Skip to main content
x

वझलवार, दत्तात्रेय गोविंद

             त्तात्रेय गोविंद तथा भैयाजी वझलवार यांचा जन्म नागपूर येथेे झाला. त्यांच्या आईचे नाव गोपिकाबाई होते, तर त्यांचे वडील हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्याध्यक्ष होते. सहा वर्षांचे असताना वडिलांच्या अचानक निधनाने कुटुंब उघडे पडले. लहानपणापासून संगीत व चित्रकलेची आवड असणारे भैयाजी रंगीबेरंगी चित्रे, स्वत: रंगविलेली चित्रे, वृत्तपत्रे वगैरे विकत. लग्नमुंजीतही मौजेने गाडगे-मडके रंगवीत, भिंतीवर चित्रे काढीत.

              भैयाजींनी नील सिटी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ते शाळेत संघगीते, समूह गीते, भक्तिगीते गात. ‘चतुर संगीत महाविद्यालया’त ते ५-६ महिने संगीत शिकले. नंतर १९२७ च्या हिंदू-मुस्लिम दंग्यामुळे त्यांचे गायनशाळेत जाणे बंद झाले. नंतर तात्याजींचे घनिष्ठ मित्र शंकर प्रवर्तक यांच्याकडे भैयाजी वझलवारांचे  रीतसर संगीत अध्ययन सुरू झाले.  त्यांनी १९३२ मध्ये ‘बालभास्कर’ ही पदवी मिळविली. ते १९३५ साली ‘संगीत शिक्षक सनद’च्या बरोबरीची ‘संगीत मध्यमा परीक्षा’ आणि दहा वर्षांनी ‘संगीत प्राज्ञ विशारद’ परीक्षाही पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. प्रवर्तक मास्तरांच्या हाताखाली ते संगीताचे वर्ग घेऊ लागले. भातखंडे संगीत महाविद्यालयामध्येही काही दिवस भय्याजींनी संगीत शिकविले.

              मुर्शद खाँसाहेब अझीमबक्ष या फकिरी वृत्तीच्या थोर कलाकाराने १९३९ साली उरुसामध्ये त्यांचे गायन ऐकले व ते खुश झाले. तेव्हापासूनच दोघे संपर्कात राहिले. खाँसाहेबांनी मनसोक्त शिक्षण दिल्याने वझलवारांनी उत्तमोत्तम चिजा, अवघड बंदिशी  आत्मसात केल्या.  प्रवर्तक मास्तर व खाँसाहेब या दोन गुरूंमुळे वझलवार नवीन रचना बांधण्यात प्रवीण झाले.

              भैयाजींचा २६ फेब्रुवारी १९४४ रोजी सुमतीबाईंशी विवाह झाला. संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या ‘श्री शारदा गायन वादनालय’ संस्थेत एके काळी सुमारे पावणे दोनशे विद्यार्थी शिकत होते. वझलवारांच्या मेहनतीमुळे व चिकाटीमुळे संस्थेची भरभराट झाली. त्यांचे एक शिष्य शिरीन लालकाका हे इंग्लंडमध्ये भारतीय संगीत विद्यालय चालवीत आहेत. गिरीश वझलवार, गणपत फडणीस, डॉली बलसारा, शरद सुतवणे, उषा पारखी  इ. अनेक शिष्य त्यांनी तयार केले. त्यांनी १९४८ ते १९६१ पर्यंत सिटी महाविद्यालयामध्ये अर्धवेळ अध्यापकाचे काम करून नंतर राजीनामा दिला.

           उत्तम संगीत शिक्षक, परीक्षक, रचनाकार व जाणकार वझलवारांनी अनेक रागांत अनेक चिजा रचल्या. त्यांच्यापाशी दुर्मिळ व अवघड चिजांचा खजिना होता. त्यांचे नागपूर येथे निधन झाले.  

              — वि. ग. जोशी

वझलवार, दत्तात्रेय गोविंद