Skip to main content
x

वडणगेकर, गणपत रामचंद्र

         व्यक्तिचित्र असो की निसर्गचित्र, मध्यम पेन्सिल किंवा जलरंग असो की तैलरंग, वडणगेकर आपल्या हळुवार व रंगाच्या मोहक हाताळणीमधून चित्रनिर्मिती करीत. आयुष्यभर अशी चित्रनिर्मिती करून त्यांनी कोल्हापूर परिसरात आपले स्वत:चे असे स्थान निर्माण केले. गणपत रामचंद्र वडणगेकर यांचा जन्म कोल्हापुरात कुंभार समाजात झाला. त्यांचे वडील अगदी लहानपणीच निवर्तले. त्यानंतर गणपतच्या आई कमळाबाईंनी काबाडकष्ट करून मुलांचे संगोपन केले. कुंभार गल्लीत राहत असल्यामुळे लहानपणापासूनच विविध घाटांची कलात्मक भांडी, बैलपोळ्यांचे बैल, दिवाळीत किल्ल्यावर ठेवण्याच्या मूर्ती व गणपतीच्या मूर्ती आजूबाजूला तयार होताना दिसत. त्यांतून व मातु:श्रींना असलेल्या सौंदर्यदृष्टीमुळे वडणगेकरांच्यात लहानपणापासूनच कलेची आवड निर्माण झाली.

वडणगेकरांचे शालेय शिक्षण त्या काळातील मुलकीपर्यंत (सातवी) झाले; पण त्या सोबत त्यांना चित्रकलेची फार ओढ होती. कोल्हापुरातील चित्रकार बाबा गजबर हे त्यांना पाचवीत चित्रकला विषय शिकवीत. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे वडणगेकरांनी  एलिमेंटरी व इंटरमीजिएट या परीक्षा दिल्या. त्या काळी त्यानंतरच्या परीक्षांचे केंद्र मुंबईला होते. परीक्षेसाठी लागणारा खर्च करणे शक्य नसल्यामुळे ते त्यानंतरचे रीतसर शिक्षण घेऊ शकले नाहीत; परंतु त्यांनी चित्रनिर्मिती, अभ्यास, चिंतन व मनन सातत्याने सुरू ठेवले व त्यातून वडणगेकरांची स्वत:ची अशी कलाविषयक भूमिका व शैली निर्माण झाली.

सुरुवातीच्या काळात राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा व त्यानंतर बाबूराव पेंटरांच्या कलाशैलीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी पौराणिक देवदेवतांची चित्रे जलरंगाच्या नाजूक छटा वापरून, हळुवार व मोहक शैलीत रंगविली. यांतील लक्ष्मी व सरस्वती ही चित्रे त्यांनी जवळच असलेल्या जोशी फ्रेममेकरना दाखविली. ती आवडल्यामुळे त्यांनी फ्रेम करून ती दुकानात लावली व आश्‍चर्य म्हणजे ती चित्रे लगेचच विकली गेली. यातून अर्थार्जनाचा मार्ग मिळाला. याच काळात इंग्लिश चित्रकारांची जलरंगातील चित्रे छापलेली पुस्तके बघण्यास मिळाली व त्यांचा प्रभाव वडणगेकरांच्या जीवनावर आयुष्यभर राहिला. या चित्रांच्या प्रतिकृती करून, तसेच प्रत्यक्ष निसर्गचित्रे करून अथवा व्यक्तीस समोर बसवून, चित्रे रंगवून त्यांनी आपला सराव सुरू ठेवला.

व्यक्तिचित्रांचा सराव सुरू असतानाच त्यांनी  कोल्हापुरातील एक संत दत्तमहाराज यांचे व्यक्तिचित्र मोठ्या आकारात, भक्तिपूर्वक रंगविले. हे चित्र दत्तमहाराजांच्या मठात लागले. ते अत्यंत आकर्षक, मोहक व सात्त्विक भाव निर्माण करणारे होते. ते पाहून त्यांच्याकडे व्यक्तिचित्रांची कामे येऊ लागली. याशिवाय अर्थार्जनासाठी ते सेपिया किंवा कृष्णधवल छायाचित्रांवर तैलरंगात किंवा फोटोकलरने फिनिशिंग करून देत. हे काम इतके सुबक व आकर्षक असे, की अल्पावधीतच वडणगेकरांकडे फोटो एन्लार्जमेंट व फोटो फिनिशिंगची कामे येऊ लागली. याच काळात त्यांच्या आसपास असणारी मुले त्यांच्याकडे चित्रकलेच्या मार्गदर्शनासाठी येत. यातून त्यांची प्रसिद्धी होत गेली व त्यांना गुरुजी म्हणून लोक ओळखू लागले. याच दरम्यान त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वती होते.

कधीतरी बाबूराव पेंटरांशी त्यांची ओळख झाली व वडणगेकरांमधील कलागुण हेरून बाबूराव पेंटरांनी त्यांना आपल्या शालिनी सिनेटोन कंपनीच्या आगामी चित्रपटाच्या सेटिंगची चित्रे रंगविण्यासाठी आमंत्रित केले. शिवाय त्यांचे पेन्सिलमधील मोहक व आकर्षक रेखाटन बघून ‘उषा’, ‘प्रतिभा’, ‘सावकारी पाश’, ‘ध्रुवकुमार’ या चित्रपटांची सेटिंग्ज रेखाटण्याचे काम त्यांच्यावर सोपविले. हे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. हे बघून भालजी पेंढारकर यांनी आपल्या ‘वाल्मीकी’ या चित्रपटाच्या कलादिग्दर्शनाचे काम त्यांच्यावर सोपविले. त्यानंतर वडणगेकरांनी भालजी पेंढारकरांच्या अतिशय गाजलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ व ‘मोहित्यांची मंजूळा’ या चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले व त्यांतील ऐतिहासिक चित्रेही रंगविली. यांतील आग्र्याच्या दरबारचे दृश्य अतिशय गाजले. याशिवाय ‘गनिमी कावा’ या भालजींच्या चित्रपटासाठी वडणगेकरांनी अतिशय कमी खर्चात व कल्पकतेने सेट उभारून दिले.

कलादिग्दर्शनाची कामे सुरू असतानाच वडणगेकरांनी आपली चित्रनिर्मितीही सुरू ठेवली होती. त्यांनी १९३४ मध्ये रंगविलेल्या कोठावळे यांच्या व्यक्तिचित्राला पहिले सुवर्णपदक मिळाले. यानंतर त्यांनी गल्लीतून जाणाऱ्या एका फकिराला बसवून केलेल्या ‘हुक्का’ या तैलचित्राला कोल्हापुरातील राजाराम आर्ट सोसायटीच्या १९४४ मधील प्रदर्शनात दुसरे सुवर्णपदक मिळाले. अमृतसरच्या प्रदर्शनात १९५८ मध्ये त्यांचे जलरंगातील व्यक्तिचित्र राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. सदर चित्र त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नकळत या अखिल भारतीय प्रदर्शनासाठी पाठविले होते.

स्वत:च्या चित्रनिर्मितीसोबतच वडणगेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली. घर अपुरे पडू लागले. त्यामुळे त्यांनी कुमावत संघाच्या मदतीने ‘कला मंदिर’ ही चित्र-शिल्पकलेचे शिक्षण देणारी संस्था १९४७ मध्ये स्थापन केली. आजही ही संस्था कार्यरत असून येथे चित्र-शिल्पकलेचे शिक्षण दिले जाते.

वडणगेकरांनी कोल्हापूर परिसरात, तसेच पुणे, मुंबई येथील अनेक संस्था, उद्योगसमूह व खाजगी संग्रहांसाठी व्यावसायिक व्यक्तिचित्रे तयार केली आहेत. कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी त्यांच्याकडून स्वत:चे, तसेच आईसाहेब, अक्कासाहेब, शालिनीराजे या राजघराण्यातील व्यक्तींची समोर बसवून व्यक्तिचित्रे रंगवून घेतली. पुण्यातील टिळक स्मारक मंदिर व मुंबईचे नवीन विधान भवन येथेही त्यांची व्यावसायिक व्यक्तिचित्रे लागली आहेत. याशिवाय त्यांनी रंगविलेली श्री दत्तगुरू, संत ज्ञानेश्‍वर, जलदेवता अशी चित्रे त्यांतील मोहक रंगसंगती, हळुवार व सात्त्विक वातावरण यांमुळे लोकप्रिय झाली.

वडणगेकरांची व्यक्तिचित्रे असोत की निसर्गचित्रे, हळुवार, संयत व मोहक आविष्कार हे त्यांचे वैशिष्ट्य असते. रेखाटनावरील प्रभुत्व, सुसंवाद निर्माण करणारे मोहक रंग, सौम्य रंगछटांचे हळुवार लेपन, मांगल्य भाव, लालित्यपूर्ण रचना ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये असतात. विषय व व्यक्तिमत्त्व कोणतेही असले तरी वडणगेकर आपल्या मोहक शैलीनेच ते साकार करतात. साहजिकच, त्यांनी रंगवलेले विदर्भसिंह दादासाहेब खापर्डे असोत की संत ज्ञानेश्‍वर, अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराज असोत की शकुंतला, वडणगेकरांचा आविष्कार हा हळुवार व मोहकच असतो. निसर्गचित्रांचेही तेच. आकाश, झाडे, पाणी एवढेच नव्हे, तर डोंगर व दगडगोटेही ते आपल्या हळुवार रंगलेपनातून अत्यंत मोहक पद्धतीने रंगवितात. त्यांनी पेन्सिलसारख्या माध्यमात केलेले सेटचे रेखाटन असो की जलरंग किंवा तैलरंगातील चित्र, ते वडणगेकरांच्या खास शैलीतूनच साकार होेते.

कलेतील विविधांगी अभिव्यक्ती, प्रयोगशीलता, विरूपीकरण व भावनांचा कल्लोळ अशा भानगडीत ते कधीच पडले नाहीत. ते आपली कलासाधना ही एक तपश्‍चर्याच आहे असे मानत. पेंटिंग करताना ते जमिनीवर पद्मासनात बसत. समोर चित्रफलक, पॅलेटवर थोडेसेच रंग, जलरंग असोत की तैलरंग — अत्यंत हळुवार व पातळ रंगलेपन; चित्रात कुठेही जाड रंग किंवा जोमदार पॅचेस कधीच दिसणार नाहीत. आयुष्यभर अशा पद्धतीनेच त्यांची चित्रे तयार होत. ते म्हणत, ‘‘माझ्यासमोर ही सृष्टी आहे. अफाट निसर्गामध्ये असंख्य वस्तू सामावलेल्या असतात. निसर्गातील रंगांच्या अनेक छटा आपल्याला मोहून टाकतात. निरीक्षण करताना प्रत्येक वस्तू आपल्याशी बोलू लागते. त्याचे चित्रण चित्रकार जेव्हा आपल्या शैलीत साकारतो, तेव्हा त्यास दिव्य अनुभूती मिळते. कलेचा श्रेष्ठोत्तम आनंद हाच ईश्‍वरी अनुभव असतो. निरीक्षण, साधना व तप यांचा अपूर्व मेळ कलावंताला अशा पातळीवर नेतो, की तिथे अलौकिकतेचा साक्षात्कार होतो.’’ वडणगेकरांनी याच श्रद्धेतून त्यांची चित्रे रंगविली असे ते सांगत.

कुंभार समाज संघटित व्हावा व या समाजाचा विकास व्हावा या हेतूने त्यांनी कुमावत को-ऑप. क्रेडिट सोसायटी, कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी संस्था अशा संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन इचलकरंजी येथील फाय फाउण्डेशन, कोल्हापूर महानगरपालिका, नाशिक कला निकेतन अशा अनेक संस्थांतर्फे त्यांना पुरस्कार देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.

बेताच्या उंचीच्या, सडपातळ शरीरयष्टीच्या गणपतराव वडणगेकरांचा पोशाख अगदी साधा व नीटनेटका असे. परीटघडीचा पांढरा शुभ्र पायजमा व सदरा, गडद निळ्या रंगाचा कोट, डोक्यावर काळी टोपी व गळ्याभोवती मफलर अशा वेषातच ते आयुष्यभर वावरले. अत्यंत नियमित दिनचर्या, मोजका आहार, शांत व संयत बोलणे व प्रसिद्धिपराङ्मुखता ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. त्यांच्या विद्यार्थ्यांनी १९९८ मध्ये त्यांच्या चित्रांचे पहिले एकल प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात भरविले. मुंबई येथील नेहरू सेंटरतर्फे ‘गुरु-शिष्य’ नावाचे, बाबा गजबर व गणपतराव वडणगेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन २००२ मध्ये भरविण्यात आले होते.

                    - जयश्री मगदुम, सुहास बहुळकर

                   

संदर्भ
संदर्भ: १. वडणगेकर, डी.व्ही. व डॉ. भागवत, नलिनी; पुस्तिका (लेख): ‘गुरु-शिष्य’; नेहरू सेंटर. २. ओंकार, भय्यासाहेब; ‘कलातपस्वी वडणगेकर’ (लेख). ३. बहुळकर, सुहास; वडणगेकरांशी चर्चा.
वडणगेकर, गणपत रामचंद्र