Skip to main content
x

शिंदेे, रावसाहेब पांडुरंग

     रावसाहेब पांडुरंग शिंदे यांचा जन्म मु. पाडळी, पोस्ट ठाणगाव, जि. नाशिक येथे झाला. शिंदे घराणे पिढीजात वतनदार. आजोबा वारकरी पंथाचे अनुयायी. वडिलांनीही तोच वारसा जपला.

      रावसाहेबांचे प्राथमिक शिक्षण १९३४ - ३८ या कालावधीत पाडळी व देवठाण या गावी झाले. माध्यमिक शिक्षण नाशिक, सिन्नर व संगमनेर येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे, कोल्हापूर व अहमदनगर येथे झाले. एलएल.बी. ही पुणे विद्यापीठामधून पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर श्रीरामपूर येथे वकिलीस प्रारंभ करून प्रतिथयश वकील म्हणून लौकिक संपादन केला.

       विद्यार्थी दशेत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. राष्ट्र सेवादलात (१९४० ते १९४२) ते सानेगुरुजींच्या संपर्कात आले. नाशिक पंचवटी शाखेचे नायक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. स्वातंत्र्य लढ्यात काही काळ भूमिगत राहून काम केले. स्वातंत्र्यानंतर मार्क्सवादी विचारसरणीचा स्वीकार करून समतेच्या लढ्यात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. वकिली करीत असतानाच त्यांनी सामाजिक व सहकारी क्षेत्रात कामास प्रारंभ केला. १९७६ मध्ये श्रीरामपूर दूध सोसायटीची स्थापना करून ती आदर्शवत केली. १२ वर्षं सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शेती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक संपादन केला. त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी या विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर त्यांची नियुक्ती केली गेली. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

        त्यांच्या शैक्षणिक कार्यास विद्यार्थी दशेतच प्रारंभ झाला. १९४४ मध्ये त्यांनी आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने संगमनेर येथे विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. तेथे गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. सर्व जाती धर्मातील मुलांना मुक्त प्रवेश असल्याने सामजिक एकतेचे संस्कार येथे राहणाऱ्यावर होत असत. अभ्यासाशिवाय स्वावलंबन, अवांतर वाचन, चर्चा, खेळ यातील सहभाग  महत्त्वाचा मानला जाई. त्यामुळे हे वसतिगृह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे  वसतिगृह म्हणून ओळखले जाऊ लागले.

         रावसाहेबांचे बंधू अण्णासाहेबांना शिक्षण क्षेत्राची आवड होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची विद्यालये नगर जिल्ह्यात काढण्यास प्रारंभ केल्यानंतर ते वारंवार नगर जिल्ह्यात येत असत. परिसरातील गावी ते अण्णांच्या बरोबरीने जात असत. १९६० मध्ये बोरावके महाविद्यालयाची स्थापना झाली. पदव्युत्तर शास्त्र विषयांचे वर्ग सुरू व्हावेत यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. या महाविद्यालयाच्या स्थापनेत अण्णासाहेबांच्या बरोबरीने रावसाहेबांचाही वाटा होता.

       डाकले वाणिज्य महाविद्यालयाला सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. प्राचार्य चिटणीसांनी रावसाहेबांच्या सहकार्याने देणग्या जमा करून विद्यापीठ अनुदान मंडळाच्या साहाय्याने ग्रंथालय, कर्मचारी निवास, प्राचार्य निवास, सेवक निवास यांची पूर्तता केली. आज या महाविद्यालयाचा विकासही परिपूर्णतेच्या मार्गावर आहे.

       शिक्षण महाविद्यालय प्रारंभी बोरावके महाविद्यालयाच्या एका भागात भरत असे. या महाविद्यालयाला इमारत असावी यासाठी रावसाहेबांनी ९०-९५ या कालावधीत देणग्या मिळवून सुसज्ज इमारत, ग्रंथालय व तीनशे पन्नास प्रेक्षक बसू शकतील असे भव्य सभागृह बांधले. तसेच त्यांच्या पत्नी शशिकला शिंदे यांनी मुलींच्या वसतिगृहासाठी देणगी मिळवून दिली आहे.

       श्रीरामपूर येथील जनता विद्यामंदिराच्या (डी.डी.काचोळे विद्यालय) इमारतीचे विस्तारीकरण व्हावे व तेथील विद्यार्थी वसतिगृहाचे कामकाज विद्यार्थी हितास्तव चालावे यासाठी रावसाहेबांनी प्रयत्न करून विद्यालय व वसतिगृह यांची गुणवत्ता सुधारली आहे. परिसरातील लहान मुलांसाठी संस्कारकेंद्र व प्राथमिक शाळा सुरू करून ती आदर्श व्हावी यासाठी प्रयत्न केले. शांतीलाल सोमय्या यांचेकडून ११ लाख रुपयांची देणगी मिळवून सुंदर इमारत या शाळेसाठी बांधून दिली.

        श्रीरामपूर परिसरातील वडाळा महादेव या गावी संस्थेचे विद्यालय आहे. या विद्यालयाचा शेती विभाग यथातथाच चालत असे. रावसाहेब शेती समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर या शेतीपासून चांगले उत्पन्न मिळू लागले. नाना साळुंखे यांनी त्यासाठी कष्ट केले असल्याने हे घडले असा उल्लेख रावसाहेब वारंवार करतात.

         संस्थेच्या सर्व शाखांची गुणवत्ता वाढावी यासाठी चाललेल्या प्रयत्नांना रावसाहेबांनी सदैव प्रोत्साहनच दिलेले आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी कृतिशील व्हावेत, त्यांनी श्रम आणि शिक्षण यांची सांगड घालून स्वावलंबी बनावे यासाठी दिशादर्शक प्रकल्पाची निवडक महाविद्यालयात कार्यवाही केली जात आहे. संस्थेच्या कार्याबरोबरच इतरत्रही त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य चालू असते. श्रीरामपूरच्या गोंदवणी भागात विद्यालय नव्हते. तेथील विद्यार्थ्यांची अडचण ध्यानात घेऊन आण्णासाहेब शिंदे यांनी श्रीरामपूर शिक्षण संस्थेची स्थापना करून विद्यालय सुरू केलेे. कालांतराने या संस्थेची जबाबदारी रावसाहेबांना स्वीकारावी लागली. इमारतीसाठी जागा मिळवून इमारत पूर्ण करण्याचे कार्य त्यांनी केले व शाळेस स्थैर्य प्राप्त करून दिले. या संस्थेमार्फत श्रीरामपूर व अशोकनगर येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून त्या विकसित केल्या.

        या कार्याशिवाय इंडियन लॉ सोसायटी, पुणेचे काही काळ उपाध्यक्ष व सध्या अध्यक्ष, भारती विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य ही पदेही ते भूषवित आहेत. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील संस्थेला त्यांनी आत्तापर्यंत एक कोटी सत्तावीस लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. हेमलकसा येथील प्रकाश आमटे यांच्या रूग्णालयाच्या प्रतिवर्षी औषधे पाठविण्याचे कार्यासही त्यांनी चालना दिली आहे. श्रीरामपूर येथील अंध शाळेला एक लाखाची देणगी जमवून दिली तसेच कायदेविषयक सल्लागार या नात्याने रूग्णालयाच्या प्रगतीसाठी देणग्या मिळवून दिल्या आहेत. श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव या संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर पाटील तथा भाऊ यांच्या संपर्कातून व विचारविनिमयातून अभियांत्रिकी महाविद्यालय, आनंदसागर प्रकल्प, अंध व अपंग शाळा व वारकरी शाळा वृद्धिंगत करण्यास रावसाहेब सहकार्य करीत असतात.

       रावसाहेब प्रभावी वक्ते आहेत. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असतात. समाज प्रबोधन व्हावे यासाठी त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, शेती सुधारणा, गांधी विचार व कार्य, सामाजिक आरोग्य व पर्यावरण आदि विषयावर एक हजाराच्यावर भाषणे दिली आहेत. रावसाहेबांनी शिक्षण व समाज, चरित्र व चारित्र्य, ध्यासपर्व (आत्मचरित्र), भावलेली माणसे या  ग्रंथाद्वारे  व अभ्यासू लेखाद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे व करीत आहेत.

- प्रा. व. सा. रोकडे

शिंदेे, रावसाहेब पांडुरंग