Skip to main content
x

सरनाईक, निवृत्तीबुवा तुकारामबुवा

निवृत्तीबुवा तुकारामबुवा सरनाईक यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांना गायनाची खूप आवड होती. ते उत्तम भजने करीत. त्यांची प्रासादिक  भजने कोल्हापुरात लोकप्रिय होती. सरनाईक कुटुंबाचे मूळचे आडनाव जाधव असे होते. तुकारामबुवांचे सर्वांत धाकटे बंधू सुप्रसिद्ध गायक-नट आणि ‘यशवंत नाटक मंडळी’चे मालक ‘महाराष्ट्र कोकीळ’ शंकर सरनाईक हे होते. कोल्हापूरचे धृपदिये अथणीकर यांच्याकडे शंकररावांनी धृपद-धमारची तालीम घेतली; परंतु त्यात मन न रमल्यामुळे त्यांनी उस्ताद अब्दुल करीमखाँ यांच्याकडे दोन-तीन वर्षे किराणा घराण्याची तालीम घेतली.
पं.निवृत्तीबुवा सरनाईक यांना दोन मोठे भाऊ व एक बहीण होती. ते चार वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले; परंतु संबंध बिघडल्यामुळे त्यांनी मोठ्या तीनही मुलांना पहिल्या पत्नीच्या माहेरी ठेवले. गाण्याच्या प्रेमापोटी त्यांनी निवृत्तीबुवांना मात्र शंकर सरनाईकांच्या स्वाधीन केले. शंकर सरनाईक तेव्हा शिवराज नाटक कंपनीत होते व निवृत्तीबुवा त्या वेळी (सन १९१७) पाच वर्षांचे होते. इथून त्यांची भ्रमंती सुरू झाली, ती १९३५ साली शंकररावांनी ‘यशवंत नाटक मंडळी’ बंद करेपर्यंत चालली. शंकर सरनाईक आणि त्यांची ‘यशवंत नाटक मंडळी’ यांचा निवृत्तीबुवांच्या घडणीत फार मोठा वाटा आहे.
शिवराज नाटक कंपनीचा मुक्काम १९१९-२० च्या सुमारास इंदूरला होता. इंदूरच्याच मुक्कामात शंकर सरनाईकांनी शिवराज कंपनी सोडली; ते कोल्हापूरला आले. नंतर तुकोजीराव होळकरांच्या आज्ञेनुसार ‘यशवंत नाटक मंडळी’ सुरू झाली. वयाच्या पाचव्या वर्षापासून निवृत्तीबुवा काकांबरोबर होते. त्यामुळे पुष्कळ गाणे कानावर पडत होते. गाण्याची आवडही उत्पन्न झाली होती. ‘यशवंत नाटक मंडळी’ सुरू झाल्यावर निवृत्तीबुवांनी खर्‍या अर्थाने गाणे शिकायला सुरुवात केली. या नाटक कंपनीत सवाई गंधर्व, कृष्णराव गोरे, वामनराव सडोलीकर, नथ्थूबुवा गवई यांसारखी नामवंत मंडळी होती.
निवृत्तीबुवांनी शंकररावांकडे गाणे शिकायला प्रारंभ केला. त्यांची कंपनी त्या वेळी नवी आणि जुनी अशी दोन्ही प्रकारची नाटके करीत असे. निवृत्तीबुवा आठ-नऊ वर्षांचे असताना ‘चलती दुनिया’मध्ये तोता-मैनाच्या संवादात ते ‘तोता’चे काम करीत.
याच सुमारास गोविंद विठ्ठल भावे यांच्याकडे निवृत्तीबुवांचे गायन-शिक्षण सुरू झाले. हे भावे कंपनीत ऑर्गन वादक होते व गांधर्व महाविद्यालयात गाणे शिकलेले होते. ‘यशवंत नाटक मंडळी’त बळवंतराव रुकडीकर, बाबालाल इस्लामपूरकर यांसारखे मातब्बर तबलजी होते. त्यांच्या तालमीत बुवांचा हात तबल्यावर चांगलाच तयार झाला होता. बुवा नामवंत गायक बनले; पण त्यांचे तबल्यावरचे प्रेम यत्किंचितही कमी झाले नाही. त्यांच्या गायनातील लयीची सुंदर समज, दर्जेदार लय, अंग या गोष्टींचे मूळ रुकडीकर व इस्लामपूरकर यांच्या तालमीत सापडते.
पं.निवृत्तीबुवा चौदा-पंधरा वर्षांचे झाल्यानंतर नाटकात नायिकेची भूमिका करू लागले. सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांची गायनाची तालीमही सुरू झाली. बुवांना त्यांच्याकडून दोन वर्षांच्या तालमीत तोडी, शुद्ध कल्याण, यमन कल्याण वगैरे राग शिकायला मिळाले. त्यांनी बुवांना स्वरांचा लगाव व सुरेलपणा शिकवला. बुवांच्या गाण्यात त्यामुळे पुष्कळ फरक पडला. यानंतर शंकरराव सरनाईकांनी उ.रजबअली खाँ यांचा गंडा बांधला. मात्र त्यांना कंपनीच्या कामातून शिकायला वेळ काढता येत नसल्याने निवृत्तीबुवाच रजबअली खाँकडून दोन वर्षे शिकले. ‘यशवंत नाटक मंडळीं’चा मुक्काम मुंबईला असताना शंकररावांनी उ. अल्लादिया खाँसाहेबांचा गंडा बांधायचे ठरविले व १९३० साली हे गंडाबंधन झाले. 
१९३० ते १९३३ अशी तीन वर्षे बुवांना खाँसाहेबांची तालीम मिळाली. फुलश्री रागाने सुरुवात होऊन नंतर यमन, देवगिरी बिलावल, रायसा कानडा, मियां की तोडी, लक्ष्मी तोडी, बहादुरी तोडी, रूपमती मल्हार, पटमंजिरीचे सात-आठ प्रकार अशा अनेक रागांची तालीम मिळाली. बुवांनीही भरपूर मेहनत केली. यशवंत नाटक मंडळी १९३५ साली बंद झाली व बुवा कोल्हापूरला परत आले. पुढे त्यांनी संगीत हा व्यवसाय म्हणून पत्करला. एकीकडे त्यांनी विद्यादानाचे कार्य सुरू केले व दुसरीकडे मैफली गायक म्हणून आपला जम बसवायला सुरुवात केली. लवकरच आघाडीच्या गायकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
 पं.निवृत्तीबुवांची सुरुवातीची तालीम सवाई गंधर्वांची असल्याने बुवांच्या गाण्यात किराणा घराण्याचा प्रभाव होताच. त्याचबरोबर मधुकर वृत्तीने ते सतत विद्या वाढवीत राहिले. ते अत्यंत बुद्धीमान होते.  त्यांची गानजिज्ञासा पराकोटीची होती. त्यांनी अनेक कलाकारांकडून अनवट राग, दुर्मिळ बंदिशी घेतल्या व आपले गाणे समृद्ध केले.
जयपूर घराण्याच्या परंपरेत बुवा बंडखोर समजले जातात. सतत खुल्या आकाराने ते गायले नाहीत.  जयपूर गायकीत फारसे न आढळणारे विलंबित एकताल निवृत्तीबुवा अनेकदा गायले आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम बंदिशींची रचना केली. बुवांचे तबल्यावर प्रभुत्व असल्याने संगीतातील तान आणि लय या दोन्ही अंगांचा विचार त्यांनी आपल्या गायकीत प्राधान्याने केला. त्यांच्या तानक्रियेवर उस्ताद अल्लादिया खाँ व उस्ताद रजबअली खाँ या दोघांचा प्रभाव फार मोठा आहे. या दोघांच्याही तानक्रियेच्या पद्धतीत स्वत:च्या प्रतिभेची भर घालून बुवांनी स्वत:ची अशी खास तानक्रिया तयार केली. ती तानक्रिया ‘पं. निवृत्तीबुवांची तानक्रिया’ म्हणून ओळखली जाते. बुवांनी काही पारंपरिक छोटे ख्याल थोडासा बदल करून आकर्षक केले आहेत.
पं.निवृत्तीबुवा १९६६ मध्ये मुंबईत आले. तिथे १९६९ ते १९७९ अशी दहा वर्षे ते मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात सन्माननीय गुरू म्हणून कार्यरत होते. सरदारबाई कारदगेकर, आझमबाई, प्रभुदेव सरदार, विजया जाधव-गटेलवार, ज्योत्स्ना मोहिले, नीलाक्षी जुवेकर, प्रसाद सावकार, दिनकर पणशीकर, गणपुले, विनोद डिग्रजकर, हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. तसेच किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, पद्मा तळवलकर, जयश्री पाटणेकर याही काही काळ बुवांकडून मार्गदर्शन घेत असत. अरुण व उल्हास या कशाळकर बंधूंनीही बुवांच्या तानक्रियेचा प्रभाव अंगीकारला. त्यांना १९७९ साली कलकत्ता येथील संगीत रिसर्च अकादमीत आमंत्रित केले गेले. त्यांना १९९१ मध्ये कंपवायूचा त्रास सुरू झाला, त्यामुळे त्यांचे गायनही कायमचे थांबले. बुवा मुंबईला परत आले; परंतु त्यांची प्रकृती खालावतच गेली. पं. निवृत्तीबुवांना ‘संगीत नाटक अकादमी’ (१९७९), ‘तानसेन’ पुरस्कार (मध्यप्रदेश सरकार, १९८६), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार (१९९०) आदी सन्मान प्राप्त झाले.

         — डॉ. लता गोडसे

सरनाईक, निवृत्तीबुवा तुकारामबुवा