वसेकर, त्र्यंबक सांबाराव
त्र्यंबक सांबाराव वसेकर हे मराठवाड्यातील चित्रकला शिक्षणाचे जनक, ध्येयासक्त कला प्रचारक आणि कुशल चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील वसा या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सांबाराव कुलकर्णी आणि आईचे नाव सुभद्राबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण वसा आणि परभणी येथे झाले. इंदिरा देशपांडे यांच्याशी १९३६ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर वसेकरांनी सात वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून हैद्राबाद संस्थानाची सरकारी नोकरी केली. परंतु, चित्रकलेतील उच्च कलाशिक्षण घेण्याच्या प्रबळ इच्छेने १९४३ मध्ये नोकरी सोडून त्यांनी हैद्राबादच्या सेंट्रल स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. आर्थिक अडचणींमुळे दोन वर्षांतच शिक्षण सोडून १९४५ मध्ये त्यांनी योगेश्वरी विद्यालय, अंबेजोगाई या राष्ट्रीय शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यांनी अर्धवट राहिलेले कलाशिक्षण बहि:स्थ विद्यार्थी म्हणून पूर्ण केले आणि १९५२ मध्ये जी.डी. आर्ट ही शासकीय कला पदविका द्वितीय क्रमांकासह मिळविली.
हैद्राबाद संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर, मराठवाड्यात चित्रकलेचे शिक्षण देणारी एक स्वतंत्र संस्था असली पाहिजे या कल्पनेने त्यांना झपाटून टाकले. त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी नोकरी सोडली आणि १ जुलै १९५५ रोजी मराठवाड्यातील ‘अभिनव चित्रशाळा’ या पहिल्या कला महाविद्यालयाची स्थापना केली.
एका छोट्याशा खोलीत, केवळ चार विद्यार्थ्यांसह त्यांनी ‘रेखाकला व रंगकला’ अभ्यासक्रम सुरू केला. तसेच, बालकांच्या सर्जनशीलतेला संधी देण्यासाठी ‘बाल चित्रकला वर्ग’ सुरू केला. कालांतराने ‘चित्रकला शिक्षक प्रशिक्षण’ हा अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील शेकडो शाळांना कलाशिक्षक उपलब्ध झाले आणि शालेय कलाशिक्षणाचा पाया मजबूत झाला.
बालचित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी ‘आरंभ’, ‘बोध’, ‘आनंद’, ‘विशारद’ या नावांच्या बालचित्रकला परीक्षा सुरू केल्या. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मुलांच्या मुक्त आविष्काराला आणि नवनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले. या परीक्षा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांतही लोकप्रिय झाल्या. अगदी खेड्यापाड्यांतील, तळागाळातील मुलांपर्यंत चित्रकला पोहोचविण्याचे काम या परीक्षांनी केले.
सर्वसामान्य लोकांनाही कलासाक्षर करण्यासाठी वसेकरांनी, मराठवाडा कला फिरते प्रदर्शन, कलाप्रदर्शन, रंगावली स्पर्धा, लोककला स्पर्धा, व्याख्यानमाला, प्रात्यक्षिके अशा अनेक उपक्रमांद्वारे लोकशिक्षणाची चळवळ जिद्दीने व चिकाटीने चालवली.
त्यांनी रंगवलेली महात्मा गांधी, विनोबा, डॉ. आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ, डॉ. राममनोहर लोहिया यांची व्यक्तिचित्रे उल्लेखनीय आहेत. त्यांची जलरंगातील रचनाचित्रे बंगाल शैलीमध्ये, वॉशपद्धतीने रंगवलेली आहेत. या चित्रांमध्ये पारदर्शकता, तरलता व रचनाकौशल्य ही वैशिष्ट्ये आढळतात. ‘मेघदूत’ आणि ‘शिवपार्वती कैलास गमन’ ही अशा प्रकारची चित्रे आहेत. बाग-ए-आम, हैद्राबाद आणि हैद्राबाद आर्ट सोसायटीतर्फे आयोजित अखिल भारतीय कलाप्रदर्शनांत त्यांनी द्वितीय पुरस्कार मिळवले. त्यांनी ‘मराठवाडा’ दिवाळी अंकाची मुखपृष्ठे व सजावट अनेक वर्षे केली व त्याला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कारही मिळाला.
वसेकरांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून ‘स्मृतितरंग’ (आत्मचरित्र), ‘कलोपासक’ (कला-आस्वाद), ‘वलये’ (लघुकथा) व ‘संवेदना’ (कविता) ही पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत.
वसेकरांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची विविध कलाविषयक समित्यांचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांना १९९७ मध्ये मराठवाड्यातील प्रतिष्ठाप्राप्त ‘विनायकराव चारठाणकर’ पुरस्कार देण्यात आला, तर २००३ मध्ये त्यांना ‘नांदेडभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे १२ जुलै २००६ रोजी निधन झाले. त्यांनी स्थापन केलेल्या कलाविद्यालयाचे नामकरण २००९ मध्ये ‘कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालय’ असे करण्यात आले.
- सुभाष वसेकर