Skip to main content
x

व्यास, नारायण गणेश

         नारायण गणेश व्यास यांचा जन्म कोल्हापूरला झाला. त्यांचे वडील उत्तम गायक, सतारवादक होते. त्यांचे वडील बंधू शंकर व्यास पं. विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य होते. ते १९११ साली विष्णू दिगंबरांच्या गांधर्व महाविद्यालयात दाखल झाले. नऊ वर्षांच्या शिक्षणानंतर आपल्या बंधूंसह ते १९२२ साली अहमदाबादला आले व तेथील गांधर्व महाविद्यालयात अध्यापन करू लागले. त्यांनी १९३७ साली मुंबईत दादर येथे ‘व्यास संगीत विद्यालया’ची स्थापना बंधू शंकर यांच्या सहकार्याने केली.
       नारायण व्यासांचा आवाज पातळ, गोड, सुरेल होता. भरपूर दमसास, सुस्पष्ट सरळ, सपाट ताना हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. ग्वाल्हेर गायकीची शैली आत्मसात केल्यावर, नारायण व्यास यांनी  मास्तर कृष्णराव आणि बालगंधर्व यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आपले गाणे ढंगदार केले. शास्त्रीय संगीताबरोबरच  ते ठुमरी व भजनेही गात असत. एच.एम.व्ही.ने १९२९ ते १९४२ या काळात त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केल्या.
      दुर्गा रागातील ‘सखी मोरी’, तिलक कामोद रागामधील ‘नीर भरन कैसे जाऊँ’, बहार रागामधील ‘फुलवाले कन्थ’, मांड रागामधील ‘बालम मोरा सुनी हो’ ही ठुमरी, अशा त्यांच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाल्या आणि त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यांना निरनिराळ्या ठिकाणांहून मैफलींची निमंत्रणे येऊ लागली आणि भारतभर त्यांनी अनेक मैफली गाजवल्या.
     ‘कहां के पथिक कहां’, ‘राधेकृष्ण बोल मुख’से आणि ‘ठुमक चलत रामचंद्र’ ही त्यांची विशेष लोकप्रिय झालेली भजने होत. विष्णू दिगंबरांमुळे नारायण व्यासांना पंजाबमध्येही विशेष लोकप्रियता लाभली. लोकांना काय पाहिजे हे ओळखण्याची अचूकता त्यांच्याजवळ होती, म्हणूनच त्यांना हे यश मिळाले. आपले गुरुबंधू विनायकबुवा पटवर्धन यांच्याबरोबर त्यांची गायन जुगलबंदीही भारतभर लोकप्रिय होती. त्यांची ‘मालगुंजी’ रागाची, जुगलबंदीची ध्वनिमुद्रिकाही लोकप्रिय ठरली.
    त्यांना १९७७ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मध्य प्रदेश सरकारने १९८२ मध्ये ‘तानसेन’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. अ.भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या पुणे अधिवेशनात आणि पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही त्यांचा सत्कार करण्यात आला. शास्त्रीय संगीताचे लोकप्रिय गायक म्हणून नारायण व्यासांचे नाव रसिकांच्या नेहमीच लक्षात राहील. मास्टर नवरंग नागपुरे, वसंतराव राजोपाध्ये, विमल पत्की, शरद जांभेकर, प्रसाद सावकार व पुत्र विद्याधर व्यास हे त्यांचे प्रमुख शिष्य होत.

मधुवंती पेठे

व्यास, नारायण गणेश