Skip to main content
x

राव, ससुर्ला राममोहन

        सुर्ला राममोहन राव यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. आंध्र विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बनारस हिंदू विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी प्राणिशास्त्रात डी.एस्सी. पदवी मिळवली. बनारस हिंदू विद्यापीठाची प्राणिशास्त्र या विषयात ही पदवी मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते. डॉ. राव १९३९मध्ये मुक्तेश्‍वर येथील भारतीय पशुवैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या परोपजीवी विभागात काम करणार्‍या नामवंत शास्त्रज्ञांच्या गटात सामील झाले होते; परंतु १९४३मध्ये वैयक्तिक कारणामुळे त्यांनी ती संस्था सोडली. त्यानंतर थोड्या कालावधीसाठी त्यांनी कोईमतूर (तामिळनाडू) येथील ऊस संशोधन संस्थेत परोपजीविशास्त्रज्ञ म्हणून काम केले.

        डॉ. राव १९४५मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय या त्यांच्या कर्मभूमीमध्ये परोपजीविशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. त्यांनी या महाविद्यालयात परोपजीवी विभाग सुरू केला आणि परोपजीवी विषयाचे पहिले प्राध्यापक म्हणून काम करू लागले. शास्त्रज्ञांच्या आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत त्यांनी १९५४-५५ या वर्षात अमेरिकेतील बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स संस्थेत काम केले आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यांनी इंग्लंड आणि जपान या देशांतील अनेक संशोधन संस्थांना भेटी दिल्या.

        डॉ. राव यांनी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय मंडळाचे (सिनेट) सदस्य आणि विविध कार्यकालांत तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम केले. ते भारतीय शास्त्रज्ञ संघटनेचे अनेक वर्षे सक्रिय सदस्य होते. त्यांची १९६८मध्ये संघटनेच्या वैद्यकीय व पशुवैद्यकीय (एकत्रित) विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ते १९६८मध्ये सेवानिवृत्त झाले; तथापि विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांची निवृत्तीनंतर ३ वर्षांसाठी सन्मानीय प्राध्यापक म्हणून निवड करून त्यांचा गौरव केला. त्यांना संशोधनाची आणि लेखनाची विशेष आवड होती. त्यांचे १२४ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. त्यांनी एम.एस्सी.च्या १६ विद्यार्थ्यांना आणि पीएच.डी.च्या तीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रकाशित होणार्‍या मासिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. त्यांच्या अविरत प्रयत्नांमुळेच या मासिकाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. भारतीय शास्त्रज्ञ संघटना, कोलकाता यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘पशुवैद्यकीय शास्त्राची एका दशकातील प्रगतीः १९६०-७०’ या पुस्तकाचे संपादन डॉ. राव यांनी केले.

        डॉ. राव यांनी अभ्यासला नाही असा परोपजीविशास्त्रात एकही उपविभाग नव्हता, पण विषशास्त्र, जीवनविज्ञानशास्त्र आणि पर्यावरण हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. गुरांमधील रक्ती हगवण (कोक्सीडीओसीस), गोचीड, सरा इ. रोगांसंबंधी डॉ. राव यांच्या योगदानाची दखल जगातील प्रख्यात शास्त्रज्ञांनी घेतली आहे.

        - संपादित

राव, ससुर्ला राममोहन