Skip to main content
x

सप्रे, शंकर लक्ष्मण

           शंकर लक्ष्मण सप्रे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात, धामणी या गावी झाला. त्यांच्या वडिलांना संगीताची आवड असून त्यांनी गायन, हार्मोनिअम व तबलावादनाचा चांगला अभ्यास केला होता. आपल्या मुलालाही संगीत क्षेत्रातच पुढे आणण्याच्या आकांक्षेने त्यांनी घरीच त्याचा अभ्यास स्वतः घेणे सुरू केले.

सप्रे यांची आई लक्ष्मीबाई १९१५ साली स्वर्गवासी झाली. तत्पूर्वी १९१२ मध्येच सप्रे कुटुंब कल्याण येथे राहू लागले होते. प्रख्यात कीर्तनकार दासगणूंची तेथे कीर्तने होत. सप्रे कीर्तनात हार्मोनिअम वाजवीत. सप्रे यांना त्यांचे मामा भालचंद्र कृष्ण भाटवडेकर यांनी  गांधर्व महाविद्यालयात घातले. तेथे एक वर्ष अभ्यास करताना त्यांना पं. विष्णू दिगंबर पलुसकरांचे मार्गदर्शन मिळाले. १९१९ मध्ये त्यांचा आवाज फुटला, म्हणून त्यांनी हार्मोनिअमची संगत सुरू केली. मेहनत घेऊन आवाजात सुधारणा केली. नाटक कंपनीच्या सहवासात नाट्यसंगीत अवगत करून घेतले.

 शंकर सप्रे यांनी १९२५ मध्ये विवाह झाल्यावर नाटक कंपनी सोडली. त्यांच्या पत्नीचे नाव कमलाबाई होते. त्यांनी संगीत प्रचार-प्रसाराचे कार्य करण्याचा निश्चय केला व नागपूरला वास्तव्य केले. बंधूंच्या व मित्र अंबादास आपटे यांच्या सहकार्याने त्यांनी श्रीराम संगीत महाविद्यालयाची स्थापना १९२६ साली केली. अमृतसर व नागपूर अशा दोन ठिकाणी सप्रे यांनी पं. विष्णू दिगंबर पलुसकरांच्या गायनाला अप्रतिम साथ केल्याने पंडितजींनी त्यांना प्रशस्तिपत्र दिले. त्यांनी पंडितजींच्याच हस्ते आपल्या संस्थेचे उद्घाटन केले.

 गायन, हार्मोनिअमच्या जोडीला सपे्र यांनी विद्यालयात नाट्यशाखा काढून नाट्य व अभिनयतंत्राचे शिक्षण द्यायला आरंभ केला. त्यांनी १९२९ मध्ये संगीत नवा खेळहे विद्यार्थ्यांचे पहिले नाटक रंगमंचावर सादर केले. शांता आपटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी बालगोपाळांचे मेळे काढले. काही मेळ्यांसाठी स्वतः पदे रचली. त्यांच्या मेळ्यात काम करणारे वसंत व रामचंद्र म्हणजे पुढे खूप प्रसिद्धीस आलेले गायक वसंतराव देशपांडे व रामचंद्र चितळकर (सी. रामचंद्र) होते.

शंकर सप्रे यांना १९४० साली सेवासदन शाळेत शिक्षकाची नोकरी लागली. त्याच वर्षी त्यांनी संगीत शास्त्रप्रवेशव आलाप, तानांचेही पुस्तक प्रकाशित केले. अध्यापन, लेखन व काव्य हे त्यांचे आवडते विषय होते. संस्कृत गीतगोविंदकाव्याचे रागतालबद्ध गायन केल्याबद्दल त्यांना पंडितही बहुमानाची पदवी मिळाली. त्यांनी विदर्भात गांधर्व महाविद्यालयाची शाखा प्रथमतः सुरू करण्याचे मोलाचे कार्य केले. कुशल संगीत शिक्षक, हार्मोनिअमवादक व भजनकार सप्रे यांनी दर शनिवारी शिस्तबद्ध संगीत भजनांचा उपक्रम सुरू केला व तो पुढेही चालू राहिला. पलुसकरांचा स्मृतिदिन विद्यालयाच्या वार्षिकोत्सवाला जोडून दरवर्षी करण्याचा आरंभ सप्रे यांनी नागपुरात केला.

सपे्र यांची शिक्षणपद्धती पद्धतशीर, साधी व सुलभ होती. ते निर्व्यसनी, नियमबद्ध होते व सत्तरी उलटली तरी त्यांचा आवाज खणखणीत होता. अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचे ते कार्यकारी सदस्य, परीक्षक होते. त्यांनी अनेक शासकीय समित्या, मंडळांचे सदस्यत्व भूषविले होते. अनेक सत्कार-समारंभांतून त्यांचा गौरव केला गेला.

त्यांच्या ख्यातिप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सी. रामचंद्र, डॉ. वसंतराव देशपांडे, तारा पिल्ले, प्रभाकर पिल्ले, कुसुम आफळे, सतीश प्रधान, प्रभाकर देशकर, माणिक साठे, कमल पावणस्कर, शिवानी घोष, पुष्पा जाधव, भैयाजी वडसमुद्रकर, वामन महाबळ, रामभाऊ भूमकर, डॉ. गोविंद नाईक यांचा समावेश होतो.  

वि.ग. जोशी

संदर्भ :
१. मंगरूळकर, नारायण; ‘वैदर्भीय संगीतोपासक’  भाग १.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].