Skip to main content
x

ठोमरे, केशव भगवंत

कोला जिल्ह्यात लाडाचे कारंजे या गावी जन्मलेल्या केशव भगवंत ठोमरे यांचे वडील रॅली ब्रदर्समध्ये कपाशीचा व्यवसाय करीत. वयाच्या चौथ्या वर्षी झालेल्या  विषमज्वराने ठोमरे पूर्ण अंध झाले. बरेच उपाय करूनही काहीच फायदा झाला नाही. या पराधीन अवस्थेत त्यांनी संगीताचा आधार घेतला व ते खामगावला आले. त्यांना १९३० मध्ये वडिलांच्या निधनाने पुन्हा एक धक्का बसला.

केशव ठोमरे १९३१ साली नागपूरला आले आणि त्यांनी अंध विद्यालयात प्रवेश घेतला. संगीत शिक्षक सावळाराम यांच्याकडे त्यांचे संगीत अध्ययन सुरू झाले. व्हायोलिन या वाद्याची विशेष आवड असल्याने त्यांनी दादासाहेब इंगळे व अप्पासाहेब सप्रे यांच्याकडून व्हायोलिनची तालीम घेतली. ठोमरे लवकरच व्हायोलिनवादनात तरबेज झाले व त्यांना लोकप्रियताही लाभली.

ठोमरे यांनी सुब्बारावांकडे विचित्रवीणेचा अभ्यास केला. अंधशाळेचे संस्थापक रावसाहेब  वाडेगावकरांच्या हाताखाली काम करून त्यांनी संस्थेच्या कामाचा अनुभव घेतला. त्यांनी १९३९ ते १९४८ पर्यंत स्वत:चा अभ्यास चालू ठेवून शिक्षकाचे कार्य केले. वाडेगावकरांच्या निवृत्तीनंतर केशवराव अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक व जनसंपर्काधिकारी या नात्याने कार्यरत झाले. या पदांवर काम करत असतानाच ते मॅट्रिक झाले. ठोमरे १९५८ मध्ये व्हायोलिनवादनात ‘संगीत अलंकार’ झाले. त्यांनी १९६४ मध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त केली.

केशव ठोमरेंचे इंग्रजी खणखणीत होती तसेच त्यांना हिंदी, मराठी भाषा आणि ब्रेललिपी चांगली अवगत होती. व्हायोलिनवादनातील त्यांची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सुरेल हात, अचूक स्वरफेक, मींडकाम, बढत, तानांची व गजाच्या वापरातील सफाई, लयकारी, कल्पकता ही होत. पाश्चात्त्य वादनशैलीचा त्यांचा अभ्यासही चांगला होता. कार्यतत्परता हा त्यांचा स्थायीभाव होता.

त्यांनी १९६८ मध्ये भोपाळला दृष्टिहीन कल्याण संघ स्थापन केला आणि अमरावतीला अंध विद्यालय स्थापन केले. ठोमरेंचे कर्तृत्व अंध विद्यालयाच्या विकासाला निस्संशय फलदायी ठरले.

वि. ग. जोशी

ठोमरे, केशव भगवंत