Skip to main content
x

सहस्रबुद्धे, दिगंबर हरी

      दिगंबर हरी तथा बाळासाहेब सहस्रबुद्धे यांचा जन्म मध्यप्रदेशातील छिंदवाडा गावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण अकोला येथे झाले. विद्यार्थी जीवनात अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके व सुवर्णपदके त्यांनी मिळविली. अमरावती येथील महाविद्यालयातून इंटरची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना प्राचार्यांनी सरकारी महाविद्यालयामधून काढून टाकले व भारतातील कुठल्याही सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळू नये अशी व्यवस्था केली. तेव्हा डॉ. रावसाहेब भट यांनी स्वखर्चाने त्यांना बनारस हिंदू विद्यापीठात पाठविले. तेथून बाळासाहेब बी.ए. झाले. त्यांनाच मॉडेल विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. नोकरी करीत असतानाच त्यांनी एलएल.बी.ची परीक्षा दिली. शिक्षकी पेशा राष्ट्रीय उत्थानाचे एक साधन म्हणून स्वीकारला असल्याने त्यांनी स्वत:ला शिक्षण कार्याला वाहून घेतले. मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून ते शरीर संवर्धनाचे उपक्रम व शहीद दिन, आचरणदिन, सद्वर्तनदिन, स्वच्छतादिन असे संस्कृतीची ओळख करून देणारे कार्यक्रम घेत असत. १९७१ मध्ये झालेल्या स्वत:च्या सत्कार निधीच्या सत्तावीस हजार रुपयांतून त्यांनी ‘शिक्षक प्रबोधिनी’ संस्था स्थापन केली. शिक्षकांच्या प्रबोधनासाठी शिबीरे, चर्चासत्रे, मार्गदर्शक साहित्याचे प्रकाशन या उपक्रमांतून कृतिपर, जीवनाभिमुख पद्धतीने शिक्षकांना तयार केले. त्यासाठी जीवनशिक्षण, शिक्षण संक्रमण मासिकांतून लेखन केले. लहान गावांतून मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. या सर्व प्रकल्पांचा खर्च शिक्षक प्रबोधिनीतून व स्वत:च्या स्वातंत्र्यसंग्राम निवृत्तीवेतनामधून केला. निवृत्तीनंतरही शिक्षणक्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्यां शिक्षकाला ‘शिक्षण प्रबोधिनी’ पुरस्कार देत असत. विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यप्रेम जागते ठेवण्यासाठी दर सव्वीस जानेवारीला स्वातंत्र्यदिन पत्रक काढून बाळासाहेब विदर्भातील सर्व शाळांमध्ये पाठवीत. त्यात नवनवीन प्रेरणादायी विचार देत. शिक्षकांना स्वत:च्या पायावर मान ताठ करून उभे राहता यावे म्हणून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नोव्हेंबर १९४६ मध्ये ‘प्रॉव्हीन्शीयल फेडरेशन ऑफ सेकंडरी टीचर्स’ ही संघटना सहस्त्रबुद्धे यांनी स्थापन केली. या संघटनेचे ते पहिले सचिव होते. त्यांनी शिक्षकांना संघटित केले. त्यांच्या समस्यांचा अभ्यास केला. त्यांच्या जीवनात स्थैर्य आणले, निवृत्ती वेतन मिळवून दिले. प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. ‘शिक्षण स्वायत्त मंडळा’ची स्थापना केली. ते गांधीवादी असल्याने शिक्षणातील ही क्रांती असहकार, सत्याग्रह या मार्गांनी घडवून आणली. अखिल भारतीय स्तरावरही संघटनांचे कार्य केले. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोसिएशन (ए. आय. एफ. ई. ए) चे १९५४ ते १९६२ पर्यंत सरचिटणीस होते. याच संस्थेचे प्रतिनिधी म्हणून १९५५ मध्ये चीनला व १९५९ मध्ये रशियात जाऊन तेथील परिषदांमध्ये त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी विचार मांडले. ए. आय. एफ. इ. ए. ही संस्था वर्ल्ड कॉनफडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ दी टिचिंग प्रोफेशन (डब्ल्यू. सी. ओ. टी. पी.) या संस्थेशी संलग्न होती. तिच्या निमंत्रणावरून बाळासाहेबांनी वॉशिंग्टन परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. १९६१ मध्ये जागतिक शिक्षक परिषद भरवली. १९५८ ते १९६८ अशी दहा वर्षे त्यांनी आमदारपद भूषविले. आमदार म्हणून अभ्यासपूर्ण मते ते निर्भीडपणे मांडत. विदर्भासाठी शैक्षणिक सवलती मिळविण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. विदर्भात व्यवयासाभिमुख विद्यालय चालू राहण्यास त्यांचे प्रयत्न कारणीभूत होते. शाळा नियमावली व सरकारी प्रस्तावांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला होता. याच सुमारास भूगोल पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सव्वीस जिल्ह्यांची भूगोलाची पुस्तके निर्दोष होण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम घेतले. विद्यार्थीदशेत मोठमोठ्या वक्त्यांची भाषणे ऐकून ते स्वत:ही उत्तम वक्ते झाले. ते उत्तम संसदपटू होते. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण, मुद्देसूद, प्रवाही असत. त्यामुळेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित केले जाई. बाळासाहेबांची लेखनसंपदा विपुल आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतून पंचावन्न पुस्तके लिहिली. भूगोल, नागरिकशास्त्र व समाज जीवन हे त्यांचे आवडते विषय होते. ‘नागरिकत्वाचा ओनामा’ हे त्यांचे पुस्तक अनेक वर्षे हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरले. मराठी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘भूविजय’, ‘भूप्रदर्शन’, ‘भूप्रदीप’ ही पुस्तके लिहिली. इतिहासाच्या पाठ्यक्रमाचे उद्दिष्टनिष्ठ अध्यापन हे सहस्त्रबुद्धे यांचे आणखी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. विद्यार्थ्यांसाठी मार्गावरील खुणा भाग १ व २, मराठी व इंग्रजी हस्ताक्षरलेखन, वक्तृत्वसाधन, शिक्षणातून नैतिक मूल्य संवर्धन इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. शिक्षण समीक्षा, भारतीय शिक्षण, किर्लोस्कर अशा मासिकांमधून शैक्षणिक विषयांसंबंधी सांगोपांग अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिले.

 - डॉ. प्रतिभा जयंत सहस्रबुद्धे

संदर्भ
१. कोलते, प्रा. गो. मो. ; शिक्षणयोगी बाळासाहेब सहस्रबुद्धे अमृतमहोत्सवी गौरव ग्रंथ
सहस्रबुद्धे, दिगंबर हरी