Skip to main content
x

विल्सन, पीटर मेनार्ड

     पीटर विल्सन यांचा जन्म मुंबईत झाला. १जून१९४९ रोजी पीटर हे हवाई दलात रूजू झाले.विंग कमांडर पीटर विल्सन यांची नेमणूक १९६५ च्या पाकिस्तान युद्धात बॉम्बफेकी विमानांच्या स्क्वाड्रनवर झाली होती. या स्क्वाड्रनचे नेतृत्व विल्सन यांच्याकडे होते. कच्छ परिसरातील बादिन भागात असणारी शत्रू पक्षाची रडार यंत्रणा उध्वस्त करण्याची कामगिरी यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही रडार यंत्रणा नष्ट करणे अत्यंत कठीण होते. कारण लढाऊ विमानांचा अचूक वेध घेता येईल अशा मोठ्या बंदुका तसेच तोफा या रडारच्या आजूबाजूला तैनात करण्यात आल्या होत्या. अत्यंत अचूक पद्धतीने बॉम्बफेक केली तरच उद्दिष्ट साध्य होणार होते. ह्या अवघड कामगिरीचे  आव्हान विल्सन यांनी स्वीकारले.

     लढाऊ विमानातून नेहमीच्या उंचीवरून या रडारवर बॉम्बहल्ला केला तर विमानविरोधी तोफा आपल्यावर तातडीने हल्ला करतील हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी जमिनीपासून अत्यंत कमी उंचीवरून बॉम्बफेकी विमाने वेगाने रडार यंत्रणा बसविलेल्या ठिकाणावरून नेली आणि अचूक लक्ष साधत त्या रडारवर बॉम्बहल्ला केला. विमानविरोधी तोफांनी विमानांचा वेध घेण्याच्या आतच या सर्व हालचाली पार पाडल्याने रडार उद्ध्वस्त होताना त्या तोफा कुचकामी ठरल्या.

     लढाऊ विमान चालविण्याचे त्यांचे कसब आणि लढाईतील धैर्य वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या या शौर्याचा सन्मान २१ सप्टेंबर १९६५ रोजी  ‘वीरचक्र’ देऊन करण्यात आला. पुढे त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदका’नेही सन्मानित करण्यात आले. एअर कमोडोर पदावरून ते निवृत्त झाले.

- समीर कोडिलकर

विल्सन, पीटर मेनार्ड