Skip to main content
x

उप्पल, बद्रिनाथ

   बद्रिनाथ उप्पल यांनी पंजाब विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. पदव्या प्राप्त केल्यानंतर आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून वनस्पति-विकृतिशास्त्र या विषयात पीएच.डी.ची पदवी मिळवली. १९२६ ते १९४७ या काळात त्यांनी मुंबई शासनाच्या वनस्पति-विकृतिशास्त्र या विभागात वनस्पति-विकृतिशास्त्रज्ञ म्हणून काम केले. बॉटनी इन्स्ट्रक्टर, प्लॅन्ट पॅथॅलॉजिस्ट म्हणून पुणे येथील कृषी विद्यापीठातही ते कार्यरत होते. १९४६-४८ या काळात त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्राचार्यपद भूषवले, तर १९४८-५२ या कार्यकाळात त्यांची कृषि-संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात सदर विभागाने उल्लेखनीय काम केले. त्यांनी १९५२ पासून भारत सरकारचे कृषि-आयुक्त म्हणूनही काम केले.

    सन १९१९ मध्ये पुसा येथे भरलेल्या दुसर्‍या कवकशास्त्र (मायकॉलॉजी) परिषदेत आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन अधिकाधिक पिकांच्या रोगांवर संशोधन व्हावे; म्हणून वनस्पति-विकृतिशास्त्र विभागाच्या स्थापनेची शिफारस केली. यानुसार १९२६ मध्ये स्वतंत्र विभाग सुरू झाला व डॉ. बद्रिनाथ उप्पल यांची वनस्पतिविकृतिशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. या विभागाच्या कार्यक्रमात पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन, संशोधन व विकासकार्याबाबत सल्ला इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होता. सन १९३० ते १९४० हा काळ वनस्पतिविकृतिशास्त्र संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व उल्लेखनीय म्हणून गणला गेला. या काळात डॉ. बद्रिनाथ उप्पल (कृषि-आयुक्त) यांनी दूरदृष्टीने कापसावरील मररोग, सुपारीचा कोलेरोग, गव्हावरील खोडाचा ताम्बेरा, तसेच विषाणुजन्यरोग यांसारख्या महत्त्वाच्या रोगांवरील संशोधनावर भर दिला. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे कापसावरील मररोग नियंत्रणासाठी मररोग प्रतिबंधक वाणांचे प्रजनन करून काचगृहात नियंत्रित परिस्थितीत, विस्कॉन्सीन टेेंपेरेचर टँक तंत्राचा वापर करून जयधर, गिरनार, विजलपा, दिग्विजय व दौलत हे मररोग प्रतिबंधक वाण अनुक्रमे मुंबई, कर्नाटक, खानदेश, दक्षिण गुजरात, मध्य गुजरात आणि उमरज या विभागांसाठी विकसित केले. त्याचबरोबर भारतामध्ये निरनिराळ्या संशोधन केंद्रांवर कापूस, तेलबिया व तृणधान्यावर संशोधन सुरू केले.

    दुसर्‍या पंचवार्षिक योजनेतील शेतीसंबंधीचा विकास आराखडा त्यांनी तयार केला आणि त्याचबरोबर निरनिराळी रासायनिक खते तयार करण्याच्या कार्यक्रमाचाही आराखडा तयार केला. देशात निरनिराळ्या ठिकाणी मृदा संधारण संशोधन केंद्रे स्थापन करून, तेथे संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केले. देशामध्ये शेतजमिनींचे सर्वेक्षण करून त्यांचे वर्गीकरण करण्याचा कार्यक्रमही डॉ. उप्पल यांनी आखला.

    इन्साचे फेलो अ‍ॅवॉर्ड, इंडियन फायटो पॅथॅलॉजिकल सोसायटीचे सदस्यत्व, पद्मश्री, एम.बीई ४५, आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी अ‍ॅवॉर्ड, पंजाब अ‍ॅग्री युनिव्हर्सिटी डी.एस.सी. इत्यादी त्यांना मिळालेले सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरवच होय.

- संपादित

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].