Skip to main content
x

तांंदळे, नागोराव विश्वनाथ

            नागोराव विश्‍वनाथ तांदळे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील तालुका मंगळुरपीर मोहरी गावी झाला. वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे नियतीच्या फेऱ्यानुसार कुटुंबाची अपेक्षित परवड सुरू झाली. नागोरावांना कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हातभार लावावा लागला. हालअपेष्टा असूनही त्यांनी शालेय जीवनात वरचा क्रमांक कायम राखला. तांदळे यांच्या मातोश्री सुभद्राबाई मानिनी होत्या, आपले कुटुंब हालात दिवस काढत आहे, याची त्यांनी धनाढ्य माहेराला कधीही कल्पना दिली नाही; पण माहेरच्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी त्वरित दूध देणारी म्हैस पाठवून मदत केली. शालेय क्रमिक पुस्तके घेण्याइतकीही आर्थिक स्थिती नव्हती. दांडगी स्मरणशक्ती असल्याने तांदळे १९५५मध्ये मॅट्रिकला गावामधील तीन शाळांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांचे सावत्र मामा व गावातील पशुवैद्यांनी त्यांना पशुवैद्यक शिक्षण घेण्यास सूचवले, कारण त्या काळात पशुवैद्यकांना त्वरित नोकरी उपलब्ध होत असे.

            जबलपूर येथील पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दरमहा तीस रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. त्यामुळे नागोरावांनी जबलपूरमध्ये शिक्षण घ्यावे, असे ठरले. त्यांनी प्रचंड कष्ट उपसून १९५९मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. मध्य प्रदेश सरकारकडून पशुवैद्यक अधिकारी या पदासाठी नेमणूक पत्र मिळाले. पण कुटुंबीयांनी परमुलखात नोकरी करण्यासाठी नापसंती दर्शवली. अल्पावधीतच महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना अकोला जिल्ह्यातील मानोरा येथे नोकरी मिळाली व ते पशुवैद्यक अधिकारी या पदावर रुजू झाले.

            तांदळे ऑगस्ट १९५९ ते जून १९६४ या काळात मानोरा येथे कार्यरत असताना समाजाच्या भल्याची कृती करताना राजकीय विरोधाला कधीही डगमगले नाहीत.  याच अनुभवातून खंबीर नेतृत्व वाढीस लागले. याच काळात पशुवैद्यकीय दवाखान्याची परिपूर्ण इमारत उभी झाली. त्यामुळे पंचक्रोशीमधील पशुपालकांना सुसज्ज रुग्णालय उपलब्ध झाले. त्यांची १९६४मध्ये मूर्तिजापूर येथे तालुक्याच्या प्रमुख दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी या पदावर नेमणूक झाली. त्यांनी प्रथमतः कृत्रिम रेतन केंद्र स्वतंत्र इमारतीसह स्थापन केले. या सुविधेमुळे उच्च वंशाच्या जनावरांच्या निर्मितीचे महत्त्व समाजास पटले व चांगल्या जनावरांची निर्मिती होण्यास गती मिळाली.

            तांदळे यांना १९६५मध्ये शासनाच्या पशुसंवर्धन खात्यामार्फत राज्यस्तरावरील रोग अन्वेषण विभागामध्ये नागपूर येथे त्यांना पदोन्नती मिळाली. या कार्यक्षेत्रामध्ये विदर्भामधील आठ जिल्हे होते. त्या वेळी कोंबड्यांमधील सालोमोनेल्ला या रोगासाठी नागपूर विभागातील कोंबड्यांची तपासणी केली. तसेच त्या काळात चंद्रपूर येथील वनविभागाच्या हत्तींवर उपचार करण्याची संधी त्यांना मिळाली होती. या कालावधीमध्ये विभागांतर्गत घेतल्या जाणाऱ्या लेखापरीक्षेमध्ये प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाल्यामुळे बढतीचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी १९६८मध्ये एम.व्ही.एस.सी. पदवी प्राप्त केली. त्यांची १९७२च्या दरम्यान नाशिक येथे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी या पदावर नेमणूक झाली. नाशिक येथे कार्यरत असताना संकरित पैदास हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला.

            तांदळे यांची नवीन कार्यप्रणाली पुढे अनेक जिल्हा परिषदांनी आदर्श कार्यप्रणाली म्हणून स्वीकारली. जेव्हा १९७२च्या महादुष्काळामध्ये जनावरांच्या छावण्या उभारल्या गेल्या, तेथे जनावरांचा मृत्युदर अत्यल्प ठेवण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांनी १९७४मध्ये इगतपुरी भागात पसरलेली बुळकांडी या रोगाची साथ आटोक्यात आणली. जळगाव येथे १९७५मध्ये जिल्हा पशुसंवर्धन  अधिकारी म्हणून कार्यरत असताना सरकारची धोरणे त्यांनी प्रामाणिकपणे राबवली. जळगाव येथे भौगोलिकदृष्ट्या दुर्गम खेडेगावांसाठी हंगामी पशुपैदास केंद्रे व गुराखी प्रशिक्षण केंद्र काढून अशा दोन नवीन संकल्पना यशस्वी केल्या. गोठित वीर्यमात्राचे नवीन तंत्रज्ञान बरोबरच्या सेवकांना मार्गदर्शन करून यशस्वीपणे वापरात आणले. शासनाने पूर्व जर्मनीमधील तीन महिन्यांच्या प्रशिक्षण वर्गासाठी त्यांची एकमुखाने निवड केली. सातारा जिल्हा परिषदेमध्ये असताना त्यांनी सरकारी धोरणे व योजना नतद्रष्ट सेवकांमुळे व स्थानिक मतलबी नेतृत्वामुळे अडचणीत येतात व त्यांचे परिणाम सरकारच्या विश्‍वासार्हतेला बाधक ठरतात, हे पुराव्यानिशी वरिष्ठांना पटवून दिले. त्यांनी अशा दुष्ट शक्तींचा खंबीरपणे बीमोड करण्यात यश मिळवले.

            तांदळे १९८७मध्ये पुण्यामधील मुख्यालयामध्ये कार्यासन अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळू लागले. याच काळामध्ये शेळ्यामेंढ्यांच्या विकासासाठी फलटण येथील बी.व्ही. निंबकर, अप्पासाहेब पवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या आयोगाचे सचिवपद पशुसंवर्धन संचालनालयाच्या आदेशावरून त्यांनी शेवटपर्यंत सांभाळले. पुढे पशुसंवर्धन विभाग कृत्रिम रेतन केंद्र व प्रयोगशाळा येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्यामधील अधिकाऱ्यांना कृत्रिम रेतनाचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले व गोठित रेतमात्रा तंत्रज्ञानाबाबतची आदर्श मार्गदर्शक पुस्तिका तयार केली. हीच पुस्तिका पुढे पशुसंवर्धन विभागाच्या संविधेमध्ये समाविष्ट करण्यात आली.

            १९९१ ते १९९३ या काळात लातूर जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी भूकंपामध्ये भूकंपपीडितांच्या जनावरांवर समर्पण भावनेने उपचार करवून घेतले व छावण्या उभ्या केल्या. भूकंपपीडितांना नवी जनावरे मिळवून देण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून मदत मिळवून दिली. १९९३मध्ये पशुसंवर्धन विभागाचे सहसंचालक (मुख्यालय) या पदावर असताना विभागाच्या शतकपूर्तीचा नेत्रदीपक कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला. त्यांना अतिरिक्त संचालक या पदावर १९९५मध्ये प्रथमतः काम करण्याची संधी मिळाली. ते ३१ डिसेंबर १९९५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या काळात पशुवैद्यकीय विद्यापीठात स्थापना करण्यासाठी, तसेच भारतीय पशुवैद्यकाचा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी प्रकल्प अहवाल व प्रस्ताव त्यांनी तयार केले व ते शासनाने मान्य केले.

            सेवानिवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा, या एकाच प्रेरणेने नागोराव विश्‍वनाथ तांदळे यांनी विविध संस्थांमध्ये काम करायचे, हे निश्‍चित केले. पुण्यामधील मिटकॉन या संस्थेचे सहयोगी सल्लागार, तसेच अध्यक्ष, फलटण येथील शेळी-मेंढी विकास संस्थेमध्ये विश्‍वस्त सभासद या पदावर कार्यरत आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघात ते सल्लागार म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे, या संस्थेचे ते २००४पासून अध्यक्षपद भूषवत आहेत. या संघटनेला लौकिक प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी पशुवैद्यक व पशुपालन या क्षेत्रामध्ये अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात.

- मिलिंद कृष्णाजी देवल

तांंदळे, नागोराव विश्वनाथ