Skip to main content
x

सीरवाई, होरमसजी माणेकजी

     होरमसजी ऊर्फ होमी माणेकजी सीरवाई यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण भर्दा हायस्कूलमध्ये व उच्च शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. १९२६ मध्ये ते तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए.ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. १९२९ मध्ये शासकीय विधि महाविद्यालयातून एलएल.बी. पदवी प्राप्त केल्यावर दोन वर्षे ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंग्रजीचे अधिव्याख्याता होते.

     १९३२ मध्ये सीरवाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत तेव्हाच्या मुंबई प्रांताचे अ‍ॅडव्होकेट-जनरल सर जमशेदजी कांगा यांच्या हाताखाली वकिलीस सुरुवात केली. उमेदवारीच्या पहिल्या काही वर्षांत त्यांना भरपूर वाचन व व्यासंग करण्याची संधी मिळाली. पुढे तेव्हाच्या मुंबई सरकारने केलेल्या दारुबंदी कायद्याखालील अनेक खटले त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सरकारतर्फे चालविले. स्वातंत्र्योत्तर काळात १९५६-५७ मध्ये एका महत्त्वाच्या खटल्यात त्यांनी मुंबई सरकारची बाजू आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात मांडली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल करून सरकारच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यामुळे सीरवाईंना प्रसिद्धी मिळाली.

      १९५७ मध्ये सीरवाई यांची द्विभाषिक मुंबई राज्याचे अ‍ॅडव्होकेट-जनरल म्हणून नियुक्ती झाली. १मे१९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले अ‍ॅडव्होकेट-जनरल झाले. या पदावर ते १९७४ पर्यंत होते. सलग सतरा वर्षे अ‍ॅडव्होकेट-जनरल असण्याचा हा सीरवाईंच्या नावावरील विक्रम अद्याप अबाधित आहे. तो कधी मोडला जाईल, अशी शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयात अनेक खटल्यांत महाराष्ट्राची बाजू मांडण्याव्यतिरिक्त, १९७१ ते १९७४ या काळात त्यांनी कृष्णा पाणीवाटप लवादासमोर महाराष्ट्राची बाजू अतिशय प्रभावीपणे व यशस्वीरीत्या मांडली. दुर्दैवाने नंतर लवकरच त्यांना अ‍ॅडव्होकेट-जनरलपदाचा राजीनामा द्यावा लागला.

       भारतीय घटनात्मक कायद्याच्या इतिहासात सीरवाई यांचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेलेले आहे, ते ‘कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऑफ इंडिया - अ क्रिटिकल कॉमेंटरी’ या त्यांच्या अनन्यसाधारण ग्रंथामुळे. महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट-जनरलपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच १९६१ मध्ये त्यांनी या ग्रंथाच्या लेखनास सुरुवात केली. १९६७ मध्ये तो प्रसिद्ध झाला, तेव्हा देशात आणि जगात सर्वत्र त्याचे अभूतपूर्व स्वागत झाले. भारताच्या घटनात्मक कायद्यावर असा अभिजात ग्रंथ त्यापूर्वी लिहिला गेला नव्हता आणि यापुढे लिहिला जाण्याची शक्यताही नाही. यामुळेच त्यांना ‘भारताच्या घटनेचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार’ असे म्हणता येते.

       महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट-जनरल असले तरी इतर राज्य सरकारांनाही सीरवाई अनेकदा सल्ला देत असत किंवा त्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत असत. दोन अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरणांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. १९६४ मध्ये सभागृहाच्या हक्कभंगाच्या प्रश्नावरून उत्तर प्रदेश विधानसभा आणि अलाहाबाद उच्च न्यायालय यांच्यात गंभीर संघर्ष निर्माण झाला, तेव्हा राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला व सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागितला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सीरवाई यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सभापतींची बाजू मांडली. (विरुद्ध पक्षाची, म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बाजू एम.सी. सेटलवाड यांनी मांडली होती.)

       त्यानंतर १९७२ मध्ये सुप्रसिद्ध केशवानंद भारती खटल्यात सीरवाई यांनी प्रतिवादी केरळ सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. घटनेच्या तिसर्‍या भागातील मूलभूत हक्कांसह घटनेच्या कोणत्याही भागातील कोणत्याही तरतुदीत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकारावर कोणतीही बंधने किंवा कोणत्याही मर्यादा असू शकत नाहीत, असे ठाम प्रतिपादन सीरवाई यांनी न्यायालयासमोर केले. आपल्या ग्रंथातही त्यांनी हीच भूमिका मांडली.

       २४ एप्रिल १९७३ रोजी या खटल्याचा निकाल जाहीर झाला आणि भारतीय घटनेच्या आणि घटनात्मक कायद्याच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाच्या, गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त अशा मूलभूत संरचना सिद्धान्ताचा (बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन) जन्म झाला. त्यावेळी सीरवाई यांना हा सिद्धान्त मान्य झाला नाही.

       १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. ती अठरा-एकोणीस महिने लागू राहिली. तेवढ्या काळात देशातील कायद्याचे राज्य जवळपास संपुष्टात आले. आणीबाणीच्या काळात घटनेत एकूण पाच दुरुस्त्या- अडतीसावी दुरुस्ती ते बेचाळीसावी दुरुस्ती- करण्यात आल्या. त्यांपैकी एकोणचाळीसावी आणि बेचाळीसावी या दोन दुरुस्त्यांनी घटनेच्या मूलतत्त्वांवर जबरदस्त आघात केले. याच काळात इंदिरा गांधी निवडणूक खटला आणि हेबियस कॉर्पस खटला या दोन खटल्यांत सर्वोच्च न्यायालयाने काही असमर्थनीय असे निर्णय दिले. या सर्वांवर सखोल विचार व चिंतन करून सीरवाई यांनी आपली आधीची भूमिका बदलली. स्वत:च्याच पूर्वीच्या भूमिकेची कठोर चिकित्सा करणारे अतिशय मूलगामी व सूक्ष्म विवेचन त्यांनी ‘द इमर्जन्सी, फ्यूचर सेफगार्ड्स् अँड द हेबियस कॉर्पस् केस : ए क्रिटिसिझम’ या पुस्तकात केले. हे पुस्तक १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले.

        केशवानंद भारती खटल्यात आपण सर्वोच्च न्यायालयात केलेले प्रतिपादन केवळ तात्त्विक होते, त्याला वास्तवाचा किंवा अनुभवाचा संदर्भ किंवा आधार नव्हता, परंतु आणीबाणीत देशाने घेतलेला प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेता, पुन्हा कधी असे घडू नये यासाठी मूलभूत संरचना सिद्धान्त मान्य केला पाहिजे, त्याचप्रमाणे घटनादुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकारावर काही मर्यादा असल्या पाहिजेत आणि या मर्यादा घटनेतील तरतुदींमध्येच अनुस्यूत आहेत, हेही मान्य केले पाहिजे, अशी नवी भूमिका त्यांनी या पुस्तकात मांडली. त्यांचा हा वैचारिक व बौद्धिक प्रामाणिकपणा आणि स्वत:ची आधीची भूमिका बदलून अगदी वेगळी भूमिका मांडण्याचे त्यांनी दाखविलेले नैतिक धैर्य याबद्दल कायदा जगतात त्यांची प्रशंसा झाली.

        १९७४मध्ये अ‍ॅडव्होकेट-जनरल पदावरून पायउतार झाल्यापासून सीरवाई यांनी आपल्या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्यांच्या लेखनास स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतले होते. प्रत्येक नव्या आवृत्तीत त्यांच्या ग्रंथाचा विस्तार होत गेला. तीन खंड असलेल्या चौथ्या आवृत्तीचे काम त्यांनी आपल्या निधनाच्या आदल्याच दिवशी पूर्ण केले होते. तिसर्‍या आवृत्तीत नव्याने समाविष्ट केलेल्या इतिहासात्मक प्रकरणाचे एक वेगळे छोटे पण महत्त्वाचे पुस्तक ‘पार्टिशन ऑफ इंडिया : लिजंड अँड रिअ‍ॅलिटी’ त्यांनी १९८९ मध्ये प्रसिद्ध केले. १९९४ मध्ये त्याची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली.

       सीरवाईंना अनेक सन्मान मिळाले. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मभूषण हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९८० मध्ये त्यांना दादाभाई नौरोजी पुरस्कार मिळाला. १९८१ मध्ये ‘ऑनररी कॉरस्पाँडिंग फेलो ऑफ द ब्रिटिश अ‍ॅकॅडमी’ म्हणून त्यांची निवड झाली. १९८२ मध्ये मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने त्यांना मानद फेलोशिप दिली, तर १९९४ मध्ये इंटरनॅशनल बार असोसिएशन या संस्थेने ‘लिव्हिंग लेजंड ऑफ लॉ’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

       सीरवाई यांची तत्त्वज्ञानाची आवड शेवटपर्यंत कायम होती. ‘बाँबे फिलोसॉफिकल सोसायटी’ या संस्थेशी त्यांचा तिच्या स्थापनेपासून घनिष्ठ संबंध होता.‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’ (पी.यू.सी.एल.) या संघटनेचेही ते एक संस्थापक व काही काळ अध्यक्ष होते. सीरवाईंचे इंग्रजीवरील प्रभुत्व स्तिमित करणारे होते. इंग्रजी साहित्याचा, विशेषत: काव्याचा व शेक्सपिअरच्या नाटकांचा त्यांचा दीर्घ व्यासंग होता. त्यांचे भाषण ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होत असत. अभिजात पाश्चात्त्य संगीताचीही त्यांना आवड होती. घटनेच्या या सर्वश्रेष्ठ भाष्यकाराचे निधन घटनेच्या सेहेचाळिसाव्या वर्धापनदिनी, म्हणजे २६जानेवारी१९९६ रोजी व्हावे, हा योगायोग विलक्षण होय.

- शरच्चंद्र पानसे

सीरवाई, होरमसजी माणेकजी