Skip to main content
x

शिंदे, फकिरा मुंजाजी

     फकिरा मुंजाजी शिंदे यांचा जन्म रुपूर (जि. हिंगोली) या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक खाजगी शाळेत, तसेच सालेगावच्या प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. ते एस.एस.सी. कळमनुरीच्या माध्यमिक शाळेतून उत्तीर्ण झाले, तर परभणीच्या शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा  विद्या-पीठातून त्यांचे एम.ए. (मराठी) पर्यंतचे शिक्षण झाले. १९७२पासून औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात ते सुमारे तीस वर्षे मराठीचे प्राध्यापक होते.

     लहानपणापासून त्यांना काव्य आणि साहित्याची आवड होती. त्यांची पहिली कविता वयाच्या विसाव्या वर्षी, ‘अस्मितादर्श’ या मराठी मासिकात प्रसिद्ध झाली. तेव्हापासून (१९६८) कवी म्हणून त्यांना मिळालेली प्रसिद्धी पुढे वाढतच गेली. १९७२ साली ‘जुलूस’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांतील काही महत्त्वाचे असे आहेत ‘आदिम’ (१९७५), ‘वृंदगान’ (१९७८), ‘दिल्ली ते दिल्ली’ (१९८३), ‘फकिराचे अभंग’ (१९८६), ‘आई आणि इतर कविता’ (१९९०), ‘आयुष्य वेचताना’ (१९९२), ‘भूकंपाची मरणगाणी’, ‘मनाचे अभंग’, (१९९४), ‘मेणा’ (१९९८), ‘मिथक’ (२०००), ‘सृष्टी’ (२००२) इ. यानंतरही त्यांचे कवितालेखन सातत्याने चालू आहे.

     फ.मुं.च्या काव्यलेखनात वैविध्य आहे. एकाच प्रकारची कविता त्यांनी लिहिली नाही; त्यामुळेही त्यांच्या वाचकप्रियतेत भर पडत गेली एवढेच नव्हे, तर त्यांचा स्वतःचा एक मोठा चहाता वर्ग निर्माण झाला असून तो दोन पिढ्यांतला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेला आणि स्वातंत्र्याबरोबर वाढत असलेला हा कवी असल्याने या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती, जाणिवा, स्पंदने त्यांच्या कवितेत यथार्थतेने प्रकटतात; कारण शिंदे यांनी स्वतःची स्वतंत्र शैली जोपासली आहे. विद्रोहापासून विडंबनापर्यंत आणि उपहासापासून भावदर्शीपणापर्यंत सर्व आविष्कार त्यांच्या कवितेत प्रतिबिंबित होतात. म्हणून ती सर्वस्पर्शी झाली आहे.

    बहिणाबाई चौधरींबद्दलच्या सार्‍यांच्याच भावना शिंदे, ‘माझी बहिणाई सांगे नीतिविचाराची पोथी। पानपान निसर्गाचं तिच्या आनंदलं हाती॥’, अशा शब्दांत नेमकेपणाने व्यक्त करतात. ‘स्पर्शातून’ ही त्यांची कविताही सामाजिक जाणिवेचं भान असणारी आहे. ‘आई’वरची त्यांची कविता सार्वकालिक आहे.

     त्यांनी समीक्षात्मक लेखन केले आहे. ते ‘स्वान्त’ व ‘कालमान’ या पुस्तकांतून प्रसिद्ध झाले असून त्यांचा एक अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. काही बालगीतेही त्यांच्या नावावर आहेत. कविसंमेलनांचे सूत्रसंचालन हा त्यांचा स्वतंत्र प्रांत असून त्याच्यावर त्यांची चांगली ‘हुकमत’ आहे.

- मधू नेने

शिंदे, फकिरा मुंजाजी