Skip to main content
x

वर्हाडे, प्रभाकर आनंद

      प्रभाकर आनंद वर्हाडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नांदुदा तालुक्यातील ताकरखेड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण गावीच झाले. उच्च माध्यमिक शिक्षण शेलगाव बाजार येथे झाले. त्यांनी मॅट्रिक परीक्षा १९५७मध्ये उत्तीर्ण केली व नंतर नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी १९६१मध्ये प्रथम श्रेणीत प्राप्त केली. तसेच येथूनच एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यांना भा.कृ.अ.प., नवी दिल्ली यांच्यातर्फे कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी १९७५मध्ये याच संस्थेतून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. या पदवीसाठी त्यांनी समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेल्या पोटॅशियम शोनाईट या आपल्या देशात तयार केलेल्या पोटॅशियम रासायनिक खताची म्युरेट ऑफ पोटॅश व पोटॅशियम सल्फेटच्या तुलनेने निरनिराळ्या जमिनींवर पिकासाठी उपयुक्तता या विषयावर संशोधन केले. आपल्या देशात पालाश खताची आयातीद्वारे संपूर्ण पूर्तता केली जाते. त्यामुळे हे संशोधन एक स्थानिक पर्यायी पोटॅश खत उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरले.

महाराष्ट्र राज्य कृषी खात्यामध्ये त्यांनी १९६३मध्ये नोकरीला सुरुवात केली. त्यांनी कृषि-पर्यवेक्षक ते कृषि-अधिष्ठाता अशा वेगवेगळ्या पदांवर काम केले. त्यांनी एकूण २६ विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी मार्गदर्शन केले. त्यांनी ३६ संशोधनपर निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये लिहिले. त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळ्या मराठी नियतकालिकांतून वेगवेगळ्या विषयांवर निबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी पोटॅश मूलद्रव्याचा जमिनीवर काय परिणाम होतो व पोटॅश खताचा पिकाला कसा प्रतिसाद मिळतो यावर सखोल संशोधन केले आहे. त्यांनी पोटॅश मूलद्रव्याच्या जमिनीतील अवस्थांची उपलब्धता आणि पिकांचा प्रतिसाद यावर संशोधन करून याच विषयावर वेगवेगळे शोधनिबंध लिहिले. १९७५मध्ये डॉ. वर्‍हाडे यांनी राष्ट्रीय स्तरावर पोटॅश स्पर्धेत शोधनिबंध लिहिला. भारतीय मृदाशास्त्र संस्था, नवी दिल्लीतर्फे पोटॅश रीसर्च अ‍ॅवॉर्ड देऊन त्यांना गौरवले.

डॉ. वर्‍हाडे यांनी ‘अनमोल मोती आणि एकसंघ भारत’ या नावाचे पुस्तक २००७मध्ये प्रसिद्ध केले. त्यामध्ये पंडित नेहरू, बाळ गंगाधर टिळक, डॉ. राधाकृष्णन, महात्मा गांधी, विवेकानंद आदी भारतातील नामवंत लोकांची चरित्रविषयक माहिती दिलेली आहे.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

 

वर्हाडे, प्रभाकर आनंद