तारळेकर, गणेश हरी
गणेश हरी तारळेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील तारळे या गावी झाला. ते संस्कृत व संगीत या दोन्ही विषयांचे गाढे विद्वान होते. ‘संगीत रत्नाकर’ या शाङर्गदेवांच्या ग्रंथाचे त्यांनी कलानिधी टीकेसह केलेले सटीप भाषांतर अतिशय प्रसिद्ध आहे.
मुंबई विद्यापीठातून त्यांनी संस्कृत विषयात एम.ए.ची पदवी संपादन केली, तसेच बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदी विषयात एम.ए. केले. त्यांनी मुुंबई विद्यापीठाची बी.टी. ही पदवी, तसेच पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयाची पीएच.डी.ही मिळवली.
कोल्हापूरच्या नीळकंठबुवा चिखलीकर यांच्याकडे डॉ. गणेश तारळेकरांनी चार वर्षे गायनाची तालीम घेतली. जळगावच्या एम.जे महाविद्यालयामध्ये आणि धुळ्याच्या एस.व्ही.पी. महाविद्यालयामध्ये त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. ते संस्कृत व संगीत या विषयांसाठी संशोधकांना मार्गदर्शन करीत असत.
‘दी सामन चँट्स ए रिव्ह्यू ऑफ रिसर्च’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक (१९८५) बडोद्याच्या इंडियन म्युझिकॉलॉजिकल सोसायटीने प्रसिद्ध केले. याखेरीज ‘सामन चँट्स इन थिअरी अँड प्रॅक्टिस’ (१९९५) हे पुस्तक त्यांनी लिहिले. ते मुंबईच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित झाले. ‘स्टडीज इन नाट्यशास्त्र विथ स्पेशल रेफरन्स टू संस्कृत ड्रामा इन परफॉर्मन्स’ हा त्यांचा ग्रंथ १९९१ साली प्रसिद्ध झाला. सामवेदातील ‘पुष्प सूत्र’ प्रातिशाख्यावरील त्यांचा ग्रंथही (२००१) प्रकाशित झाला. भारतीय वाद्यांविषयीची त्यांची ‘इंडियन म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स इन स्कल्प्चर्स’ व ‘भारतीय वाद्यांचा इतिहास (१९७२ व १९७३) ही इंग्रजी व मराठी पुस्तके गाजली.
पुण्यातील ‘पुणे भारत गायन समाजा’चे अध्यक्षपद, तसेच महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे ते विश्वस्त होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांचा सहभाग असे. उत्तर भारतातील शास्त्रीय व लोकसंगीत, संस्कृत नाटके, वेदवाङ्मय यांवर त्यांनी पुष्कळ लिखाण केले आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी नलिनी तारळेकर यांचेही मोलाचे सहकार्य त्यांना सांगीतिक संशोधनात लाभले. त्यांचे पुण्यात निधन झाले.
निवृत्त प्राध्यापकांना विशेष योगदानासाठी यू.जी.सी.कडून दिला जाणारा पुरस्कार त्यांना मिळाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘आदर्श संस्कृत शिक्षक’ पुरस्कार, ‘स्वरसाधना रत्न’ पुरस्कार, ‘राष्ट्रपती’ पुरस्कार, मुंबईच्या ‘म्युझिक फोरम’चा ‘अनुसंधान’ पुरस्कार (२०००) असे विविध पुरस्कार त्यांना लाभले.