनी अमेरिकेतील स्पाफास अशा तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व करणाऱ्या संस्थेबरोबर तांत्रिक सहकार्याचा करार केला आणि संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अंडी उत्पादन केंद्र सुरू केले. जगभरात अशी केवळ ४ ते ५ केंद्रे आहेत. त्यापैकी विकसनशील देशात कार्यरत असलेले हे एकमेव केंद्र आहे. या केंद्रामध्ये उत्पादित झालेली प्रमाणित अंडी कुक्कुट लसनिर्मितीसाठी तसेच मानवांसाठी वापरल्या जाणाऱ्या लसनिर्मिती उत्पादन केंद्रात व संशोधन प्रयोगशाळांमध्येसुद्धा वापरली जातात.

          उत्कृष्ट सुधारित वंशावळीची पिले निर्माण करण्यासाठी मूळ जातीचे शुद्ध कोंबडे व कोंबड्या भारतात आयात कराव्या लागत असत. हे अत्यंत जिकिरीचे व त्रासाचे काम होते. डॉ. राव यांनी यातून मार्ग काढण्यासाठी भारतातच कुक्कुट संशोधन व पैदास क्षेत्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. संस्थेने १९८०मध्ये अमेरिकेतील बॅबकॉक पोल्ट्री फार्म, इथाका (आताची आय.एस.ए. पैदास संस्था) आणि कॉब ब्रीडिंग (आताची कॉब व्हँटेस) अर्कोन्सस या संस्थांबरोबर अनुक्रमे अंडी उत्पादक पक्ष्यांसाठी आणि मांसल पक्ष्यांसाठी सहकार्य करार केले. या धाडसी पावलांमुळे भारतीय कुक्कुट उद्योगात क्रांतीची नांदी झाली आणि भारतीय हवामानात व वातावरणात तग धरणारी, अधिक अंडी उत्पादन करणारी आणि मांसल पक्षी निर्माण करणारी प्रक्षेत्रे स्थापन करण्यात आली.

          देशांतर्गत शुद्ध जातीचे पैदासक्षम कोंबडे व कोंबड्या जोपासण्यासाठी स्थापन केलेल्या शुद्ध पैदास संशोधन प्रक्षेत्रामुळे लक्षावधी डॉलर्सचे परकीय चलन वाचले आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादनामुळे अधिकाधिक फायदा मिळू लागला, आधी १९८०मध्ये प्रति कोंबडी अंडी उत्पादन २८० होते, ते २००१मध्ये ३२० इतके झाले. मांसल कोंबड्यांमध्ये १९८० मध्ये खाद्य रूपांतर प्रमाण २.५ किलो होते. ते २००२मध्ये १.७ किलोपर्यंत कमी झाले. त्याशिवाय विक्रीयोग्य वजन गाठण्यासाठी लागणारा कालावधी ४९ दिवसांवरून ४० दिवसांवर आला. यामुळे एका वर्षात पूर्वी फक्त ६ वेळा उत्पादन घेणारे कुक्कुटपालक ७ वेळा उत्पादन घेऊ लागले.

          भारतात १९७०च्या दशकात अंडी उत्पादनात, तर १९८०च्या दशकात मांसल पक्ष्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. पुढे १९९०च्या दशकाला प्रक्रियाविषयक प्रगती नोंदवायची होती. प्रक्रियाकरण आणि मूल्यवृद्धी या कुक्कुट व्यवसायातील अपरिहार्य बाबी होय. अन्यथा या व्यवसायाची प्रगती खुंटली असती आणि तो हळूहळू बंद पडण्याच्या मार्गाला लागला असता. या बाबी लक्षात घेऊन डॉ. राव यांनी १९८५मध्ये संस्थेचे कुक्कुट प्रक्रिया केंद्र सुरू केले. भारतामध्ये प्रथमच प्रक्रिया केलेले चिकन, लहानलहान व वेगवेगळ्या भागांचे चिकन, गोठवलेले चिकन आणि स्वयंपाकासाठी तयार चिकन मिळू लागले. ग्राहकांच्या सोयीचा आणि आरोग्याचा विचार केला गेला आणि मोसमानुसार दरामध्ये होणाऱ्या चढउतारांमुळे उत्पादकांचे होणारे नुकसान काही अंशी कमी करता आले. डॉ. राव यांनी हैदराबाद जवळ एक अंडी प्रक्रिया केंद्र सुरू केले. या केंद्राची दिवसाची प्रक्रिया क्षमता १० लक्ष अंड्यांची आहे. येथे तयार झालेली अंड्यांची भुकटी युरोप, जपान, आफ्रिका, मध्यपूर्व व अतिपूर्व देशांमध्ये निर्यात केली जाते.

          सुमारे ४० वर्षांपूर्वी १०,००० कोंबड्या असलेले प्रक्षेत्र मोठे प्रक्षेत्र म्हणून ओळखले जात होते, परंतु एक लक्ष आणि त्यापेक्षा जास्त पक्षी असलेली प्रक्षेत्रे आता कार्यान्वित झाली आहेत. या प्रक्षेत्रांवर सुरळीत कामांसाठी, आरोग्य रक्षणासाठी आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी उबवणी विभागापासून पाणी व खाद्य देण्याच्या विभागापर्यंत आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण आवश्यक होते. या गोष्टी साध्य करण्यासाठी डॉ. राव यांनी बेल्जियममधील रॉक्सेल कंपनीबरोबर सहकार्य करार करून व्ही.आर. यंत्रसामग्री ही उपकंपनी स्थापन केली. त्यामुळे वातावरण नियंत्रण, खाद्य व पाणीपुरवठा, पिंजरे, अंडी गोळा करणे इ. कामे करणारी स्वयंचलित यंत्रसामग्री उपलब्ध झाली. तसेच त्यांनी कॅनडामधील जेम्सवे इन्क्युबेटर कंपनीबरोबर सहकार्य करार करून व्ही.जे. यंत्रसामग्री ही दुसरी उपकंपनी स्थापन करून संगणक प्रणालीचा वापर असलेली उबवणी यंत्रे व इतर यंत्रे उपलब्ध करून दिली. अशा प्रकारची यंत्रसामग्री तयार होऊ लागल्याने जागतिक व्यापारामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.

          पूर्वी कुक्कुटपालनाविषयी तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण न घेतलेल्या व्यक्तींना या व्यवसायात अपयश व तोटा सहन करावा लागला व या व्यवसायाकडे लोक दुर्लक्ष करू लागले. तयार व्यक्तींना या व्यवसायाबद्दल सविस्तर तज्ज्ञ व कुशल मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने डॉ. राव यांनी १९८७मध्ये कुक्कुट व्यवस्थापन संस्था सुरू केली. पुढे या संस्थेला डॉ. राव यांचे नाव देण्यात आले. डॉ. बी.व्ही. राव कुक्कुट व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था या नावाने ही संस्था ज्ञानदानाचे व प्रात्यक्षिके दाखवण्याचे कार्य करते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे प्रक्षेत्र, मांसल पक्ष्यांचे प्रक्षेत्र, खाद्यनिर्मिती कारखाना व वर्गखोल्या, वसतिगृह, तज्ज्ञ, उच्च शिक्षित अधीक्षक यामुळे ही संस्था प्रसिद्धीला आली. या संस्थेत संपूर्ण भारतातील, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम, संयुक्त अरब अमिरात या देशांतील आणि जागतिक अन्न व कृषी संघटनेने प्रतिनियुक्त केलेल्या सुमारे ५००० व्यक्तींनी या संस्थेत प्रशिक्षण घेतले असून व्यवसाय सुरू केला आहे. या संस्थेमध्ये कुक्कुट व्यवसायातील व्यवस्थापनविषयक संशोधनही केले जाते. केंद्र शासनाच्या शास्त्र व तंत्रज्ञान खात्याने, नाबार्ड या संस्थेने आणि महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने या संस्थेला संशोधनविषयक कार्यासाठी मान्यता दिली.

          राष्ट्रीय अंडी समन्वय समितीची (नेक) स्थापना हे डॉ. राव यांनी भारतीय कुक्कुट उद्योगासाठी दिलेले बहुमोल योगदान आहे. पूर्वी देशातील अंडी विक्री व्यवसाय महानगरांतील आणि मोठ्या शहरांतील अगदी मोजक्या व्यापाऱ्यांच्या व दलालांच्या नियंत्रणाखाली चालत होता. आपल्याला नफ्यासाठी हे व्यापारी उत्पादकांना कमी किंमत देत. पुष्कळ वेळा त्यांचा अंडी खरेदीचा भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी असे व त्यामुळे अंडी उत्पादकांना नुकसान सोसावे लागे. अनेक व्यावसायिकांना व्यवसाय बंद करावा लागला व कुक्कुट व्यवसायाच्या अस्तित्वाबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. डॉ. राव यांनी या व्यापार्‍यांची व दलालांची अधिसत्ता उलथून टाकण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी सर्व अंडी उत्पादकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘माझे (कोंबडीचे) अंडे, माझी (मी ठरवलेली) किंमत, माझे (यशस्वी) आयुष्य’ या त्यांच्या घोषणेचा शेतकऱ्यांवर चांगला परिणाम झाला. डॉ. राव यांनी देशभर प्रवास करून ३०० पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि एका लाखांहून अधिक शेतकऱ्यांना स्वतः ठरवलेल्या किमतीला अंडी विकण्याचे आवाहन केले. शेतकरी व अंडी उत्पादक यांनी पुढाकार घेतल्याने राष्ट्रीय अंडी समन्वय समिती स्थापन झाली. आजमितीला २५,०००पेक्षा जास्त अंडी उत्पादक या समितीचे सदस्य असून ही जगभरातील सर्वात मोठी संघटना आहे. अंड्याचे दर ठरवण्याव्यतिरिक्त ही समिती अंडी खाणाऱ्यांच्या संख्येत वृद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करणे, व्यापारात मध्यस्थी करणे, ग्रामीण भागात पणन पुरवठा व्यवस्था नियमित करणे इ. कार्य करते. ही संस्था आंतरराष्ट्रीय अंडी आयोगावर भारताचे प्रतिनिधित्व करते. डॉ. बी.व्ही. राव यांच्या प्रयासांमुळे सप्टेंबर १९९६मध्ये नवी दिल्ली येथे झालेला विसावा जागतिक कुक्कुटपालकांचा मेळावा आणि आंतरराष्ट्रीय कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजन ही संस्मरणीय घटना ठरली. नगोया येथे १९८८मध्ये झालेल्या अठराव्या जागतिक मेळाव्यात, कॅनडा देश स्पर्धेत असताना डॉ. राव यांच्या प्रयत्नामुळे भारताला हा मेळावा आयोजित करण्याची अपूर्व संधी मिळाली. हा मेळावा आयोजित करण्याचे ठरल्यापासून आपल्या अखेरच्या श्‍वासापर्यंत जागतिक कुक्कुटशास्त्र संघटनेच्या भारतीय शाखेचे अध्यक्ष या नात्याने, डॉ. राव यांनी या मेळाव्यातील तांत्रिक चर्चासत्र गुणवत्तापूर्ण करून संपूर्ण प्रदर्शन संस्मरणीय व्हावे यासाठी तळमळीने कष्ट उपसले. नवी दिल्ली मेळाव्याचे यश हे त्यांच्या दक्ष नियोजनाचे, मार्गदर्शनाचे आणि नेतृत्वाचे द्योतक होते, पण दुर्दैवाने जानेवारीतच त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना आलेले यश ते पाहू शकले नाहीत.

          डॉ. राव यांच्या भारतीय कुक्कुट व्यवसायातील अतुलनीय योगदानाबद्दल आंध्र प्रदेशातील काकतीया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स ही सन्मानीय पदवी दिली. जागतिक कुक्कुटशास्त्र संघटनेकडून भारतीय कुक्कुट उद्योगातील महत्त्वाच्या कामगिरीबद्दल जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या सन्मानीय यादीत त्यांच्या नावाचा मरणोत्तर समावेश केला आहे.

- डॉ. वी.वै. देशपांडे

राव, बंडा वासुदेव