Skip to main content
x

अधटराव, इंदिरा दामोदर

अभिनेत्री

 

पल्याच तोर्‍यात मिरवणारी खाष्ट सासू आठवली की इंदिरा चिटणीस यांचा ठसका आपल्या मनात उभा राहतो. नऊवारी साडी, अस्ताव्यस्त सुटलेले केस, ठेंगणी-ठुसकी अंगकाठी आणि अचूक संवादफेक यामुळे इंदिरा चिटणीस यांच्या अनेक व्यक्तिरेखा मराठी चित्रपटातून चांगल्याच उठून दिसल्या.

इंदिरा चिटणीस यांचा जन्म मुंबईत झाला. शिक्षण केवळ मराठी चौथीपर्यंत झाले. घरचे बाळबोध वातावरण. त्यामुळे परवचा, रामरक्षा रोजच्या रोज म्हणायला लागायचे. त्यांचा परिणाम नकळत त्यांच्या वाणीवर झाला आणि पुढील काळात संवादफेक करणे त्यांना सहज शक्य झाले.

लहानपणापासूनच इंदिरा चिटणीस यांना अभिनयाची आवड होती. आरशासमोर उभ्या राहून त्या निरनिराळ्या प्रकारचे आविर्भाव करीत. नाटकांचा जमाना असल्यामुळे मुंबईत विविध कंपन्यांची नाटके होत. त्यांना इंदिरा चिटणीस आपल्या वडिलांसमावेत हजेरी लावायच्या. मुंबईत मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या संस्थेची नाटके सुरू होती. एक दिवस मनाचा हिय्या करून इंदिराबाई त्या कंपनीचे मालक व चालक मो.ग. रांगणेकर यांना भेटल्या व नाटकात काम करण्याची इच्छा प्रकट केली. दिसायला अगदी सामान्य असणार्‍या या मुलीला कसले काम द्यायचे हा प्रश्न पडला. पण त्यांनी तिला कंपनीत ठेवून घेतले व कुलवधू’, ‘राणीचा बाग’, ‘आशीर्वादअशा अनेक नाटकांत भूमिका दिल्या आणि इंदिरा चिटणीस हे नाव मराठी रंगभूमीवर हळूहळू प्रसिद्धीस येऊ लागले.

१९४०-४१ या काळात भालजी पेंढारकर पुणे येथे चित्रपट करत असत. थोरातांची कमळाया चित्रपटासाठी त्यांना एका छोट्या भूमिकेसाठी एक पात्रयोजना करायची होती. त्यासाठी त्यांनी इंदिरा चिटणीस यांना पाचारण केले आणि थोरातांची कमळाया चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीला एका गुणवंत कलाकाराची साथ मिळाली. ती म्हणजे इंदिरा चिटणीस यांची!

थोरातांची कमळानंतर इंदिरा चिटणीस यांनी मो.ग. रांगणेकर यांच्या कुबेरया चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केली. त्यानंतर मोहित्यांची मंजुळा’, ‘मोठी माणसं’, ‘साखरपुडा’, ‘श्रीकृष्ण दर्शन’, ‘वर पाहिजे’, ‘दूधभात’, ‘बाळा जो जो रे’, ‘चिमणी पाखरं’, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणीअसे त्यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट पडद्यावर आले. इंदिरा चिटणीस यांनी जवळजवळ १२५ चित्रपटात भूमिका केल्या.

इंदिराबाईंचा विवाह १९३९ मध्ये दामोदर तुकाराम अधटराव यांच्याबरोबर झाला. लग्नाआधीचे त्यांचे नाव होते इंदिरा चिटणीस. चित्रपटात काम करायचा विचार विवाहानंतर झाला. पण त्या वेळी त्यांच्या सासूबाईंनी ही पोरटी सिनेमात जाऊन आपल्या घराण्याला कलंक लावणारया विचाराने आपले अधटराव नाव लावायला मज्जाव केला. त्यामुळे इंदिराबाईंनी अधटराव हे नाव न लावता माहेरचे चिटणीस हेच नाव कायम ठेवले व तेच शेवटपर्यंत चिकटून राहिले.

चित्रपटांबरोबरच त्या नाटकातही भूमिका करत. बाबूराव गोखले यांच्या श्री स्टार्स कंपनीतर्फे साकार झालेल्या करायला गेलो एक अन् झालं भलतचवगैरे नाटकातील त्यांच्या भूमिकांना सर्वमान्यता मिळाली. खाष्ट व्यक्तिरेखा साकार करणार्‍या इंदिराबाईंनी पु.ल. देशपांडे यांच्या नवे बिर्‍हाडया लघुपटात विनोदी भूमिकाही केली होती. मानिनीया चित्रपटातील त्यांची प्रेमळ आईची भूमिका चित्रपटरसिक कसे विसरतील?

इंदिरा चिटणीस यांचा मृत्यू वयाच्या ७८व्या वर्षी झाला. तो दिवस सर्वपितरी अमावस्येचा होता. त्यांच्या पहिल्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्यावर अनेक कलाकार आणि चाहते यांनी लेख लिहिले व ते समर्पिताया नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.

 

संदर्भ :
१) वाटवे बापू, ‘समर्पिता-इंदिरा चिटणीस यांच्या आठवणी’, प्रकाशक - दा.तु. अघटराव; १९८३