Skip to main content
x

शर्मा, शिवकुमार उमादत्त

       संतूर या वाद्यावर भारतीय रागसंगीताचा दर्जेदार आविष्कार करून त्यास जगभरात मान्यता देणारे पं. शिवकुमार उमादत्त शर्मा हे या शतकातले एक महत्त्वाचे कलाकार मानले जातात . ते मूळचे काश्मिरी असले, तरी त्यांच्या कारकिर्दीची महत्त्वाची वर्षे मुंबईत गेली. शिवकुमार शर्मांचा जन्म काश्मीरमधील जम्मू येथे झाला. त्यांचे पूर्वज काश्मीरच्या राजघराण्याचे शैवपंथीय राजपुरोहित होते. त्यांचे वडील पं. उमादत्त शर्मा (सरदार हरनामसिंग व बडे रामदासजी यांचे शिष्य) हे रागतालावर प्रभुत्व असणारे उत्तम गायक, इसराजवादक व तबलावादक होते. त्यांचे लाहोर आकाशवाणीवरून कार्यक्रम होत असत.
        रागसंगीतातील कलाकार असणारे वडील व आई  यांनी गायलेली डोग्री लोकगीते, जम्मू दरबारात येणार्‍या अनेक नामवंत कलाकारांचे संगीत या सार्‍यांचा संस्कार झाल्याने शिवकुमारांना बालपणापासूनचं संगीताची रुची होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच वडील त्यांना गायन व तबलावादनाचे पाठ देऊ लागले. वयाच्या बाराव्या वर्षी मुहम्मद अब्दुल तिब्बट वक्कल, मुहम्मद कालिन बफ यांच्याकडून त्यांनी काश्मिरी सुफियाना संगीतातील संतूर ऐकले. ते चौदा वर्षांचे असताना वडिलांनी त्यांच्या हाती संतूर देऊन या वाद्यावर रागसंगीताचा आविष्कार करण्याची प्रेरणा दिली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या वाद्यावर रागसंगीताचा आविष्कार करण्याचे प्रयोग करावयास सुरुवात केली. संतूरवर मेहनत घेण्याच्या आधी ते काश्मीरमध्ये तबलावादक म्हणून नावारूपाला आले होते व त्यांनी पं.रविशंकर, सिद्धेश्वरी देवी अशा अनेक दिग्गजांना तबल्याची साथ केली होती.
       सतराव्या वर्षी ते जम्मू आकाशवाणीवर तबला व संतूर या दोन्ही वाद्यांची प्रस्तुती करत.आंतरविद्यापीठीय संमेलनात त्यांनी १९४६ साली मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे शिक्षणमंत्र्यांनी काश्मीरचा संगीत प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड केली आणि त्यांचे कार्यक्रम श्रीनगर व अन्य ठिकाणी होऊ लागले. संतूरची रचना व वादनशैली या विषयात शिवकुमार शर्मांनी गहन चिंतन व संशोधन केले. मुळात लोकवाद्य असणार्‍या संतूरवर रागसंगीत वाजवण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे बदलही केले. संतूरवर प्रत्येक स्वरासाठी चार तारा लावल्या जात, त्याऐवजी त्यांनी तीन तारा लावल्या. चिकारीसाठी चार तारा योजल्या. संतूर हे लाकडी आसनाऐवजी ते मांडीवर ठेवून वाजवू लागले, ज्यामुळे त्याची अतिरिक्त कंपने नाहीशी झाली. ते पितळी तारांऐवजी स्टीलच्या तारा वापरू लागले. तारांसाठीच्या एकोणतीस घोड्या व क्रोमॅटिक स्केलनुसार जुळवलेल्या सत्त्याऐंशी तारा यांमुळे ते मिश्र राग, रागमालासारख्या संकीर्ण स्वरूपाच्या रचनाही वाजवू शकले.
      तारांवरून कलम अलगद व सलगपणे छेडत मींडेचा आभास निर्माण करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत त्यांनी विकसित केली, ज्यामुळे मुळात तुटक नाद असणार्‍या या वाद्यावर रागांची सविस्तर आलापनक्रिया शक्य झाली. शिवजींनी संतूर या वाद्यावर अतोनात परिश्रम घेऊन एक निराळी अशी वादनशैली निर्माण केली. आपले लयतालाचे सूक्ष्म भान आणि रागदारीचे ज्ञान वापरून त्यांनी या वाद्यावर अत्युच्च असा रागाविष्कार केला. आरंभी या वाद्यावर ‘मींड, गमक नाही, त्यात सलगता नाही, हे हलकेफुलके वाटते व गंभीर अशा रागसंगीतासाठी उपयुक्त नाही’, अशीही टीका त्यावर केली गेली. मात्र शिवकुमार शर्मांचेे दर्जेदार वादन व त्यांची वाढती लोकप्रियता या टीकेस उत्तम उत्तर ठरले.
रागाची सविस्तर बढत करणारा आलाप-जोड-झाला, गतकारीमध्ये तिस्र-खंड-मिश्र-संकीर्ण अशा लयजातींमध्ये तालाशी सहजपणे केलेली लयक्रीडा, पहाडी धुनी यांमुळे त्यांचे वादन अत्यंत लोकप्रिय झाले. वडिलांकडून मिळालेले लयतालावरचे प्रभुत्व संतूरसाठी योजकतेने वापरून त्यांनी गतकारीतील लयतालाविष्काराचा एक उच्च दर्जाचा मापदंडच निर्माण केला. मत्ततालासारख्या अनवट तालांतील गतकारीही त्यांनी संतूरवर प्रचलित केली.
      मुंबईत १९५५ साली स्वामी हरिदास संगीत संमेलनात त्यांचा संतूर वादनाचा पहिला कार्यक्रम झाला आणि हे वाद्य व कलाकार, दोन्ही एकदम चर्चेत आले. संगीतकार वसंत देसाई यांनी १९५६ साली त्यांना ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटासाठी संतूरवादन करण्याची पहिली संधी दिली. पार्श्वसंगीतासाठी त्यांनी स्वतंत्रपणे केलेले वादनही ध्वनिमुद्रिकेच्या रूपात प्रसिद्ध झाले. या चित्रपटातील गीतांमधले संतूर अनेक संगीतकार व रसिकांनाही पसंत पडले आणि चित्रपट संगीतात संतूरचा वापर विपुल प्रमाणात सुरू झाला. अनेक संगीतकारांच्या विविध भाषांतील फिल्मी, चित्रपटेतर गीतांना शिवजींनी आपल्या संतूरच्या मोहक स्वरांचे कोंदण दिले व हे वाद्य रसिकांच्या मनांत प्रसन्नतेचा शिडकावा करत राहिले.
     त्यांनी १९५७ साली कलकत्त्याच्या ऑल इंडिया म्युझिक फेस्टिव्हलमध्ये वादन करून या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट प्रस्तुतीसाठी असणारे उ. इनायत खाँ पदक मिळवले. त्यांच्या स्वतंत्र वादनाची पहिली ध्वनिमुद्रिका १९६० साली एच.एम.व्ही.च्या जी.एन. जोशींच्या प्रोत्साहनाने प्रकाशित करण्यात आली. त्यांची १९६७ साली ‘कॉल ऑफ दी व्हॅली’ ही हरिप्रसाद चौरसिया (बासरी) व ब्रिजभूषण काब्रा (हवाइअन गिटार) यांच्यासह प्रस्तुत केलेली ध्वनिमुद्रिका कमालीची लोकप्रिय ठरली आणि त्यास २५ वर्षे झाल्यावर १९९५ साली ‘व्हॅली रिकॉल्स’ हा संच त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांच्या स्वतंत्र संतूर वादनाच्या आणि ‘फीलिंग्ज’ (१९८५), ‘साउण्डस्केप्स-पर्वत’ (१९९३), ‘एलिमेन्ट्स-जल’ (१९९५), ‘अंतर्ध्वनी’ (१९९७) इ. अभिनव आविष्कारांच्या ध्वनिमुद्रिका जगभरात गाजल्या.
     पं.रविशंकर यांनी १९६८ साली  शिवकुमार यांना प्रथम अमेरिकेत निमंत्रित केले. या दौर्‍यात त्यांनी स्वतंत्र व सामूहिक कार्यक्रम तर केलेच, शिवाय पं.रवीजींच्या ‘किन्नर’ या संगीतशाळेत शिकवलेही. मग तेथूनच शिवजींचे जगभरातील यशस्वी असे अगणित परदेश दौरे सुरू झाले. ‘शिव-हरी’ या नावाने त्यांनी हरिप्रसाद चौरसियांसह अनेक हिंदी चित्रपटांना यशस्वीपणे संगीत दिले, उदा. ‘सिलसिला’ (१९८०), ‘फासलें’ (१९८५), ‘विजय’ (१९८८), ‘चांदनी’ (१९८९), ‘लम्हें’ (१९९१), ‘डर’, ‘साहिबान’, ‘परम्परा’ (१९९३) हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होत. ‘लम्हें’ व ‘डर’ या चित्रपटांच्या संगीतासाठी त्यांना विशेष पारितोषिक मिळाले होते. मुळात उत्तम तबलावादक असलेल्या शिवजींनी  आर.डी. बर्मन यांच्या विनंतीवरून ‘गाइड’ (संगीत : एस.डी.बर्मन) या चित्रपटातील ‘मोसे छल किए जाय’ या गीतासाठी उत्कृष्ट तबलासाथही केली होती.
त्यांनी १९८० च्या दशकात ‘संगीतोपचार’ या विषयातील संशोधनासाठी डॉ. रमाकांत केणी यांना सहकार्य केले. संगीत रिसर्च अकादमी व स्पीकमॅकेसारख्या संस्थांचे मार्गदर्शक म्हणून काम केले . रतनलाल टिक्कू, नंदकिशोर मुळे, आर.विश्वेश्वरन, सतीश व्यास, किरणपाल सिंग, हरजिंदलपाल सिंग, धनंजय दैठणकर, तरुण भट्टाचार्य व पुत्र राहुल शर्मा असे भारतीय, तर बी.सिव्हर्स (जर्मनी), सियुत्सू मियोशिता, मारी कोमोरो, ताकाहिरो (जपान), करुणा परेरा (श्रीलंका), जावेद (इराण) इ. शिष्य त्यांची संतूरवादनाची परंपरा चालवत आहेत.
     पं.शिवकुमार शर्मांच्या कार्याचा गौरव त्यांना अमेरिकेतील बाल्टिमोरचे सन्माननीय नागरिकत्व (१९८५), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८६), ‘महाराष्ट्र गौरव’ (१९९०), ‘पद्मश्री’ (१९९१), ‘हाफिज अली खाँ’ सन्मान (१९९८), ‘पद्मविभूषण’ (२००१) देऊन करण्यात आला. त्यांना १९९१ मध्ये जम्मू विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट दिली. २०१० साली GIMA चा पुरस्कारही त्यांना लाभला .

    अशा या महान संतूरवादकाचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

चैतन्य कुंटे

शर्मा, शिवकुमार उमादत्त