Skip to main content
x

वाटवे, गजानन जीवन

जानन जीवन वाटवे यांचा जन्म बेळगाव येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला व तेथेच त्यांचे शालेय शिक्षणही झाले. वडिलांनी सुचवलेला भिक्षुकीचा व्यवसाय मान्य नसल्याने व संगीत क्षेत्राच्या वेडापायी ते वयाच्या चौदाव्या वर्षी घर सोडून पुण्यास पळून आले. पुण्यात गोपाल गायन समाजात त्यांनी चार वर्षे, माधुकरी मागून संगीताचे शास्त्रीय शिक्षण घेतले.

गजानन वाटव्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी काव्यगायनास सुरुवात केली व पहिला कार्यक्रम पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये केला. माधव ज्यूलियन यांच्या ‘आई’ या कविता गायनाने वाटवे यांचे पुण्यात नाव  झाले, तर ‘वारा फोफावला’ या गीताने ते मराठी रसिकांच्या मनीमानसी जाऊन बसले आणि मराठी सुगम संगीताचे नवयुगनिर्माते ठरले. त्यांची सर्वच गीते विलक्षण गाजली, तर काही गीते मराठी सुगम संगीताची आभूषणे ठरली.
नव्या-जुन्या कवींच्या उत्तमोत्तम कविता निवडून त्यांना अर्थपूर्ण, मधुर व सहज गुणगुणण्याजोग्या चाली लावणे हा वाटव्यांचा छंद, ज्याला महाराष्ट्रातील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांना हजारोंची उपस्थिती असे. शेवटचा श्रोताही नजरेत येत नसे, एवढी गर्दी असे. गणपती उत्सवातील वाटव्यांचे कार्यक्रम ही लोकांना पर्वणीच असे. मिळेल ती जागा पटकावून, लोक पहाटेपर्यंत खिळून बसत. वह्या-पेन्सिली घेऊन कविता उतरवून घेत.
कार्यक्रमांत वाटवे एकटेच गात. सोबत साथीला फक्त तबला व व्हायोलिन असायचे. ते स्वत:च हार्मोनिअम वाजवत. त्यामुळे ऐन वेळी चालीत विविधता आणून ते गात व कवितेतील अर्थ भावपूर्णरीत्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत. काव्याची उत्तम  निवड, स्पष्ट शब्दोच्चार व कवितेला पूर्ण न्याय देणारी चाल व गायकी, ही वाटव्यांची वैशिष्ट्ये होती. अनेकविध रसाच्या कविता ते गात; शृंगार, वात्सल्य, हास्य, वीररस, कारुण्य, शांत, भक्तिरस, विरहगीते हे सर्व रस त्यांच्या गायनात आल्याने पाच-पाच तास चालणार्‍या या भावगीतांच्या कार्यक्रमांत कधीच एकसुरीपणा आला नाही.
दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानाचे ‘लता मंगेशकर’ पारितोषिक १९९३ साली मंगेशकर कुटुंबीयांनी वाटव्यांना दिले, तर १९९४ सालचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार महाराष्ट्र राज्य सरकारने वाटव्यांना दिला. विजय फाउण्डेशनने ३० जून २००१ रोजी त्यांना ‘युगनिर्माता’ पुरस्कार दिला व गदिमा प्रतिष्ठानाने २००५ साली त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. असे अनेक सन्मान वाटव्यांच्या हयातीत त्यांना मिळाले.
‘गगनी उगवला सायंतारा’ या शीर्षकाचे त्यांचे आत्मचरित्र १९७१ साली प्रथम प्रकाशित होऊन २००७ साली त्याची दुसरी आवृत्ती निघाली. पुण्यातील नारायण पेठेतील चौकाचे ‘सायंतारा चौक’ हे वाटव्यांच्या स्मरणार्थ नामकरण झाले आहे.स्वरानंद संस्थेतर्फे २०११ पासून ‘वाटवे करंडक’ही ‘नवे शब्द, नवे सूर’ अशी स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित केली जाते.

मंजिरी चुनेकर

वाटवे, गजानन जीवन