Skip to main content
x

शिंदे, सुभाष हनुमंत

      सिंचन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या सुभाष हनुमंत शिंदे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी (खुर्द) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण व इयत्ता ८वीपर्यंतचे शिक्षण जन्मगावी झाले. त्यांचे इयत्ता ९वी व १०वीचे शिक्षण पुणे येथील भारत इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यांनी १९६६मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९७०मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी विशेष प्रावीण्यासह व १९७२मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. शिंदे यांनी म.फु.कृ.वि. येथे १९७२मध्ये नोकरीस सुरुवात केली आणि १९७९मध्ये त्यांची पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्यांनी १९८४मध्ये म.फु.कृ.वि.तून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. नोकरीच्या कालावधीत प्राध्यापकापासून ते संशोधक संचालक पदावर त्यांनी कार्य केले. शिंदे यांनी सिंचन क्षेत्रात महत्त्वाचे काम केले . सूक्ष्म सिंचन पद्धती (मायक्रो इरिगेशन)मध्ये अनेक समस्या आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी पीक लागवड, पाणी देण्याचे वेळापत्रक, सिंचनातूनच खतांचा वापर यावर मूलभूत संशोधन केले. केळी पिकासाठी गादी वाफा पद्धत, सिंचन किती दिवसांनी व खते कशी द्यावीत यावर त्यांनी अतिशय उपयुक्त माहिती शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवली.

      सूक्ष्म सिंचनामधील त्यांच्या योगदानामुळे त्यांना इस्राएल व अमेरिका येथील संस्थांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. या कार्याबद्दल त्यांना १९९९मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन (डी.सी.) येथील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉन्टेपोररी स्टडीज् या संस्थेने डी.एस्सी. (सिंचन व्यवस्थापन) पदवी बहाल केली. डॉ. शिंदे यांना म.फु.कृ.वि.ने १९९६मध्ये सिंचनविषयक संशोधनासाठी सुवर्णपदक देऊन गौरवले. त्यांनी प्रा. देशपांडे यांच्यासोबत लिहिलेल्या ‘पिकांचे सिंचन व खत व्यवस्थापन’ या पुस्तकास ‘बळीराजा’ मासिकाचे डॉ. राहुडकर सुवर्णपदक प्राप्त झाले.

      डॉ. शिंदे हे प्रभावी वक्ते असल्यामुळे त्यांनी ५००हून अधिक शेतकरी मेळाव्यांत मार्गदर्शन केले . त्यांचे १२० शोधनिबंध, तसेच १२५ तांत्रिक लेख व २००पेक्षा अधिक शास्त्रीय मराठी लेख प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. शिंदे यांना १९८७मध्ये रुरकी येथील विद्यापीठात ट्रेनर्स ट्रेनिंग कोर्समध्ये डायग्नोसिस अ‍ॅनालिसिस वर्कशॉपमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ते इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रॉनॉमीचे मानद संपादक राहिले आहेत .

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

शिंदे, सुभाष हनुमंत