ठकार, चिंतामण विनायक
चिंतामण विनायक ठकार यांचा जन्म मध्य प्रदेशातील नरसिंगगड येथे झाला. त्यांचे वडील विनायक गोपाळ ठकार हे नामवंत डॉक्टर होते. त्यांच्या आईचे नाव मनोरमाबाई होते. ठकार यांचे प्राथमिक शिक्षण सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात झाले. नंतर वडिलांनी पाचगणी येथेच आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा जम यशस्वीरीत्या बसवला आणि भोवतालच्या ग्रामीण जनतेची वैद्यकीय सेवा सुरू केली. ठकार यांनी पुढील शिक्षण पाचगणीतील हिंदू विद्यालयात घेतले. त्यांनी बी.एस्सी.चे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू केले; परंतु पदवी परीक्षा बडोदा विद्यापीठातून देऊन दुसरा गुणानुक्रम पटकावला. नंतरचे आनुवंशशास्त्रातील एम.एस्सी.चे शिक्षण पुणे विद्यापीठातून १९५५मध्ये पूर्ण केले.
ठकार यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मधमाशापालन संशोधन प्रयोगशाळेत नोकरी स्वीकारली व संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून म्हणजे १९५२पासून या क्षेत्रात संशोधन व विस्तार कार्यात सहभागी झाले. चिंतामण ठकार १९८३मध्ये पुण्याच्या केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक पदावरून निवृत्त होईपर्यंत कार्य करत होते.
प्रारंभीच्या काळात १९६०-१९६१पर्यंत चिंतामण ठकार रेशीम संशोधन प्रयोगशाळेच्या संशोधन कार्यातही सहभागी झाले होते. हे काम डॉ. गो.ब. देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. याविषयी त्यांचे काही शोधनिबंध प्रकाशित झाले. रेशीमनिर्मिती व्यवसाय महाराष्ट्रात स्थिरावण्यासाठी त्यांच्या प्रारंभिक सहभागाचा पायाभूत उपयोग झाला.
तसेच ठकार यांनी मधमाशांच्या आनुवंशशास्त्र व कोशिका आनुवांशिकी (‘बी’ जेनेटिक्स, सायटोजेनेटिक्स) या विषयावर संशोधन केले. त्यांनी भारतीय मधमाशांची गुणसूत्र संख्या निश्चित करण्यावर भर दिला. त्यांनी विविध वनस्पती स्रोतांच्या मधाचे रासायनिक पृथक्करण, तसेच परागकणांचे आकार व वानस्पतिक गुणधर्मांप्रमाणे वर्गीकरण अशा संशोधन कार्यातही सहभाग घेतला. मधमाशांच्या वाणांचे आनुवंशिक गुणधर्म, वर्तन, स्वभाववैशिष्ट्ये, मधोत्पादनक्षमता इत्यादी परिमाणे यांच्यावर आधारित निवड पद्धतीने त्यांनी प्रजनन तंत्र विकसित केले व काही वाणांचे प्रजननही केले. त्यामुळे भारतातील विविध क्षेत्रांतील मधोत्पादन व्यवसाय सुधारण्यास मदत झाली. मधमाशापालनासाठी आवश्यक उपकरणे व साधने यांचे भौगोलिक क्षेत्रांनुसार व उपयुक्ततेनुसार प्रमाणिकीकरण करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. भारतीय मानक मंडळाच्या मधमाशापालन विभागाचे अनेक वर्षे मानद सदस्य होते.
चिंतामण ठकार यांचे ५०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. ‘इंडियन बी जर्नल’ या संशोधनपर भारतीय त्रैमासिकाच्या संपादक मंडळाचे ते अनेक वर्षे सदस्य होते. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मधमाशापालक संघाचे ठकार आजीव सदस्य व कार्यकारिणी सदस्य होते.