Skip to main content
x

रुईया, रमाबेन श्रीनिवास

     माबेन श्रीनिवास रूईया यांचा जन्म वर्धा येथे झाला. त्यांचे वडील गंगाबीसन बजाज हे जमनालाल बजाज यांचे चुलतबंधू होते. जमनालालजींचे महात्मा गांधींशी फार जवळचे संबंध होते. त्यामुळे बजाज कुटुंबाचाही गांधींशी आणि गांधी विचारांशी जवळचा संबंध आला. रमाबेनच्या आई लक्ष्मीदेवी बजाज या रोज चरख्यावर एक दीड तास सूत कातत व त्याच सुताचे कपडे वापरीत असत. खादीचे व्रत त्यांनी आयुष्यभर सांभाळले. महात्मा गांधींच्या संबंधांमुळे स्वातंत्र्य चळवळीचे वारे बजाज परिवारात वाहत होते. त्यामुळे लहानपणीच रमाबेनला राष्ट्रीय वृत्तीचे बाळकडू मिळाले. त्यांचे शिक्षण वर्ध्यातच झाले. हिंदी साहित्य आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी. ए. ची पदवी मिळवली. राष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षिकेचे काम करता यावे या हेतूने त्यांनी बी. एड. ही पदवीही मिळवली. त्यानंतर वर्ध्याचे महिलाश्रम ही त्यांची कर्मभूमी झाली.

     गुजराथ येथील साबरमती आश्रमातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून १९२४ मध्ये गांधींनी ‘हिंदू महिला मंडळा’ची स्थापना केली होती. स्वावलंबन आणि श्रमाधारित जीवन जगण्यावर यात भर होता. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी यांना पकडले. त्यामुळे साबरमती येथील मुलींच्या शिक्षणात खंड पडला. नंतर मुंबईचे उपनगर विलेपार्ले इथे १९३१ मध्ये एका भाड्याच्या घरात ‘महिलाश्रम’ नावाने मुलींसाठी एक संस्था सुरू झाली. ब्रिटिश सरकारने तिच्यावरही जप्ती आणली. त्यानंतर जमनालाल बजाज यांनी पुढाकार घेऊन महात्मा गांधी व विनोबाजी भावे आणि अन्य सहकारी यांच्या सल्ल्याने वर्ध्यात १९३३ साली ‘महिलाश्रम’ सुरू केला. बजाज कुटुंबातील एक बालविधवा गीताबाई रानीवाला (रूईया) यांच्याकडे महिलाश्रमाचे काम सोपविण्यात आले. त्यांचेच बंधू श्रीनिवास रुईया यांचेशी रमाबेन यांचा विवाह झाला. (पुढे रमाबेन महिलाश्रमाशी इतक्या समरस झाल्या की त्यांना सर्वजण ‘मामी’ म्हणू लागले.)

       महिलांमध्ये शिक्षणाद्वारा आत्मश्रद्धा जागृत करून त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची योग्यता निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट होते. त्या काळात राष्ट्रीय शिक्षणाची निकड लक्षात घेऊन, गुजराथ विद्यापीठ, काशी विद्यापीठ, शांतिनिकेतन, टिळक विद्यालय अशा संस्था आपले काम करीत होत्या. त्या मालिकेत महिलाश्रमाचे मोलाचे योगदान आहे.

       विशेषत: महात्मा गांधींच्या सत्याग्रहामध्ये सामील होणाऱ्यांना कारावास झाल्यावर त्यांच्या परिवाराची सुरक्षितता, मुलामुलींचे शिक्षण याकडे लक्ष देण्यासाठी महिलाश्रमाचा मोठाच उपयोग झाला. या काळात १९४२ च्या चळवळीत रमाबेनने भाग घेतला. त्यांना पकडण्यात येऊन ८ महिने कारावासही झाला. त्यांनी स्वत:सोबत अनेक महिलांना सत्याग्रहात सामील होण्याची प्रेरणा दिली आणि गांधीजींच्या विचारप्रणालीशी त्यांना कायमचे जोडले.

       स्वातंत्र्यानंतर रमाबेन यांनी स्वत: शैक्षणिक कार्याला वाहून घेतले. १९५२ ते १९५५ पर्यंत महिलाश्रमात शिक्षिका म्हणून व १९५५ ते १९८७ पर्यंत महिला आश्रम डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्य या नात्याने त्यांनी काम केले. १९५२ पासून त्या संस्थेच्या साहाय्यक सचिव आणि १९६७ पासून आजपर्यंत सचिव या नात्याने त्यांनी भरीव काम केले आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत आणि अध्यापिका विद्यालय असा संस्थेचा व्याप वाढला आहे त्यात रमाबेनचा पुढाकार आहे. महिलाश्रमात गांधींच्या बुनियादी शिक्षणप्रणालीचा अवलंब करण्याचा प्रयत्न आहे. शिवणकाम, बेकरी, प्रशिक्षण, विजेची उपकरणे दुरुस्त करणे इ. कामे शिक्षण घेता घेता विद्यार्थी विद्यार्थिनी करतात. स्वावलंबनाचे शिक्षणही त्यामुळे अनायासे मिळते. आज महिला आश्रमाच्या अंतर्गत ९ विद्यालये कार्यरत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचाही विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांचे आयोजन केले जाते.

       संस्थेत विद्यार्थ्यांपासून अध्यापकांपर्यंत सर्वजण खादी वापरतात. प्रत्येक वर्गात फक्त ४० विद्यार्थी असले पाहिजेत असा संस्थेचा कटाक्ष आहे.

संस्थेच्या कामाशिवाय अन्य उपक्रमांमध्येही रमाबेन सक्रीय आहेत. १९६० पासून पूज्य विनोबाजींच्या सांगण्यावरून रमाबेनने महिलाश्रमाच्या द्वारा खादी आणि ग्रामोद्योग विभागाची जबाबदारी घेतली. आजही २०० स्त्री-पुरुषांना या कामातून रोजगार मिळतो. आजूबाजूच्या गावांमध्ये ७ ते ८ छोटी-मोठी विक्रीकेंद्रे सुरू आहेत. वर्षाची ४५ लाख रुपयांची उलाढाल आहे.

       स्त्रीच्या समस्येत रमाबेनना विशेष रुची आहे. स्त्रीची समस्या ही केवळ स्त्रीची नसून पुरुष व समाजव्यवस्था यांच्याशी ती निगडित आहे असे जाणून स्त्री-पुरुषांसाठी ‘जागृती मंडळ’ या नावाने वर्ध्यात त्यांनी समुपदेशन केन्द्र सुरू केले असून अनेकांना त्याचा लाभ झाला आहे.

       आपल्या कुशल नेतृत्वामुळे व संघटन चातुर्यामुळे वर्ध्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या त्या अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव या नात्याने जवळजवळ १८ संस्थांच्या आधारस्तंभ झाल्या आहेत. शिक्षा मंडळ, राष्ट्रभाषा प्रचार समिती, गांधी ज्ञान मंदिर, महारोगी सेवा समिती - दत्तपूर, मगन संग्रहालय समिती ही त्यातील काही निवडक नावे आहेत.

       पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्र, पाठ्यक्रम निर्मिती मंडळ (डी. एड. चा अभ्यासक्रम, महाराष्ट्र) यांच्याही त्या सदस्या होत्या. स्काऊट व गाईड असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. बाल सुधार गृह, वर्धा च्या त्या मानद न्यायदंडाधिकारी होत्या. त्यांची राहणी साधी असून त्या खादीधारी आहेत. महिलाश्रमाशी त्या एकरूप झाल्या असून तेच त्यांचे निवासस्थानही आहे.

      - डॉ. दमयंती पांढरीपांडे

संदर्भ
१.  शांताबाई रानीवाला स्मरणांजली जन्मशताब्दी विशेषांक ३,४,५ - फेब्रुवारी २००४
रुईया, रमाबेन श्रीनिवास