Skip to main content
x

रेळे, कनक यतींद्र

           मुंबईत जन्मलेल्या कनक रेळे या माधुरीबेन व शिवदास दिवेचा यांच्या कन्या होत. त्यांच्यातील कलागुण ओळखून लहान वयातच कलाप्रेमी आईने त्या काळचे कथकली नृत्यशैलीचे प्रख्यात गुरू करुणाकर पणीक्कर यांच्याकडे नृत्याची शिकवणी सुरू केली. लवकरच कनक रेळेंनी त्या कलेत नैपुण्य प्राप्त केले. त्या काळात कथकलीसारखी पुरुषप्रधान नृत्यशैली सादर करणार्‍या त्या एकमेव स्त्री-कलाकार होत्या.
      कलेबरोबरच शिक्षणातही अग्रेसर असलेल्या कनक रेळे पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशी रवाना झाल्या. इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठामधून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यात पदवी संपादन केली. भारतात परतल्यावर खरे तर भरपूर पैसा आणि सुखवस्तू जीवन देणारा व्यवसाय त्यांची वाट पाहत होता; पण नृत्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी ‘मोहिनीअट्टम्’ या केरळमधील शास्त्रीय नृत्यशैलीचे अध्ययन, तसेच संशोधन सुरू केले. या संशोधनासाठी त्यांना ‘फोर्ड फाउण्डेशन’ या अमेरिकेतील संस्थेने शिष्यवृत्ती बहाल केली. याच नृत्यशैलीवर आधारित शोधनिबंध त्यांनी मुंबई विद्यापीठात सादर केला व पीएच.डी. पदवी मिळवली.
     समाजमान्यतेवाचून दुर्लक्षित झालेल्या व पर्यायाने नष्ट होणार्‍या मार्गावर असलेल्या ‘मोहिनीअट्टम्’ या नृत्यशैलीस त्यांनी अक्षरश: जीवनदान दिले. गेली चाळीस वर्षे या नृत्यशैलीच्या संशोधनात, तसेच प्रचारात त्या व्यस्त आहेत. डॉ. कनक रेळे विविध सन्माननीय अशा राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवांतून आपले नृत्य सादर करतात. प्रख्यात नृत्यांगनाच नव्हे, तर त्या एक उत्तम शिक्षक, संशोधक, तसेच उत्तम नृत्यरचनाकार आहेत. शास्त्रीय नृत्यशैलीच्या माध्यमातून त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या ‘संतवाणी’, ‘शिलप्पदीकारम्’, ‘कल्याणी स्वप्नवासवदत्तम्’, ‘कांचनमृग’, ‘रुक्मिणी स्वयंवर’ या विविध नृत्यरचना त्यांच्यातील सर्जनशीलतेचे दर्शन घडवितात.
      शास्त्रीय नृत्यकलेला शिक्षणक्षेत्राच्या विद्यापीठीय स्तरावर नेऊन तत्संबंधी विविध अभ्यासक्रम राबविण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. नृत्यकलेच्या शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध शिक्षणासाठी त्यांनी १९७२मध्ये मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणार्‍या नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना केली. गेल्या ३०-३५ वर्षांत या नृत्यशाळेतून अनेक विद्यार्थी नृत्याचे शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. कनक रेळे यांच्या चतुरस्र मार्गदर्शनामुळे  हे आज देशातील नृत्य अध्ययनाचे, तसेच संशोधनाचे प्रमुख केंद्र बनले आहे.
      अनेक राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ‘पद्मश्री’ (१९९०, ‘कालिदास सन्मान’, ‘संगीत नाटक अकादमी अवॉर्ड’ (२००६), ‘गुजरात राज्य गौरव’ पुरस्कार, ‘नृत्यचूडामणी’, ‘कलाविपंछी’ इ. पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.२०१३ साली ‘पद्मभूषण’ सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

प्रा. माधुरी देशमुख

रेळे, कनक यतींद्र