Skip to main content
x

तोरो, गुरुनाथ

       गुरुनाथ तोरे यांचा जन्म मिरज संस्थानातील मोडनिंब या गावी माघ शुद्ध एकादशीला झाला. बालवयातच आईवडीलांचे छत्र हिरावले गेल्यानंतर आतेभाऊ हरिपंत अडके यांच्या रूपाने त्यांना आधार मिळाला. अडके त्यावेळी मालगावात शिक्षक होते. तोरोंचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. पुढे ते हरिपुरास आले.

     कृष्णामाईच्या पाण्यात पोहणे, आखाड्यात कुस्त्या खेळणे असा त्यांचा कार्यक्रम चालत असे. हरिपुरावरून रोज सांगलीला शाळेला जायचे, त्यावेळी मित्रांसमवेत अनेक गंभीर विषयांवर चर्चा रंगत असे. हरिपुरातील भय्याशास्त्री वाटवे यांच्याकडे संस्कृतचे शिक्षणही त्यांनी याचवेळी घेतले. गरीब आतेभावाकडे किती दिवस रहावे या हेतूने ते सांगलीला आले व राम मंदिरात राहून माधुकरी मागून शिक्षण घेऊ लागले.

     राम मंदिरात गाडगीळ स्वामी रहात असत. त्यांच्यामुळे अध्यात्माची गोडी निर्माण झाली. याच काळात अनेक साधूंचे दर्शन घेतले. त्याचबरोबर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, श्री समर्थ, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला आणि ब्रह्मचारी राहून कार्य करण्याचे ठरविले. मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरी न करता देशहिताच्या दृष्टीने कार्य करावे हा विचार पक्का झाला. हा काळ राष्ट्रीय आंदोलनाचा होता. लो. टिळक, बॅ. सावरकर यांच्या आदर्शानुसार काम करण्याचा होता. त्यानुसारच तोरो व त्यांचे मित्र धोंडदेव सखदेव यांनी देशहिताच्या दृष्टीने लो. टिळकांप्रमाणे शाळा काढावी असे ठरविले. ४ डिसेंबर १९१४ रोजी लेले यांच्या वाड्यात ‘सिटी हायस्कूलची’ स्थापना करून भावी कार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात अशी कार्ये लोकाश्रयावरच चालत असत. त्यात विनायकराव जोशींनी इमारतीची जागा व धन मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले व पुढे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत दवाखानाही सुरू केला. त्याचबरोबर पंडितराव चिकोडीकर हे या संस्थापक मित्रांपैकी पहिले पदवीधर होते. पैसा नसला तरी त्यांच्याकडे मनुष्यबळ होते, ध्येय होते. बाकाच्या फळ्या रांधण्यापासून जमीन सारवण्यापर्यंतची सर्व कामे या मित्रमंडळांनी केली. त्यात लोकांनीही खूप सहकार्य केले आणि अनेक धनिकांनी या तरुणांचा उत्साह पाहून आर्थिक मदत दिली.

     सुरुवातीला त्यांनी तीन वर्ग सुरू केले. प्रत्येक वर्गात विद्यार्थी एकच आणि शिक्षक तीन होते. तोरो मराठी, संस्कृत आणि गणित हे विषय उत्कृष्ट शिकवीत असत. आपल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत असत. त्यासाठी मुलांच्या स्वाभाविक प्रवृत्ती पारखून त्यानुसार संगीत, तालीम, चित्रकला, हस्तव्यवसाय इत्यादी शिकण्याची संधी मिळावी म्हणून हे सर्व उपक्रम यथाक्रम शाळेत सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांच्या त्यागमय जीवनाचा, संन्यस्त वृत्तीचा व प्रेमळ जिव्हाळ्याचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडत असे.

     सुरुवातीच्या काळातच धोंडोपंत सखदेव वारले. या आघाताने खचून न जाता दुप्पट वेगाने तोरो कामास लागले. आपले कार्य क्षेत्र वाढविण्यासाठी तासगावला गेले. बळवंतराव गोडबोले यांच्या मदतीने तिथे शाळा काढली व ती विकसित केली.

     १९१९ मध्ये सांगली येथे ‘सांगली एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना झाली  व यानंतर ‘सिटी हायस्कूल’ हे ‘सांगली शिक्षण संस्था सिटी हायस्कूल’ या नावाने ओळखले जाऊ लागले. या शाळेतील माध्यमिक शालांत परिक्षेला बसलेले विद्यार्थी आपले आत्मकथन लिहून काढीत व हे संकलन ‘आम्ही’ या नावाने तयार करीत. भा. द. सहस्रबुद्धे यांच्या प्रेरणेने सुरूवात झालेल्या या उपक्रमात आजपर्यंत १५ हजारच्या वर विद्यार्थ्यांची आत्मकथने ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली आहेत. याच संस्थेने पुढे बालक मंदिरही सुरू केले. जे आज ‘बापट बाल शिक्षण मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे.

     तोरो यांनी  आपल्या मृत्यूपूर्वी संस्था सोडून साऱ्या भारतातील यात्रा पूर्ण केल्या होत्या. आणि इ.स. १९६४ मध्ये त्यांची जीवनयात्राही पूर्ण होऊन समाधान पावली.

- विवेक कुलकर्णी

तोरो, गुरुनाथ