Skip to main content
x

वाडेकर, अलकनंदा अशोक

बकुळ पंडित

लकनंदा अशोक वाडेकर, अर्थात पूर्वाश्रमीच्या बकुळ पंडित, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री गायिका, यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रघुनाथ बाळकृष्ण पंडित व आईचे नाव रजनी पंडित. वडील व्यवसायाने औषध विक्रेते; पण त्यांना संगीताची आवड होती. ते तबला व बासरी वाजवत. बकुळ पंडितांचे प्रारंभिक संगीत शिक्षण त्यांच्याचकडे झाले. व्यवसायामुळे रघुनाथ पंडितांना हैद्राबाद येथे स्थायिक व्हावे लागले. त्यामुळे बकुळ पंडित यांचे शालेय शिक्षण हैद्राबाद येथेच झाले. त्या १९६४ साली हैद्राबादच्या ‘विवेकवर्धिनी’ या शिक्षणसंस्थेतून मॅट्रिक झाल्या. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचे संगीत- शिक्षणही सुरू होते. भगवान धारप यांच्याकडे त्या ‘गीतरामायण’ शिकल्या. त्यानंतर दिगंबर कामतेकर व उत्तमराव पाटील यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताचे धडे घेतले. त्यांनी १९६५ व १९६६ मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या शास्त्रीय व सुगम संगीत स्पर्धेतून प्रथम पारितोषिक पटकावले.
त्या १९६६ साली संगीत शिक्षणासाठी म्हणून पुण्यात आल्या. पुण्यात पं.वसंतराव देशपांडे, विजय करंदीकर, हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांचे शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण झाले. याबरोबर फर्ग्युसन महाविद्यालयामधून तत्त्वज्ञान या विषयात पदवी तसेच पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रमही (एम.ए.) पूर्ण केला.
बकुळ पंडितांचा रसिकांना परिचय झाला तो ‘कट्यार काळजात घुसली’ व ‘हे बंध रेशमाचे’ या दोन नाटकांतून. त्यांचे २१ जानेवारी १९७० रोजी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘उमा’ या भूमिकेतून रंगभूमीवर प्रथम पदार्पण झाले. यातूनच त्यांच्या गायनकलेचा परिचय रसिकांना झाला. यात त्यांच्या गायनाला फारसा वाव नव्हता. मात्र, ‘हे बंध रेशमाचे’ (१९७२) या रणजित देसाईंच्या नाटकातील रेशमाची त्यांची भूमिका अभिनय आणि गायनानेही गाजली. यानंतर ‘पाणिग्रहण’ (१९७१), ‘अशोकपुत्र कुणाल’ (१९७२, संगीत : गोविंदराव अग्नी), ‘इथे बुद्धीवादी हरला आहे’ (१९७३, संगीत : राजेश्वर बोबडे) इ. नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. त्यांचा १९७३ सालीच व्यवसायाने स्त्री-रोगतज्ज्ञ असलेल्या अशोक देवीदास वाडेकर यांच्याशी विवाह झाला व त्या अलकनंदा वाडेकर झाल्या.या दरम्यान त्यांना पं. जितेंद्र अभिषेकी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. १९७७ पासून सुमारे १०/१२ वर्षे सातत्याने त्या आग्रा घराण्याचे गायक व उत्तम शिक्षक पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडे तालीम घेत होत्या.
बकुळ पंडितांनी ‘गणानं घुंगरू हरवलं’, ‘कुंकू माझं भाग्याचं’ या राम कदम यांचे संगीत असलेल्या मराठी चित्रपटांतूनही गाणी गायली आहेत. सुधीर फडके यांच्याबरोबर गायलेले ‘देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी’ हे गाणे, तसेच ‘लाल लाल मिरची तोडा बायांनो’ अशी काही मोजकीच चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. सी. रामचंद्र यांच्या ‘गीत गोपाल’ या कार्यक्रमातून त्यांचा सहभाग होता. हैद्राबादला असताना त्या गझलही गात.
शास्त्रीय संगीताच्या पक्क्या तालमीमुळे सूर-लयीचा झालेला पक्का पाया व तयारी, जात्याच सुरेल, गोड व बारीक आवाज, गायनातील आटोपशीरपणा व नेमकेपणा ही त्यांच्या गायनाची काही वैशिष्ट्ये होत. ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकातील ‘विकल मन आज’ व ‘का धरिला परिदेश’ या गाण्यातून त्याचा प्रत्यय येतो. तसेच श्रीनिवास खळे यांचे संगीत असलेल्या ‘पाणिग्रहण’ या नाटकातील ‘उगवला चंद्र पुनवेचा’ व ‘प्रीती सुरी दुधारी’ ही दोन गाणीही त्यांनी छान गायली असून ही नाट्यपदे रसिकांच्या मनांत घर करून बसली आहेत. नाट्यसंगीताचा बाज राखून सुगम व भावपूर्ण रूप त्यांच्या गायनातून दिसते. या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या आहेत. ‘बकुल गंध’ ही जुन्या नाटकांतील गायलेल्या गाण्यांची ध्वनिफीत निघाली आहे. ‘रंगदेवता’तर्फे  त्यांना ‘रघुवीर सावकार’ पारितोषिक लाभलेले आहे.२०१७ ‘साली बालगंधर्व  गुणगौरव पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला . श्रीमती अलकनंदा वाडेकर या नाट्यसंगीत व शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन करण्याचे काम करतात. 

माधव इमारते

वाडेकर, अलकनंदा अशोक