Skip to main content
x

शेंडे, शिवाजी आनंद

 

शिवाजी आनंद शेंडे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुक्यातील मेडशिंगी या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले. पुणे येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधून ते १९५१मध्ये मॅट्रिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील सैन्यदलात होते, पण त्यांचे १९५१मध्ये निधन झाल्यामुळे शेंडे यांना शिक्षण सोडून घरची शेती सांभाळणे भाग पडले. त्या वेळची एकंदरीत सामाजिक स्थिती शेतकरी वर्गाला प्रतिकूलच होती.  शेंडेंचा १९५८मध्ये विवाह झाला. आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा झाल्यावर पुढील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्यांनी १९५९मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते १९६३मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयात अधिव्याख्याता या पदावर त्यांची नेमणूक झाली. १९६४मध्ये कृषी विभागातर्फे अलाहाबाद येथे कृषि-अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. तेथील चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी प्रथम श्रेणीत बी.एस्सी. (कृषि-अभियांत्रिकी) पदवी प्राप्त केली. त्या परीक्षेत उत्तम गुणप्राप्तीमुळे ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. ते १९६८ कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात कृषि-अभियांत्रिकी विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांची १९७०मध्ये एम.टेक. अभ्यासासाठी निवड झाली आणि ते खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये दाखल झाले. त्यांनी १९७२मध्ये एम.टेक. पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.

सोलापूर येथील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पात कृषि-अभियंता म्हणून १९७२मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्या काळी कृषिविद्यावेत्ता डॉ. उमराणी आणि मृदा-पदार्थविज्ञानवेत्ता डॉ. काळे यांच्याशी चर्चा करून रब्बी ज्वारीसाठी पेरणी आणि खत एकाच वेळी कसे देता येईल याचा सखोल विचार करून प्रा. शिवाजी शेंडे  यांनी ‘दोनचाडी तिफण’ निर्माण केली. हा प्रयोग फारच यशस्वी झाला. या नमुना तिफणीचा वापर करून शेतकर्‍यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणात पेरणी केली. ही तिफण पाहून अनेक शेतकर्‍यांनी अशी पाभर तयार केली. शासनाने पुढे जुन्या पाभरी दोनचाडी करण्यासाठी अनुदानही दिले. प्रा. शेंडे यांनी मॅट्रिक झाल्यावर नऊ वर्षे शेती केली होती. शिवाजी शेंडे यांना त्या अनुभवाचा ही दोनचाडी तिफण करण्यास खूप उपयोग झाला.

प्रा. शेंडे यांना १९७४मध्ये कॅनडा येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेथे त्यांनी शिवाजी बहुविध शेतीयंत्र निर्माण करून त्याचा प्रोटोटाइप सोलापूर येथे आणला. या यंत्राने नांगरट वगळता शेतीची इतर सर्व कामे (कुळवणी, पेरणी, आंतर मशागत इ.) करता येतात. काळ्या जमिनीत या यंत्राला लागणारे बळ सामान्य बैलजोडीने शक्य होत नाही असे दिसले, परंतु हा एक फार उपयुक्त प्रयत्न होता. विशेष म्हणजे खत व बी योग्य प्रमाणात सोडता येत असे. तसेच आंतरपीक पेरण्याची सोय या यंत्रात होती.

.फु.कृ.वि.चे कुलगुरू डॉ. आ.भै. जोशी यांनी १९८०मध्ये राहुरी येथे प्रक्षेत्र संचालक म्हणून प्रा. शेंडे यांची नेमणूक केली. तेथे त्यांनी सात वर्षे कार्य करून उत्पादनात लक्षणीय भर घातली. त्यांची १९८७मध्ये कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून बदली झाली. काही काळ त्यांनी प्राचार्यपदाचा भार सांभाळला. नंतर शिवाजी आनंद शेंडे १९९१मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन मूळ गाव मेडशिंगी येथे शेती करू लागले.

-  डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].