शिर्के, आनंदीबाई शिवराम
‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवणार्या आनंदीबाई शिर्के या शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील एक मान्यवर लेखिका होत. ज्या काळात स्त्री-शिक्षणालाच समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता, त्या काळात खानदानी मराठा कुटुंबातील या स्त्रीने आपली सुधारक मते ठामपणे मांडली आणि दृढपणाने ती अमलातही आणली.
आनंदीबाई म्हणजे पूर्वा-श्रमीच्या अनसूया गोविंदराव शिंदे. त्यांचा जन्म मुंबईतील चिंचपोकळी येथे झाला. त्यांचे मूळ गाव होते पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील रांजणी, पण आजोबा व्यापारानिमित्त चिंचपोकळीला स्थायिक झाले होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचा बालविवाह झाला नव्हता. वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या लेखन करू लागल्या होत्या. ‘मराठा मित्र’मध्ये त्यांची ‘बेगम आरा’ ही कथा प्रकाशित झाली, त्या वेळी ‘मराठा मित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यातूनच दोघांचा पत्रव्यवहार व नंतर स्नेह वाढला. दोघांचा विवाह होण्यात दोन्ही पक्षांचा विरोध होता, तसेच कोकणातले खानदानी शिर्के व देशावरील शिंदे यांच्यातील विवाहाला तत्कालीन मराठा समाजातूनही फार मोठा विरोध झाला. अखेरीस, १८ डिसेंबर १९१३ रोजी, वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही वर्षे त्यांचे वास्तव्य जळगाव व नंतर पुणे येथे होते.
आनंदीबाईंचे वडील बडोद्याला गायकवाड सरकारच्या सेवेत नोकरी करीत असल्यामुळे आनंदीबाईंचे बालपण गुजरातमधील नवसारी, पाद्रा, बडोदा, मेहसाणा येथे गेले. तेथील विविध गुजराती शाळांमधून त्यांचे शिक्षण झाले. परंतु, कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडला. त्यांनी नर्सिंगचे शिक्षण घेतले; पण त्यालाही घरातून विरोध होता. त्याच काळात लेखनाची आवड उत्पन्न होऊन त्यांनी ‘कुमारी आनंदी’ या नावाने कथालेखन सुरू केले.
१९१०मध्ये त्यांची पहिली कथा ‘शारदाबाईंचे संसारशिल्प’ ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी ‘मासिक मनोरंजन’मध्येच त्यांचा ‘स्वच्छता’ हा निबंध प्रसिद्ध झाला. विवाहानंतर पती शिवरामपंत शिर्के यांच्या साहित्यक्षेत्रातील वावरामुळे आनंदीबाईंचा अनेक नामवंत साहित्यिकांशी परिचय होऊन मैत्री झाली. श्री.कृ.कोल्हटकर, प्र.श्री.कोल्हटकर, भा.ल.पाटणकर, माधवराव पटवर्धन, वि.द.घाटे, केशवराव सोनाळकर इत्यादी साहित्यिकांचे विविध प्रसंगांचे उल्लेख ‘सांजवात’मध्ये आले आहेत.
१९२८मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘कथाकुंज’ प्रकाशित झाला. त्याला श्री.कृ.कोल्हटकरांची प्रस्तावना लाभली आहे. १९३४ मध्ये ‘कुंजविकास’ हा कथासंग्रह, १९३९ मध्ये ‘जुईच्या कळ्या’ हा कथासंग्रह, १९४३मध्ये ‘भावनांचे खेळ व इतर गोष्टी’ (कथा), १९६४मध्ये ‘साखरपुडा’ (कथा), १९५८मध्ये ‘तृणपुष्पे’, १९८१मध्ये ‘गुलाबजाम’ (कथा) याचबरोबर, ‘रूपाळी’ ही कादंबरी व बालसाहित्याच्या दालनात ‘कुरूप राजकन्या’, ‘तेरावी कळ व इतर गोष्टी’, ‘वाघाची मावशी व इतर गोष्टी’ हे त्यांचे बालकथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
वि.द.घाटे यांच्या सल्ल्याने इतिहासाच्या पुस्तकांसाठी त्यांनी लेखन केले. अनेक गुजराती पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले आहेत. ‘सांजवात’ हे त्यांचे आत्मचरित्र १९७२ साली, म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी प्रकाशित झाले.वि.द.घाटे यांची प्रस्तावना त्याला लाभली आहे. हे आत्मवृत्त अत्यंत प्रांजल, हृदयस्पर्शी व वाचकाला अंतर्मुख करणारे आहे.
निबंध, कथा, बाल-साहित्य, स्त्री-साहित्य, अनुवादित साहित्य, आत्मवृत्त अशी बहुविध साहित्यनिर्मिती आनंदीबाईंनी केली. स्त्रियांशी निगडित अशा सामाजिक समस्यांचे चित्रण, पुरोगामी विचारसरणी, मराठा समाजातील स्त्रियांची स्थिती, गुजरातमधील सामाजिक वातावरण, जुन्या मराठी भाषेतील शब्द व म्हणींचे वैपुल्य ही त्यांच्या रचनेची वैशिष्ट्ये होती.
त्यांच्या प्रारंभीच्या कथांवर वि.सी.गुर्जरांच्या प्रणयकथांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. पण, नंतर त्यांच्या शैलीत लक्षणीय बदल झालेला आढळतो. नर्मशृंगार सहजतेने कथेत आणणार्या त्या पहिल्या स्त्री-कथाकार होत्या हे त्यांच्या ‘दाम्पत्य जीवन’सारख्या कथेतून दिसून येते. स्वभावचित्रणावरील कौशल्य, तंत्रावरील हुकमत व स्त्रियांच्या भाषेचा परिणामकारक वापर यांमुळे समकालीन काळातील त्या महत्त्वाच्या स्त्री-लेखिका ठरतात.
१९३६मध्ये जळगाव येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष माधवराव पटवर्धन (माधव जूलियन) होते. त्या सम्मेलनात स्वागताध्यक्षपदाचा सन्मान या स्त्री-लेखिकेला मिळाला होता. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाला वृत्तपत्रांमधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. १९३८मध्ये पुणे येथे झालेल्या अ.भा. मराठा महिला परिषदेच्या अध्यक्ष म्हणून आनंदीबाईंची निवड झाली होती.
पुणे येथे आकाशवाणीवर अनेक प्रसंगी, अनेक विषयांवरील त्यांची भाषणे गाजली. अत्यंत विचारी, संयमी, कष्टाळू, प्रगल्भ, चिंतनशील अशा आनंदीबाईंची लेखनशैली अतिशय प्रसन्न व मधुर होती.
मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी उत्तम कथासंग्रहासाठी ‘आनंदीबाई शिर्के’ पारितोषिक दिले जाते. त्या निमित्ताने गतशतकातील या महत्त्वपूर्ण लेखिकेचे स्मरण महाराष्ट्रात केले जाते.