Skip to main content
x

रजपूत, जयसिंग चंद्रसिंग

           यसिंग चंद्रसिंग रजपूत यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौगाव येथे झाला. त्यांचे वडील  प्रागतिक विचारांचे शेतकरी होते. जयसिंग यांचे शालेय शिक्षण दोंडाईचा येथे झाले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी कृषी अभ्यासक्रमासाठी धुळे येथे कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९७३मध्ये बी.एस्सी. (कृषी) व नंतर कृषी महाविद्यालय, दापोली येथून एम.एस्सी. (कृषी) या पदव्या प्रथम वर्गात विशेष प्रावीण्यासह प्राप्त केल्या. यानंतर त्यांनी बा.सा.को.कृ.वि.त उद्यानशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीची सुरुवात केली. दापोली येथेच १९८४मध्ये सहयोगी प्राध्यापक पदावर भाजीपाला-पैदासकार म्हणून त्यांची निवड झाली. सुरुवातीपासूनच त्यांनी भाजीपाल्याच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले होते. दापोली येथे भाजीपाला-पैदासकार म्हणून काम करत असताना (१९८४-९६) त्यांनी मिरचीची ‘कोकण कीर्ती’, दोडक्यांची ‘कोकण हरित’, कार्ल्याची ‘कोकण तारा’, पडवळाची ‘कोकण श्‍वेता’, घेवड्याची ‘कोकण भूषण’, शेवग्याची ‘कोकण रुचिरा’ अशा ९ जाती विकसित केल्या. व लागवडीसाठी प्रसारित केल्या. त्यांनी १९८४-८७ या कालावधीत प्रतिनियुक्तीवर बंगलोर येथून युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्सेसमधून भाजीपाला विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. अमेरिकेतील मिसीसिपी विद्यापीठात १९९०मध्ये त्यांनी पैदासशास्त्राचे विशेष प्रशिक्षण घेतले. त्यांच्या भाजीपाला पिकातील भरीव संशोधन कार्याबद्दल हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्याकडून सुवर्णपदक, तसेच १९९३मध्ये आबासाहेब कुबल हॉर्टिकल्चर अ‍ॅवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच भाजीपाल्यावरील उत्कृष्ट शास्त्रीय लेखाबद्दल त्यांना  वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद यांच्यामार्फत वसंतराव नाईक स्मृती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ‘महाराष्ट्रातील भाजीपाला लागवड’ या पुस्तकाबद्दल डॉ. राहुडकर ग्रंथ पुरस्कार समितीचा १९९५ साली उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार त्यांना देण्यात आला. राष्ट्रीय बियाणे महामंडळ, नवी दिल्ली यांनीही त्यांना भाजीपाला बियाणे उत्पादनासाठी पुरस्कार दिला. त्यांना १९९६ ते ९८ या कालावधीत वेंगुर्ला येथे सहयोगी संशोधन संचालक म्हणून नेमण्यात येऊन, त्या विभागाच्या संशोधन प्रकल्पाच्या नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. या पदावरून त्यांनी १९९८मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी एम.एस्सी.च्या १२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी भाजीपाला लागवडीसंबंधी ८ पुस्तके, ४४ संशोधनपर लेख, १८ तांत्रिक लेख व ४१ लागवडविषयक लेख प्रसिद्ध केले.

           जयसिंग रजपूत हे निवृत्तीनंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रजपूत येथे ‘निर्मल सीड्स’ या खासगी संस्थेत संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत. निर्मल सीड्सच्या संशोधन प्रयोगशाळा, ऊतीसंवर्धन व जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. येथेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पिकांच्या ७५ संकरित व सरळ जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

रजपूत, जयसिंग चंद्रसिंग