Skip to main content
x

यावलकर, विश्राम श्रावण

             विश्राम श्रावण यावलकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील वरुड या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपल्या दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण केले. शेती ही जीवननिष्ठा झाली पाहिजे, असा संस्कार त्यांनी मुलांवर केला.

             विश्राम यावलकर अग्रणी व विचारी, मितभाषी, क्रियाशील असे कार्यकर्ते असल्यामुळे  त्यांनी निराशा, दारिद्र्य, वैफल्याने ग्रासलेल्या समाजाला कठीण परिस्थितीतून पुढे घेऊन जाण्यातच पुरुषार्थ आहे असे ठरवले. त्यांनी परिस्थितीवर मात करून मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना शिक्षणास पूर्णविराम द्यावा लागला. ते इच्छा असूनही उच्च शिक्षणापासून दूर राहिले, पण त्यांनी इतरांना उच्च शिक्षणास मदत करून त्याची भरपाई केली.

             त्यांच्याकडे केवळ चार एकर वडिलोपार्जित कोरडवाहू शेती होती. पितापुत्रांनी काबाडकष्ट करून आपली मालकीची जमीन वाढवत नेली. अधिक उत्पादनाशिवाय आर्थिक सुधारणा होऊ शकत नाही व आर्थिक विकासाशिवाय इतर सुधारणा होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी ओलितासाठी विहिरी खोदल्या. त्या काळी पाण्याचा उपसा ‘मोटे’ने होत असे. त्यात वेळेचा अपव्यय होत असे. त्यामुळे त्यांनी ‘डंकीन’ आणायचे ठरवले. त्या काळी ऑइल इंजिनास डंकीन म्हणत. वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी एक शेत विकले आणि मुंबईहून ऑइल इंजिन व पंपिंग सेट आणला. या कामात त्यांना वरुडचे वासुदेवराव देशपांडे यांची सोबत उत्साह वाढवणारी ठरली. अननुभवी व्यक्तीस ऑइल इंजिन देखभाल करणे हे जिकिरीचे काम होते, पण विश्राम यांनी विपरीत परिस्थितीवर मात करून आत्मविश्‍वासाने बागाईत करण्यास सुरुवात केली. ओलिताची व्यवस्था झाली व त्यांनी बागायती पिकांचे प्रयोग सुरू केले.

             त्यांनी १९४७-५०मध्ये ताडाच्या चार एकर शेतात केळी लावली. एका एकरात १४०० झाडे. भरपूर उत्पन्न आले, परंतु आर्थिक उत्पन्न एका झाडास एक रुपया म्हणजे एकरामधून रु. १४०० मिळायचे. त्यांनी नागपुरात केळीची विक्री करण्याची व्यवस्था केली.

             नागपूरला १९५० ते ५४ च्या दरम्यान गुजरातचे डॉ. सी.टी. पटेल आले होते. त्यांनी एच-४ कपाशीचे बियाणे शोधले होते. विभागीय आयुक्तांनी त्यांची भेट यावलकरांशी घालून दिली. झालेल्या चर्चेनुसार यावलकरांनी एच-४ कपाशीची लागवड करण्याचे ठरवले व डॉ. पटेलांनी त्यांना बियाणे पुरवले. ओलिताखाली या कपाशीचे प्रयोग अतिशय यशस्वी झाले. कपाशीचे एकरी २६ क्विंटल उत्पादन व्हायचे. तेव्हा नांदेड-यवतमाळ येथून अनेक शेतकरी कपाशी पाहण्यासाठी यायचे. पुढे यावलकरांचा पुण्यातील उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. गोपालकृष्णन यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९५४ ते १९५७ या काळात यावलकरांनी द्राक्षाची लागवड यशस्वीरीत्या केली. या भागात द्राक्षवेलीवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसू लागल्यामुळे त्यांनी द्राक्ष लागवड पुढे बंद केली. प्रायोगिक बागायती शेतीच्या यशस्वितेने त्यांचा उत्साह वाढला. विचारांती त्यांचा केळीच्या व संत्र्याच्या पिकावर बागायती कार्यक्रम स्थिरावला.

             परंतु विक्री करून पैसा उभा करणे महत्त्वाचे होते. यावलकर बाजारपेठ शोधून तेथे संत्री पाठवायला लागले. पैशाची आवक सुरू झाली. समाजमनावर या बदलत्या परिस्थितीचा खूप चांगला परिणाम झाला. अन्य शेतकर्‍यांनीही ऑइल इंजिन आणले. यावलकरांनी  प्रत्येकास मुंबईपर्यंत सोबत करून प्रत्येक बाबतीत मदत केली. जिकडेतिकडे संत्र्याच्या बागा दिसून लागल्या. वरुड परिसराचा चेहरामोहरा बदलला. एके काळी दारिद्र्यात खितपत पडलेला समाज यावलकरांच्या प्रयत्नांमुळे वैभवसंपन्न झाला. त्या वेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६० मध्ये वरुडला आले होते. महात्मा फुले महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी वरुडचा उल्लेख ‘कॅलिफोर्निया’ म्हणून केला. तेव्हापासून वरुडला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखतात.

             स्वतःला उच्च शिक्षण घेता आले नाही, याचे शल्य यावलकरांना बोचत होते. त्यांनी बंधू केशवराव यांचे शिक्षण पीएच.डी. पदवीपर्यंत पूर्ण करण्यास त्यांना प्रोत्साहित करून त्याची भरपाई केली. यावलकरांनी समाजातील शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या गरजूंना मदत केली. उच्च शिक्षण घेऊन गावी परत आलेल्या विद्यार्थांचा ते सत्कार करीत असत. त्यांच्या शिक्षणप्रेमामुळे समाजामध्ये शिक्षणाविषयी विलक्षण जागृती झाली. राजकारणाशिवाय समाजकारण जमत नाही ही गोष्ट त्या काळी चाणाक्ष यावलकरांनी बरोबर हेरली व नगरपालिकेची निवडणूक लढवली. यावलकर १९५९ ते १९६२ व १९६५ ते १९६७ ते नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी या कालावधीत गावाच्या विकासाची बरीच कामे करून घेतली. ते हिशोबी व काटकसरीने वागणारे होते. घरसंसाराचा खर्च सांभाळावा तशाच पद्धतीने नगरपालिकेचे व्यवहार सांभाळायचे.

             - डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

यावलकर, विश्राम श्रावण