Skip to main content
x

ठोकळ, गजानन लक्ष्मण

    हमदनगर जिल्ह्यातले कामरगाव हे गजानन लक्ष्मण  ठोकळ यांचे मूळ गाव असून त्यांचे आई-वडील शिक्षक होते. बी.ए., बी.टी.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली, पण पुढे पुण्यामध्ये येऊन लेखन-वाचन भांडार या नावाने ग्रंथविक्रीचे दुकान काढून पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय स्वीकारला व त्यात चांगला जम बसविला. कवी म्हणून त्यांच्या लेखनसेवेला प्रारंभ झाला. रविकिरण मंडळातील गिरीश-यशवंत या कवींनी सुरू केलेली ग्रामीण गीतांची परंपरा ग्रामीण भाषेचा चपखल उपयोग करून ठोकळांनी लक्षवेधक केली व या प्रकारच्या इतर कवींच्या कवितांचा संग्रह ‘सुगी’ या नावाने त्यांनी १९३४साली संपादित केला.

     रवींद्रनाथ टागोरांनी जपानी ‘टाका’ काव्यप्रकाराप्रमाणे ‘कणिका’ हा नवीन काव्यप्रकार बंगाली भाषेमध्ये रूढ केला होता. त्या रचना प्रकारानुसार ठोकळांनीही बर्‍याच कणिका लिहिल्या. १९३८मध्ये ‘मीठ भाकर’ हा जानपदगीतांचा आणखी एक संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. ग्रामीण गीत रचनेमध्ये त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटविला असला, तरी रसिकांनी त्यांच्या कथालेखनाला सर्वाधिक प्रतिसाद दिला. ‘कडू साखर’ (१९४३), ‘सुगंध’ (१९४५), ‘ठोकळ गोष्टी’ भाग १ ते ५ (१९५९ ते १९६७), ‘कोंदण’ (१९६८), ‘क्षितिजाच्या पलीकडे’ (१९७०), ‘मत्स्यकन्या’ (१९८३), या कथासंग्रहांतील कथांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ग्रामीण जीवन व ते जगणार्‍या व्यक्ती यांचे यथार्थ आकलन त्यांना असल्यामुळे आपल्या कथांमधून ग्रामीण जीवनाचे अतिशय प्रत्ययकारी चित्रण ते  करतात.

चित्रमय भाषाशैली

     ‘कडू साखर’ या कथासंग्रहातील कोल्हाट्यांच्या खेळाचे वर्णन, ‘गोफणगुंड्या’मधील गोफणीच्या लढाईचे वर्णन, ‘दौलतजादा’मधील बकुळीच्या तमाशाचे वर्णन त्यांनी कमालीच्या जिवंतपणे शब्दबद्ध केले आहे. बकुळा, साखरी, तुळशी अशी कितीतरी व्यक्तिचित्रे ते मूर्तिमंतपणे आपल्यासमोर साकार करतात. चाकोरीबाहेरचे जीवन जगणार्‍या, बेदरकार व्यक्तीही ते आपल्या कथांमधून तेवढ्याच सजीवपणे साकारतात. ‘निळे डोळे’मधील अफूच्या नशेत गर्क असणारे व्यंकटेश सरदेशमुख, स्वतःचा जीव धोक्यात घालून मालकाचा जीव वाचविणारा ड्रायव्हर ‘मामू’, गोंड आदिवासी जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी ‘रानगावची राणी’, संशयाने त्रस्त होऊन बायकोचा खून करणारा आणि साळसूदपणे वावरणारा ‘असा मी वेडा’ या कथेतील गृहस्थ, ‘एका मित्राची गोष्ट’मधील पतंगरावाच्या जीवनात पुनर्जन्माच्या कल्पनेतून निर्माण झालेला प्रश्न, अशा कितीतरी थक्क करून सोडणार्‍या व्यक्ती व घटना त्यांच्या कथांमधून आपल्याला भेटतात. आपल्या चित्रमय भाषाशैलीत ते प्रसंग अशा पद्धतीने रेखाटतात की त्या घटनेविषयी उत्कंठा वाढत जाते आणि शेवटी अचानक कलाटणी देऊन ते वेगळेच सत्य आपल्यासमोर मांडतात. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण शब्दशैलीमुळे वाचकाला एखाद्या दृकश्राव्य माध्यमासारखी अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच त्यांच्या कथासंग्रहांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.

     त्यांचे कादंबरीलेखनही असेच प्रत्ययकारी आहे. ‘गावगुंड’, ‘ठिणगी’, ‘टेंभा’ या कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. त्यात ‘गावगुंड’ या कादंबरीला विपुल लोकप्रियता लाभली. या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात तिचा समावेश होता. या कादंबरीवर आधारित चित्रपटही काढण्याचा प्रयत्न झाला. १९४५ पूर्वीच्या सातार्‍याकडील दहशतवादी जीवनाची पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी, त्यातील बेदरकार पात्रांमुळे, अद्भुत घटनाप्रसंगांमुळे व चित्रमय भाषाशैलीमुळे खूपच लोकप्रिय ठरली. मुसळगावचा धसमुसळ्या म्हणून वावरणारा जयाजी, दरोडेखोरासारखी कृष्णकृत्ये करणारा धनाजी, त्याची बायको पारू, पिसाळ फौजदाराची मुलगी लीला, धनाजीचा साथीदार राणू या पात्रांचे त्यांनी कादंबरीतून घडविलेले जीवनदर्शन प्रत्ययकारी आहे. ‘ठिणगी’ ही त्यांची कादंबरी संस्थानिक जीवनावर आधारलेली आहे तर ‘टेंभा’ ही ग्रामीण जीवनावरील वास्तव कादंबरी आहे. १९५०पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील जिरायती शेतीवर गुजराण करणार्‍या शेतकर्‍याच्या जीवनावर ही कादंबरी आहे. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अमेरिकन लेखक अलेक्स हेली यांच्या ‘ठेेीीं’ या कादंबरीची प्रेरणा घेऊन लिहिलेली कादंबरी आहे व लेखकाच्या स्वतःच्या जीवनावर ती आधारलेली आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेले ‘काका’ संपूर्ण जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार कसा करतात आणि त्यासाठी किती आणि कशा खस्ता खातात, हे ‘टेंभा’ या कादंबरीतून ठोकळांनी दाखविले आहे. या कादंबरीतील अहमदनगरकडची ग्रामीण बोलीभाषा आणि पात्रांचे वास्तव दर्शन अंतःकरणाला भिडणारे आहे.

     ग्रामीण जीवनाकडे आपल्या कथा, कादंबरी व जानपद गीते यांद्वारे रसिकांचे व प्रतिभावंतांचे लक्ष वेधणारे कथाकार, कादंबरीकार व कवी म्हणून ग.ल. ठोकळ यांची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे.

- डॉ. संजय देशमुख

संदर्भ
१.  कुलकर्णी अनिरुद्ध, संपादक; ‘प्रदक्षिणा’; कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०.
२.  मराठी वाङ्मयाचा इतिहास’, खंड ५ भाग १; महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
३.  हातकणंगलेकर म.द.; ‘मराठी कथा : रूप आणि परिसर’; सुवर्ण प्रकाशन, पुणे; प्रथमावृत्ती १९८६.
ठोकळ, गजानन लक्ष्मण