Skip to main content
x

टाकसाळे, मुकुंद मोरेश्वर

     मुकुंद मोरेश्वर टाकसाळे यांचा जन्म बारामती येथे झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नीरा येथे झाले. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी पत्रकारिता पदवी प्राप्त केली.

‘मनोहर’ साप्ताहिकातून त्यांनी लिखाणास प्रारंभ केला. त्यांनी ‘मेलोऽमेलोऽमेलो ड्रामा’ हे विडंबन नाट्य; ‘टाकसाळीतील नाणी’, ‘हसंबद्ध’, ‘हास्यमुद्रा’ हे विनोदी कथासंग्रह; ‘नाही मनोहर तरी’, ‘गमत गमतीत’, ‘आणखी गमतीगमतीत’, ‘मिस्किलाट’, ‘सक्काळी सक्काळी’,  ‘स(द)र मिसळ’ हे विनोदी लेखसंग्रह लिहिले. ‘पु.ल. नावाचे गारुड’ हा पु.ल.देशपांडे यांच्यावरील लेखांचा ग्रंथ त्यांनी  संपादित केला. ‘भटकबहाद्दर बोकोबा’, ‘बेगमगुलाबो’, ‘मावशी आणि तिचे फुगे’ हे बालकथासंग्रह लिहिले.

अनेक नामवंत दिवाळी अंकांमध्ये त्यांचे विनोदी लेख सातत्याने प्रकाशित होतात. अनेक दैनिकांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये खुसखुशीत सदर लेखन केले. दूरदर्शन मालिकांसाठी लेखन केले.

महाराष्ट्र राज्य शासनाकडून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, सार्वजनिक वाचनालय, नाशिक, चिं. वि. जोशी पुरस्कार यांनी त्यांना मानाचे साहित्य पुरस्कार प्रदान केले. प्रसंगनिष्ठ, चतुर व खुसखुशीत स्वरूपाचा विनोद हे टाकसाळे यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होय.

समकालीन स्थितीचे सूक्ष्म अवलोकन करून ते शब्दांमध्ये चित्रित करणे, हे त्याचे कसब आहे. समाजातील गैरवर्तणुकीचे वास्तव दर्शन उपरोधात्मक शैलीत त्यांनी केले आहे. स्पर्धेच्या युगात मध्यम वर्गीयांची धावपळ वाढली आहे. त्यामुळे तणाव वाढले आहेत. हा तणाव सुसह्य करण्याचे काम टाकसाळे यांच्या विनोदाने केले आहे. वाचकाला आपलेच चित्रण खुसखुशीत पद्धतीने केलेले पाहायला आवडते; तसे वर्णन करून फार न झोंबणारे चिमटे टाकसाळे यांनी विनोदाच्या माध्यमातून काढले आहेत. वाचकांच्या चेहर्‍यावरचे हास्य हे त्यांच्या लेखनाला मिळालेले मोठे बक्षीस आहे.

- श्याम भुर्के

टाकसाळे, मुकुंद मोरेश्वर