Skip to main content
x

आचरेकर, भार्गवराम भिकाजी

     राठी संगीत रंगभूमीवरील गायक-नट म्हणून गाजलेल्या भार्गवराम भिकाजी आचरेकरांचा जन्म कोकणातील मालवण तालुक्यातील आचरे या गावी झाला. संगीत त्यांच्या कुटुंबातच होते. वडील वैद्यकी करीत तर आई भिकाबाई गावातील श्री रामेश्वर मंदिरात गायिका होत्या. संगीताचे संस्कार झाल्यामुळे बालपणापासूनच ते गात असत. शालेय शिक्षणाकडे त्यांचे फारसे लक्ष नव्हते. नाटकांची ओढ जबरदस्त होती. गावात रामनवमीच्या उत्सवानिमित्त स्थानिक मंडळींची नाटके होत. यात भार्गवराम कामे करीत. एका वर्षीच्या उत्सवात ‘शहा शिवाजी’ या नाटकात भार्गवरामांनी केलेली व्यंकोजीची भूमिका खूप गाजली. योगायोगाने ‘ललितकलादर्श’चे बापूराव पेंढारकर या नाटकाला उपस्थित होते. भार्गवरामांचे गाणे पेंढारकरांच्या चांगलेच लक्षात राहिले.
     वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी भार्गवरामांच्या आई-वडिलांचे निधन झाले. वडील बंधू अवधूत यांनीच त्यांचा सांभाळ केला व संगीताची संथाही दिली. नाटकात जाण्याची अत्यंत ओढ असलेल्या भार्गवरामांची, बाकूराव टिळक या त्यांच्या मित्राने पुढाकार घेऊन ललितकलादर्शच्या बापूरावांशी ओळख करून दिली. बापूराव पेंढारकरांनी त्यांचे काम पाहिले होते व आवाजही ऐकला होता. त्यांनी वडील बंधू अवधूत यांच्या परवानगीने त्यांना आपल्या कंपनीत ठेवून घेतले. अवधूत यांचा भार्गवरामाने नाटक कंपनीत जायला विरोध होता; पण भार्गवरामाच्या हट्टामुळे त्यांनी परवानगी दिली.
    भार्गवरामांचा १९२५ च्या आसपास  ललितकलादर्शमध्ये प्रवेश झाला.  या कंपनीत त्यांचे संगीत व अभिनयाचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला ते छोट्या-मोठ्या स्त्री-भूमिका व इतर कामेही करत. ललितकलादर्शच्या अनेक नाटकांतून त्यांनी कामे केली. मामा वरेरकरांच्या ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील ‘बिजली’ ही भूमिका अभिनय आणि गायन या दोन्ही दृष्टींनी गाजली. मा. भार्गवराम म्हणून त्यांचे नाव झाले. या नाटकाचे संगीत गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे होते. त्यामुळे भार्गवरामांचे पुढील संगीत शिक्षण रामकृष्णबुवा वझेंकडे सुरू झाले. याबरोबरच वझेबुवांचे चिरंजीव शिवरामबुवा वझे, मुहंमद बशीर खाँ साहेब, कागलकरबुवा, रामकृष्णबुवा बापट इत्यादी बुजुर्गांकडूनही भार्गवरामांनी संगीतविद्या मिळवली. बैठकीचे शास्त्रोक्त गाणेही पक्के होत गेले. याशिवाय पेंढारकरांनी संस्कृत श्लोक वगैरेचे पठण करून घेतल्यामुळे त्यांची वाणी शुद्ध, स्वच्छ व अस्खलित झाली. हा गुण त्यांच्या गायनातून प्रकर्षाने जाणवतो.  
     त्यांनी ललितकलेत बारा वर्षे काढली. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘पुण्यप्रभाव’, ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘शिक्का कट्यार’, ‘सोन्याचा कळस’, ‘वधूपरीक्षा’ इत्यादी ललितकलादर्शच्या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यांना १९३७ साली कंपनीच्या दुरवस्थेमुळे पेंढारकरांनीच गावी जायला सांगितले. त्यांनी १९४०-४१ च्या सुमारास स्वत:ची ‘ललितकला संवर्धक’ ही कंपनी काढली. भार्गवरामांनी या कंपनीच्या ‘संगीत सौभद्र’(कृष्ण), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘पुण्यप्रभाव’ (भूपाल) या नाटकांतून पुरुष-भूमिकाही समर्थपणे साकारल्या. आर्थिक जम न बसल्यामुळे ही कंपनीही बंद करावी लागली.
      पुढे गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीच्या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या ‘विद्याहरण’ या नाटकातील कच, ‘प्रेमसंन्यास’मधील जयंत, ‘सौभद्र’मधील अर्जुन या भूमिका विशेष गाजल्या. याच दरम्यान भार्गवराम विवाहबद्ध झाले व पुण्यात स्थायिक झाले. दामुअण्णा मालवणकरांच्या ‘प्रभाकर नाट्यमंदिर’, तसेच ‘भारत नाट्यकला’ या काही नाट्यसंस्थांतूनही भार्गवरामांनी काम केले. भार्गवरामांनी जुन्या नाटकांबरोबरच ‘लग्नाची बेडी’ (पराग), ‘उसना नवरा’ (गिरीश) अशा काही नव्या नाटकांमधूनही भूमिका केल्या.
     नाटकाबरोबरच शास्त्रीय संगीताच्या बैठका, गायनाच्या शिकवण्या, आकाशवाणीवरील कार्यक्रम असे उपक्रम चालू होते. जुन्या नाटकांचा जमाना संपत आला होता. नव्या संगीत नाटकांचे युग सुरू झाले. ‘नाट्यसंपदा’चे १९६७ साली ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीत नाटक आले. या नाटकाद्वारे भार्गवराम आचरेकरांचे वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी संगीत रंगभूमीवर पुनरागमन झाले. या नाटकात त्यांनी पं. भानुप्रसादचे काम केले. अतिशय छोटी भूमिका असली तरी भार्गवरामांचे काम आणि गाणे प्रेक्षकांच्या मनावर ठसले. या नाटकातील ‘दिन गेले भजनावीण’ हे पद व यमनमधील ‘तराण्यां’तून त्यांच्या गाण्याचा कस दिसतो. ‘कट्यार’च्या जवळजवळ ५०० प्रयोगांतून त्यांनी काम केले. ललितकलादर्शच्या हीरक महोत्सवी वर्षात १९६८ साली ‘सौभद्र’ या नाटकातून त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
     भार्गवरावांचा आवाज वजनदार व गाणे कसदार होते. त्यांच्याजवळ विविध रागांतील बंदिशींचाही भरणा होता. ते सातत्याने गायनाची मेहनत करत. त्यांच्या शिष्यवर्गात अविनाश आगाशे यांचे प्रमुख नाव घ्यावे लागेल. ते बरीच वर्षे त्यांच्याकडे शिकले. याशिवाय मुकुंद उपासनी, मुकुंद मराठे यांनाही त्यांची तालीम मिळाली. अनेकांना नाट्यसंगीताचे, तसेच गायनाचे मार्गदर्शन लाभले.
     त्यांच्या एकसष्टीनिमित्त ‘आवडीने भावे’ (संगीत : भार्गवराम आचरेकर) व ‘दिन गेले भजनावीण’ या दोन गाण्यांची ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने काढली. ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील ‘जगी वंचिता’, ‘अभिलाषा नाही’ या नाट्यपदांची, ‘वधूपरीक्षा’ या नाटकातील ‘सत्पात्र हा’, ‘संन्याशाचा संसार’मधील ‘वांछित भावना’, ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘त्यजी भक्तासाठी’ अशा  नाट्यपदांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या होत्या.
     त्यांना १९८३ साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे त्यांचा सन्मान करून पुरस्कार देण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व’ पुरस्कार (१९९६); अखिल महाराष्ट्र नाट्य परिषद, सांगलीतर्फे पुरस्कार (१९८९); याशिवाय मराठी रंगभूमी, पुणे; कालनिर्णय, मुंबई व अण्णा कराळे पुरस्कृत ‘संगीत सूर्य केशवराव भोसले’ पुरस्कार आदी पुरस्कारांचे ते मानकरी होते. त्यांचे वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी पुण्यात निधन झाले.

माधव इमारते

आचरेकर, भार्गवराम भिकाजी