Skip to main content
x

शिर्के, राजश्री सिद्धार्थ

राजश्री सिद्धार्थ शिर्के यांचा जन्म मुंबईत झाला.  त्यांच्या आईचे नाव शोभा व वडिलांचे नाव रामनाथ गोपीनाथ पाटील होते. त्यांना लहानपणापासूनच नृत्य शिकायची खूप आवड होती; परंतु त्या वेळी रीतसर नृत्यशिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यांची इच्छाशक्ती एवढी दांडगी होती की पाहिलेल्या, वाचलेल्या सर्व गोष्टींना आपल्याच कल्पनेने त्या मूर्त स्वरूप देत असत. संधी मिळेल तेव्हा व तिथे त्या नृत्याचे कार्यक्रम बघायला जात असत. नृत्ये बघून त्यांनी नृत्याचे जे काही ज्ञान प्राप्त केले, त्याच जोरावर शाळेत लोकनृत्य करणे, आंतरशालेय स्पर्धेत नृत्यरचना करणे हे चालू होते. वयाच्या बाराव्या वर्षी बघितलेल्या रशियन बॅलेच्या अचूक काटेकोरपणाने त्यांच्या मनावर गहिरा प्रभाव पडला. पुढे १३/१४ वर्षांच्या असताना त्यांना गुरू सातमकर यांच्याकडे नृत्य शिकण्याची संधी मिळाली आणि त्यांचे कथक नृत्याचे प्रारंभिक शिक्षण सुरू झाले.
शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी सिद्धार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय येथे प्रवेश घेतला. परंतु इंटरला असतानाच डॉ.कनक रेळे यांच्या नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना झाल्याचे त्यांना कळले, तेव्हा तिथे त्यांनी भरतनाट्यम साठी प्रवेश घेतला. नृत्याचा सर्वांगीण अभ्यास, शिवाय मुंबई विद्यापीठाची नृत्यातील पदवी ही सर्वांत आकर्षित करणारी गोष्ट होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्या अनाथालयामध्ये लोकनृत्य शिकवत होत्या.
काही काळातच त्यांचे लग्न झाले आणि अभ्यासक्रम सुरू ठेवणे त्यांना अशक्य झाले. मात्र वेगवेगळ्या शाळांत शास्त्रीय व लोकनृत्ये बसविण्याचे काम चालूच होते. ही त्यांची नृत्यरचना पाहून भायखळ्याच्या ‘ख्राइस्ट चर्च आय.सी.एस.ई.’ शाळेने त्यांना नृत्यशिक्षिका म्हणून नेमले. याच सुमारास कथक गुरू मधुरिता सारंग यांच्या बॅलेत भरतनाट्यम् करणार्‍या मुलीची गरज होती आणि तिथे राजश्री शिर्के यांची निवड झाली. मधुरिता सारंग यांच्या रूपाने त्यांना कथक नृत्यात मनाजोगता गुरू लाभला. मग त्यांनी अपार परिश्रमाने, रियाझाने या नृत्याची कास धरली व सहा महिन्यांतच आपल्या गुरूंबरोबर पाटणा संमेलनात नृत्यप्रस्तुती केली. काही कालावधीतच त्या मान्यवर महोत्सवांत नृत्य प्रस्तुती करू लागल्या.
दरम्यान दूरदर्शनच्या चाचणी परीक्षेत परीक्षक असणार्‍या डॉ. कनक रेळे यांनी त्यांना नृत्य करताना पाहिले व आपल्या महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा आपली पदवी पूर्ण करण्याची संधी दिली, त्यामुळे राजश्री शिर्के यांचा पदवी अभ्यासक्रम पुन्हा मार्गी लागला. डॉ. कनक रेळे यांचे अतिशय प्रगल्भ आणि तितकेच सहज मार्गदर्शन त्यांना खूप मोलाचे ठरले. आपली सांसारिक जबाबदारी, कथकचा रियाझ सांभाळून त्यांनी एम.ए.(नृत्य) ही पदवी यशस्वीरीत्या संपादन केली. त्यांनी १९८४ मध्ये ‘लास्य’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी नृत्याच्या सोबत एस.एन.डी.टी. विद्यापीठातून हिंदी साहित्यामधील एम.ए.ची पदवी प्राप्त केली. आता तर दोन्ही नृत्यशैलींतील अभ्यास, जोडीला रामायण, महाभारत, सामाजिक विषय, संतकाव्यांवर संशोधन करून त्यांनी नृत्यरचना केल्या. ‘लास्य’द्वारा त्यांनी ‘कृष्ण-पांचाली’, ‘पंचमहाभूत’, ‘आत्मसंघर्ष’, ‘अस्तित्व’ या नृत्यरचना सादर केल्या. संतसाहित्यावर अभ्यास करून, महाराष्ट्रातील चार प्रमुख संतांच्या काव्यरचनांवर ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ ही संरचना मांडली.
दिग्दर्शक चेतन दातार यांना ती भावली आणि राजश्री शिर्के, चेतन दातार आणि वैभव आरेकर यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. चेतन दातार यांनी या दोघा नर्तकांना नाट्यप्रशिक्षण दिले. यांच्या एकत्रित कामाने महाराष्ट्रामध्ये प्रथमच एक नवीन प्रस्तुतीकरण पद्धतीचा जन्म झाला. संगीतज्ञ डॉ.अशोक रानडे यांनी त्याला ‘रंगनृत्य’ हे नाव दिले. या ‘रंगनृत्य’ शैलीत त्यांनी ‘श्याम सखी’, ‘माता हिडींबा’, ‘संगीत द्वंद्व’, ‘हरवलेले प्रतिबिंब’ या प्रस्तुती केल्या. माता हिडींबासाठी राजश्री यांना उत्कृष्ट नायिकेचे नामांकन प्राप्त झाले.
राजश्री शिर्के यांचे मराठी नाट्यसंगीतावरचे सादरीकरण म्हणजे ‘रंगला श्रीहरी रंगली राधिका’, ‘प्रिये पहा’ आणि ‘घेई छंद हा मकरंद’. अनेक कवींच्या काव्यरचनांवर नृत्य-संरचना सादर झाली, जसे ‘रसयात्रा’ (कुसुमाग्रज), ‘मेघदूत’ (कालिदास), ‘स्वाती तिरुनाल’ (केरळमधल्या स्वाती तिरुनाल राजाच्या हिंदी काव्यरचनेवर आधारित). त्यांनी अयोध्येतील कथाकार पद्धतीवर संशोधन केले. कथा सांगताना नृत्य, संगीत व नाट्याचा वापर करून त्यांनी केलेली सादरीकरणे भारतभर नावाजली गेली. उदा. ‘रावण-मंदोदरी संवाद’, ‘गर्वहरण’, ‘१८५७ एक उठाव’, ‘संत कान्होपात्रा’ आणि रवींद्रनाथ टागोर लिखित ‘खाता’. संगीत नाटक अकादमी, चंदीगड, हैदराबाद, कृष्ण गान सभा, नाट्यकला कॉन्फरन्स अशा अनेक नामवंत संस्थांकडून राजश्री शिर्के यांना बोलविण्यात आले आणि त्यांच्या कामाची प्रशंसाही झाली. या कथाकार पद्धतीवर संशोधन करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारची पाठ्यवृत्ती लाभली. राजश्री शिर्के यांच्या नृत्यात स्त्री-भ्रूणहत्येवरची ‘मानुषबिरादरी’ ही प्रस्तुती पाहून एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू रूपा शहा खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी एस.एन.डी.टी.मध्ये व्यावसायिक नृत्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता दिली. या तर्‍हेने २००३ साली ‘लास्य सेन्टर फॉर डान्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ हे एस.एन.डी.टी.शी संलग्न झाले व तिथे तीन वर्षांचा नृत्यपदविका अभ्यासक्रम आणि दोन वर्षांचा प्रगत पदविका अभ्यासक्रम सुरू झाला. राजश्री शिर्के यांना गरीब मुलींसाठी आपल्या कलेद्वारे मदत करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी ‘लास्य संकल्प’ या संस्थेची रचना करून महानगरपालिकांच्या शाळांत शिकणाऱ्या गरीब मुलींना मोफत नृत्यशिक्षण दिले.
राजश्री यांनी अनेक मान्यवर नृत्य महोत्सवांत प्रस्तुती करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना ‘मुंबई  मेयर्स अवॉर्ड फॉर वुमन अचीव्हर्स ऑफ द इयर’(२००५), ‘खुसरोवानी हालिम अकादमी ऑफ सितार’चा पुरस्कार, संत रोहिदास समाजाकडून ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार (२००७), ‘मराठी साहित्य संघ अवॉर्ड फॉर क्रिएटिव्हिटी इन संगीत नाटक’ (२००६), ‘मराठी साहित्य संघ अवॉर्ड फॉर वर्क इन एक्सपरिमेंटल थिएटर टू लास्य’ (२००३) प्राप्त झाले आहेत.त्यांचे कार्य आता त्यांचे पुत्र अनिरुद्ध शिर्के (उ.अल्लारखा, मुरली मनोहर शुक्ल व भवानीशंकर यांचे शिष्य) यशस्वीरीत्या सांभाळत आहेत.

राधिका शिर्के

शिर्के, राजश्री सिद्धार्थ