Skip to main content
x

श्रॉफ, गोविंददास मन्नुलालजी

गोविंदभाई श्रॉफ

     हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचा लढासुद्धा ‘भारतीय राष्ट्रीय शिक्षणा’ने भारलेला होता. या लढ्यातले गोविंदभाई श्रॉफ हे अग्रगण्य नेतृत्त्व होते. खरंतर भाईजी एम.स्सी. एलएल.बी. होते. पण वकिलीपेक्षा शिक्षकी स्वीकारली होती. हा स्विकार मनःपूर्वक होता. म्हणूनच तर औरंगाबादला सरकारी माध्यमिक शाळेत इंग्रजी, गणित हे विषय ते समरसतेने शिकवित, एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचा लढा नेटाने पुढे गतिमान होत होता. भाई त्यात सक्रिय होते. या गतिमानतेला रोध करू पाहणारी सरकारी शिक्षकी भाईजींनी सोडून दिली. शिक्षकी सोडली तरी शिक्षणाचा विचार सोडला नाही तर तो अधिक कृतिपर केला. निजामाने लादलेले शिक्षणाचे उर्दू माध्यम तेवढ्याच कठोर अशैक्षणिक सुविधा यात गुदमरत असलेल्या हैद्राबाद संस्थानातील जनसामान्यांच्या बौद्धिक जीवनाची मुक्ति भाईजींना अपेक्षित होती. त्यासाठी ते तरूणांना राजकारणात येण्यास सांगत होते, त्याचवेळी विद्यार्जनासी असलेली नाळही जपायला सांगत होते आणि म्हणूनच विद्यार्जन व राजकारण यांचा समतोल साधणारा औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेकडे भाईजींचा ओढा होता. १९३९ मध्ये या संस्थेसाठी इतर कार्यकर्त्यांसमवेत निधी संकलन करण्याचे काम भाईजींनी स्वयंप्रेरणेने केले होते. १९६७ मध्ये भाईजींनी संस्थेचे चिटणीस पद स्विकारले आणि १९७३ मध्ये संस्थेचे अध्यक्षपद स्विकारले. शैक्षणिक नेतृत्त्वाचा हा मापदंड आणि मानदंड सगळ्या शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श ठरला होता. त्यांच्या कर्तृत्त्वामुळे औरंगाबादला दोन महाविद्यालये, दोन प्रशाला व ग्रामीण भागात नऊ प्रशाला असा संस्थेचा विस्तार झाला.

     १९७४ मध्ये भाईजींनी ‘स्वामी रामानंद तीर्थ’ संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला व चिटणीस पदाची जबाबदारी स्विकारली. २००० पासून अध्यक्षपदाची सूत्र सांभाळली.

- डॉ. संतोष मुळावकर

श्रॉफ, गोविंददास मन्नुलालजी