Skip to main content
x

ठाकूर, कमलसिंह काशिरामसिंह

काका ठाकूर

             मलसिंह काशिरामसिंह ठाकूर यांचा जन्म मंगरूळपीर येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. त्यामुळे त्यांच्या आईने शेतकाम करून त्यांना शिकवले. ठाकूर स्वतःही शेतीतील कामे करत. शेतकाम करूनच त्यांनी एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे लहानपण येवदा, ता. दर्यापूर येथे गेले. त्यापुढचे माध्यमिक शिक्षण समर्थ हायस्कूल, अमरावती येथून पूर्ण केले. १९६४मध्ये बी.एस्सी. (कृषी)ची पदवी अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयातून घेतली आणि मध्य प्रदेशातील कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. (कृषी) ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी ग्रामसेवक ‘प्रशिक्षण केंद्र’ अमरावती येथे नोकरी केली. नंतर त्यांची निवड महाराष्ट्र शासनातर्फे प्राध्यापक म्हणून परभणी येथील कृषी महाविद्यालयात झाली.

             १९७२मध्ये अकोला येथे डॉ. पं.दे.कृ.वि.ची स्थापना झाल्यानंतर त्यांची नियुक्ती सदर विद्यापीठात कृषि-विस्तार प्राध्यापक या पदावर झाली. डॉ. पं.दे.कृ.वि.तूनच त्यांनी कृषि-विस्तार शिक्षण या विषयात पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यांनी कृषी महाविद्यालय, अकोला येथे वसतिगृहाचे रेक्टर म्हणून ५ वर्षे काम केले.

             डॉ. ठाकूर हे उत्तम कृषि-विस्तारक होते. त्यांनी अकोला येथील कृषि-विस्तार शिक्षण शाखेमध्ये राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अकोला येथील कृषी माहिती केंद्राचे ते प्रमुख कार्यकर्ते होते.

             डॉ. ठाकूर यांना ‘महाराष्ट्र विस्तार शिक्षण’ या संस्थेमार्फत उत्तम कृषि-विस्तारक (अ‍ॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन वर्कर) म्हणून गौरवण्यात आले व त्या वेळी बा.सा.को.कृ.वि.चे माजी कुलगुरू व माजी अध्यक्ष महाराष्ट्र विस्तार शिक्षण संस्था डॉ. पी.व्ही. साळवी यांनी एक प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ, जबलपूर येथील डॉ.ए.के.वर्मा यांनी उत्कृष्ट कृषि-विस्तारक म्हणून त्यांचा गौरव केला. डॉ. पं.दे.कृ.वि.चे माजी कुलगुरू डॉ. अमीन यांनीदेखील दोन वेळेस प्रशस्तिपत्रे देऊन, त्यांच्या उत्तम कृषि-विस्तारक कामाबद्दल सुयश चिंतून त्यांना गौरवले. डॉ.ठाकूर यांनी कृषीविषयक माहिती व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली.

             - प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर

ठाकूर, कमलसिंह काशिरामसिंह