Skip to main content
x

वरखेडकर, वसंत श्यामराव

     वसंत श्यामराव वरखेडकर यांचा जन्म नागपूरला झाला. मॉरिस महाविद्यालयातून ते एम.ए.झाले. त्यांनी ‘समाधान’, ‘भवितव्य’ या वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काही काळ काम केले. नंतर ते शासकीय सेवेत माहिती अधिकारी होते. वरखेडकरांनी थोडेच, पण महत्त्वपूर्ण आणि प्रयोगशील लेखन केले आहे. त्यांच्या ‘संक्रमण’ (१९४१), ‘पाहुणे’ (१९५१), ‘राजपुत्र’ (१९६१), ‘प्रतिनिधी’ (१९७२), ‘आई याज्ञवल्क्याची’ (१९८३) या कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत.

     त्यांची ‘ध्येयाचा ध्यास’ (१९४२), ‘आनंदीबाई’ (१९८१), ‘नीरो’ (१९८४), ‘सृष्टीचा संकेत’, ‘पूर्वग्रह’ इत्यादी नाटकेही प्रकाशित झाली आहेत. ‘सार्वभौम’ (१९८५) हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह आहे. त्यांची लक्षणीय साहित्यकृती म्हणजे ‘सत्तावन्नचा सेनानी’(१९७७) ही कादंबरी़़ होय. एका सामान्य कुटुंबातून जन्माला आलेल्या पण स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या तात्या टोपेंनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची कामगिरी बजावली. तात्या टोपेंच्या स्फूर्तिदायक नेतृत्वाची ही चरित्र-कादंबरी आहे.

     वरखेडकरांचे बरेचसे लेखन चरित्रात्मक आहे. मात्र त्यांनी त्या-त्या विषयाला समकालीन संदर्भ दिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, राजकीय स्थिती या संदर्भातले रूपकात्मक चिंतन असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप आहे. ‘गडकर्‍यांची नाट्यप्रकृती व नाट्यसृष्टी’ (१९६१) ही त्यांची व्याख्यानेही पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहेत.

- प्रा. मंगला गोखले

वरखेडकर, वसंत श्यामराव