Skip to main content
x

थिरकवा, अहमदजान

अहमदजान, हुसेन

हमदजान थिरकवा यांचा जन्म उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. वडील हुसेन बक्श हे प्रसिद्ध सारंगीवादक होते व आजोबा (आईचे वडील) कलंदर बक्श हे एक नावाजलेले तबलावादक व रचनाकार होते. थिरकवांचे मामा फैयाझ हुसेन व बसवार खाँ हेही उत्तम तबलावादक व रचनाकार होते, तसेच त्यांचे चुलते शेर खाँ हेही प्रसिद्ध तबलावादक व रचनाकार होते. त्यामुळे थिरकवांवर बालपणापासूनच संगीताचे, विशेषत: घरंदाज तबल्याचे संस्कार घडले. अहमदजान दहा-बारा वर्षांचा असताना त्यांच्या मोठ्या भावाने, मियाँजानने त्याला लालीचानाला उ. मुनीर खाँकडे तबला शिकण्यास नेले. मुनीर खाँनी त्याचा हात पाहण्यासाठी तबल्यावर काही वाजवण्यास सांगितले. त्याचे वादन पाहून मुनीर खाँचे वडील उ. काले खाँ म्हणाले ‘‘देखो, इस बच्चे का हाथ लय में कैसा थिरकता है।’’ तेव्हापासून ते अहमदजानला ‘थिरकू’ म्हणू लागले. पुढे थिरकूचा ‘थिरकवा’ झाला.

१८९२ साली त्यांनी उ. मुनीर खाँ साहेबांचा गंडा बांधला. मुनीर खाँंकडून त्यांना लखनौ, फरूखाबाद, दिल्ली व अजराडा घराण्याचा बाज मिळाला. सातत्याने अथक, अखंड रियाज करून ते स्वतंत्र तबलावादनात, तसेच साथसंगतीत तयार झाले.

त्यांचा हात नैसर्गिकरीत्या चपळ होता. १४-१५ तासांच्या रियाजाने निर्माण झालेली चपलता ही त्यांच्या हातांची वैशिष्ट्ये होत. चाटेवरील ‘ना’, तसेच तबल्याच्या लवेवर काढलेला जरबेचा ‘ता’ एवढा आसदार होता, की केवळ या नादावर श्रोते लुब्ध होत. बायाँवरील दाब-गाज अतिशय कर्णमधुर होता. तबल्यातील कोणतेही वर्ण त्यांच्या बोटांमधून सहजगत्या निघत. ‘धिरधिर किटतक’ या बोलावर तर त्यांचे प्रभुत्व होते. अतिशय वेगात, जोरकस व स्पष्ट उमटणार्‍या या थिरकव्यामुळेच त्यांचे ‘थिरकवा’ हे नाव सार्थ झाले.

‘पेशकार’ हा प्रकार गायनातील आलापासारखा असतो. कायद्याच्या ठरावीक नियमांचे बंधन नसल्यामुळे उत्स्फूर्त सुचलेल्या उपज अंगांनी त्यांचा विस्तार होऊ शकतो. थिरकवांनी हा पेशकार अतिशय रंजकतेने मांडला. यात त्यांची प्रतिभा दिसून येते. कायदे, रेले, गती वगैरे वादनप्रकारांमध्येसुद्धा त्यांनी केलेला विस्तार त्यांच्या कलाशक्तीची ग्वाही देतो. हिंदुस्थानातील अव्वल दर्जाच्या अनेक गायक, वादकांबरोबरच थिरकवांनी भास्करबुवा बखले, बालगंधर्व, कृष्णराव फुलंब्रीकर, फैय्याजखाँ, विलायत हुसेन खाँ वगैरे गवयी, तसेच अनेक तंतुवाद्यकार यांची संगत केली.

महाराष्ट्रात थिरकवा विशेष प्रसिद्ध झाले ते बालगंधर्वांना केलेल्या साथीमुळे. भास्करबुवांच्या सांगण्यावरून बालगंधर्वांनी गंधर्व नाटकमंडळीत (१९१३-१९२०) दरमहा ६०० रु. पगार देऊन त्यांना नाट्यपदांच्या साथीस ठेवले. रामपूरच्या नवाबाकडे १९३५ ते १९४६ या दरम्यान थिरकवा दरबारवादक होते, तसेच मॉरिस महाविद्यालय (भातखंडे हिन्दुस्थानी संगीत महाविद्यालय, लखनौ) येथेही १९४८-१९४९ दरम्यान ते तबलावादनाचे शिक्षण देत. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई येथेही ते १९७१-१९७३ दरम्यान तबलावादनाचे मार्गदर्शन करीत. तबलावादनाच्या प्रसारात थिरकवा यांचा मोठा वाटा आहे.

खाँ साहेबांवर संगीताचे एवढे संस्कार होते, की एखादी सुंदर चीज त्यांच्या गळ्यातून सहजगत्या प्रकट व्हायची. त्यांच्या उल्लेखनीय शिष्यांमध्ये सर्वस्वी जगन्नाथबुवा पुरोहित, लालजी गोखले, लखनौचे एस.के. वर्मा, नारायण गजानन जोशी, निखिलज्योती घोष, भाई गायतोंडे, बापू पटवर्धन, अरविंद मुळगावकर यांचा समावेश होतो. भारत सरकारतर्फे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार (१९५३-१९५४) व १९६० साली ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अहमदजान थिरकवा यांच्या असंख्य ध्वनिफिती व अनुबोधपट आज उपलब्ध आहेत. त्यांच्या जीवनावर वाडिया यांनी एका लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे.

        — अरविंद मुळगावकर

थिरकवा, अहमदजान