Skip to main content
x

ठोंबरे, मधुकर वासुदेव

           धुकर वासुदेव ठोंबरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील निरगुडसर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बोरी व माध्यमिक शिक्षण नारायणगाव व जुन्नर येथे झाले. खेड्यातील वास्तव्यामुळे त्यांना  बालपणापासूनच तेथील शेती या प्रमुख उद्योगाची ओळख व जिज्ञासा होती. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन व कृषी महाविद्यालयात पार पडले. पीएच.डी.च्या संशोधनासाठी (१९५६-६०) वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. एल.एस. कुमार यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. या संशोधनाचे कोशिकी, रोपजननशास्त्र आणि पिकांच्या रानटी प्रजातींमधील उपयुक्त गुणधर्मांच्या लागवडीखालील जातीत संकराद्वारे उपयोग करणे व अशा गुणधर्मांची आनुवंशिकी तपासणे हे प्रमुख विषय असल्याने त्यांना याच्या पुढील काळातील अध्यापनात व संशोधनात उपयोग झाला.

           ठोंबरे यांनी पुणे, नागपूर व धुळे येथील कृषी महाविद्यालयात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथे विविध पिके व शेतीतील अनेक समस्यांची त्यांना जाणीव झाली. यातील संकरित ज्वारी बियाण्याचे उत्पादन हा एक त्यांच्या संशोधनाचा विषय होता. १९७१पासून कृषी विद्यापीठात प्राध्यापक व वरिष्ठ कापूस पैदासकार म्हणून निवृत्तीपर्यंत (१९८७) कार्यरत होते. त्यांनी २००पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध केले व २०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एम.एस्सी.चे व ८ विद्यार्थ्यांना पीएच.डी.चे मार्गदर्शन केले. राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पाद्वारे पश्‍चिम महाराष्ट्रासाठी प्रामुख्याने बागायती व खानदेशातील कोरडवाहू देशी कापसाच्या सुधारित वाणांची निर्मिती त्यांनी नव्यानेच सुरू केली व संशोधनात देशी कापसाची ‘फुले ज्योती’ व संकरित कापसाच्या ‘फुले सावित्री’ या मान्यताप्राप्त वाणांची निर्मिती आणि अमेरिकन कपाशीतील पुवंध्य वाण वापरून देशी पुवंध्य वाण निर्माण केले व कापसाचे बीजोत्पादनासाठीचे प्रयत्नही त्यांनी सातत्याने केले.

           सेवानिवृत्तीनंतर ठोंबरे औरंगाबाद येथील अजित सीड्स लि. या कंपनीचे संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. गेल्या २५ वर्षांच्या काळात कंपनीतर्फे तीस विविध पिकांचे वाणनिर्मिती, मान्यता व बीजोत्पादनासाठी दर्जेदार संशोधनाची उभारणी करत होतेे. कंपनीच्या ज्वारी, बाजरी, भेंडी व कपाशी यांच्या संकरित वाणास अनेक राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके मिळाली आहेत. गव्हाचे उत्कृष्ट वाण व कपाशीतील देशभर लागवडीस योग्य ठरलेल्या अजित ११ व ३३ वाण यांची निर्मिती मधुकर ठोंबरे यांनी केली. बी.टी. संकरित बियाण्यास मान्यता मिळाल्यानंतर हे वाण ‘बी.टी. कपाशी’ म्हणूनही देशभरात मोठ्या प्रमाणात वितरीत केले. अजित सीड्सचे अजित १५५, १७५ हे संकरित वाण बागायतीसाठी, तर कोरडवाहूसाठी १११ व १३३ या वाणांना देशभर मोठी मागणी आहे.

           बी.टी. संकरित बियाण्याबरोबरच बी.टी. कापसाच्या नवीन सुधारित तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना ओळख व्हावी; म्हणून डॉ. ठोंबरे यांचे ‘बीजकापूस लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. या सर्व प्रयत्नांमुळे अजित सीड्स या कंपनीची देशभरात उत्तम बीजनिर्मिती करणारी संस्था म्हणून ख्याती झाली. मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन करणारी आघाडीची प्रमुख कंपनी ही ओळख राज्यात व देशभरात झाली आहे.

- संपादित

ठोंबरे, मधुकर वासुदेव