ठाकरे, शेषराव कृष्णाजी
शेषराव कृष्णाजी ठाकरे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यात येनवा या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण काटोल येथेच झाले. ते १९६०मध्ये नागपूर येथून मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व त्यांनी १९६१मध्ये नागपूर येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९६४मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तून एम.एस्सी. (कृषी) ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. उदयपूर विद्यापीठातून १९७०मध्ये पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी उदयपूर कृषी विद्यापीठात नोकरीची सुरुवात केली. डॉ. पं.दे.कृ.वि.त कृषि-रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून १९७१मध्ये त्यांची निवड झाली. त्यानंतर १९९९पर्यंत त्यांनी या विद्यापीठात निरनिराळ्या पदांवर कार्य केले. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३९ लेख प्रसिद्ध झालेे आहेत. त्यांच्या ४ तांत्रिक पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, सेंद्रिय खताचा वापर केल्याने कृषी उत्पादनात होणारी वाढ, पूर्णा खोर्यातील क्षारयुक्त जमिनीचा अभ्यास व दीर्घकालीन योजना या विषयांचा समावेश आहे.
त्यांनी डॉ. पं.दे.कृ.वि.च्या संशोधन पत्रिकेचे मुख्य संपादक म्हणून काम केले आहे. त्यांनी एम.एस्सी. (कृषी)च्या सहा विद्यार्थ्यांना व पीएच.डी.च्या एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले. त्यांनी जून २००१मध्ये ३२ वर्षांची अविरत सेवा झाल्यानंतर निवृत्ती पत्करली.