Skip to main content
x

सावंत, नारायण कृष्णराव

         नारायण कृष्ण सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथे झाले. पुणे येथील कृषी महाविद्यालयातून त्यांनी १९५८मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात पहिल्या क्रमांकाने मिळवली. अमेरिकेतील कॅनसास स्टेट विद्यापीठातून मृदाशास्त्र विषयात एम.एस्सी. पदवी १९६४मध्ये, पुणे विद्यापीठातून १९६९मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. म.फु.कृ.वि.त त्यांनी २० वर्षे मृदाशास्त्र विषयाचे अध्यापन केले. त्यांना संशोधनाची आवड असल्यामुळे आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपिन्स येथे २ वर्षे तर आंतरराष्ट्रीय खत विकास संस्था, अलाबामा येथे १४ वर्षे संशोधन केले. त्यांच्या संशोधनाचा मुख्य उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्याला भरीव उत्पादनवाढ मिळावी हा होता. त्यामुळे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे व शेतकऱ्यांच्या शेतावर दर पावसाळ्यात अनेक वर्षे प्रयोग करून त्यांनी लावणी भाताची चारसूत्री पद्धत शोधून काढली. या पद्धतीमुळे लागवडीचा खर्च निम्म्याने कमी झाला व भात उत्पादन दीडपटीने (हे.कि. १ टन ज्यादा) वाढले. त्यासाठी त्यांनी युरिआ डीएपी ब्रिकेट ही वैशिष्ट्यपूर्ण गोळी शोधून तिचा वापर केला.

         महाराष्ट्र सरकारने १९९९मध्ये डॉ. सावंत यांच्या चारसूत्री भातशेतीला मान्यता दिली व भात उत्पादनवाढीसाठी भात पिकवणाऱ्या सर्व जिल्ह्यांत तिचा कृषी खात्यातर्फे प्रसार केला. या मौलिक संशोधनासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ साली त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान केला. त्यांचे १००पेक्षा जास्त संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे संशोधन व छोट्या शेतकऱ्यांमधील प्रसारकार्य चालू होते. जिराईत पिकात पावसाचे पाणी अडवण्यासाठी त्यांनी नारायण कोळपे विकसित केले. तसेच त्यांनी कृषीविषयक नियतकालिकांत शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी अनेक लेख लिहिले व ५ पुस्तके प्रसिद्ध केली. एकात्मिक सेंद्रिय रासायनिक पद्धतीने शेती केली पाहिजे या तत्त्वाचा त्यांनी सतत पाठपुरावा व प्रचार केला. सावंत यांना कला विषयात विशेष रुची होती. १९६२मध्ये त्यांनी जी. डी. आर्ट पदविका संपादन केली व  अनेक देशांतील विषयांवर चित्रे काढली. पुणे, अमेरिका व फिलिपिन्स येथे त्यांच्या पेंटिंग्जची प्रदर्शने झाली.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

सावंत, नारायण कृष्णराव